चंद्रूनं येताना हर्षसाठी भारी आकर्षक खेळणी आणली होती. ती पाहून आनंदित होण्याऐवजी विनिता म्हणाली,
`कशाला आमच्या मुलासाठी तुम्ही एवढी भारी खेळणी आणलीत? तुम्हालाही बाळ होईल. त्याच्यासाठी तुम्ही काढून ठेवू शकाल. तुम्ही प्रत्येक वेळी भारी भेटवस्तू आणल्या तर आमच्यासारख्यांनी कशी परतफेड करायची?’
हे ऐकून चंद्रू दिग्मूढ झाला.
`काय झालंय हिला? अशी का ही श्रीमंती-गरिबीचंच बोलत राहतेय?’
`विनिता, हर्ष आमच्या घरचा पहिला नातू आहे. त्याच्यासाठी मी मला वाटलं ते घेऊन आलोय. माझ्या मुलाला मी इथं घेऊन येईल तेव्हा तुम्हाला जे करायचं ते करा, जे द्यायचं ते द्या.’ एवढं सांगून त्यानं विषय बदलला.
जमुनेच्या बाळंतपणासाठी गौरम्मांना वर्षभरासाठी अमेरिकेला जाण्याची तीव्र अपेक्षा होती. पण शामण्णांनी मात्र ठाम नकार दिला. त्यांनी स्पष्टच सांगितलं, `चंद्रू, मी हर्षला सोडून वर्षभर राहणं शक्यच नाही! त्यात माझ्या प्रकृतीच्या तक्रारी असतात. काही कमी-जास्त झालं तर तुम्हांला परदेशात त्रास होईल. तुझ्या आईलाच आशा आहे- तिला घेऊन जा.’
आणखी दोन महिन्यांनंतर गौरम्मांचं अमेरिकेत जायचं पक्कं ठरलं. त्या तर हुरळून गेल्या, `जमुनाला काय पाहिजे ते कळव हं! मी येताना घेऊन येईन!’
चंद्रूनं आईच्या प्रवासाची सारी व्यवस्था केली आणि तो निघून गेला.
त्यानंतर गौरम्मांच्या बोलण्यात अमेरिकेच्या प्रवासाव्यतिरिक्त दुसरा विषयच येईना! शामण्णांचं डोकं पिकून गेलं. राघवेंद्रस्वामींच्या मठात संध्याकाळी जमणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना हजारदा त्याविषयी सांगून झालं. शेजार-पाजारच्यांनाही सांगून झालं. नंजनगूडच्या नंजुडेश्वराला अभिषेक सांगून त्यांनी जमुनाचं बाळंतपण सुखरुप होऊ दे म्हणून साकडं घातलं. सुरभीबरोबर दुकानात जाऊन त्यांनी जमुनेसाठी पाच हजारांची हिरवी रेशमी साडी आणली.
विनिता मूकपणे सगळं पाहत होती. यातलं काहीही तिच्या गर्भारपणात तिच्या वाटेला आलं नव्हतं. गौरम्मांनी त्या वेळी स्पष्टच सांगितलं होतं, `गिरीशनं दिली तर तुला साडी घे.’ सुरभीच्या लग्नाचा खर्च असल्यामुळे गिरीशला ते शक्यही नव्हतं. आता जमुनेला मात्र त्यांनी स्वत: साडी आणली होती.
गावाला जायचा दिवस जवळ येऊ लागला. वेगवेगळे मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या-लोणची, कडबोळी, चकल्या तयार झाल्या. फारसं लक्ष न देणारा गिरीशही म्हणाला, `अम्मा, तू काही तिथं खाद्य-पदार्थांचं दुकान काढायला निघाली नाहीस! त्यातलं थोडं या मुलासाठीही ठेव ना!’
यावर त्यांनीही ठणकावून सांगितलं, `तुला हवं असेल तर विनितेला सांग! ती करुन देईल. शिवाय इथं दुकानं आहेत. तिथं जमुनाला कुणी नाही!’ आणि सगळं सामान नीट भरुन घेतलं.
जमुनाच्या माहेरकडूनही ढीगभर सामान आलं. गौरम्मांना आणखी आनंद झाला.
`ही पाहा चार रेशमी लुगडी आणि चार सुती लुगडी घेते. चार भारी साड्या घेते. पुरतील की नाही? बाळासाठी सोन्याची साखळी करुन घेऊ की नुसतं वळंच असू दे? इथून कुणी येणार असलं, तर त्यांच्याबरोबर काय पाठवायचं ते मी कळवेन. तेवढं पाठवून द्या.’
शामण्णांचा संयम सुटला.
`वर्षभरच कशाला, पाच वर्षं राहून ये मुलाकडे. तू काही चंद्रावर निघाली नाहीस! तुझ्यासारखी हजारो माणसं दररोज जात-येत असतात. तू निघशील त्या दिवशी निवांत झोप काढेन मी!’ शामण्णांचं हे बोलणं ऐकल्यावर तर गौरम्मांना रडू कोसळलं.
`जळला मेला आमचा जन्म! तुम्ही तर मला कुठंही नेलं नाही. आपल्या चंद्रूमुळे अमेरिकेला जायला निघाले! तुम्ही घरचे यजमान! तुम्हीच असं बोललं तर कसं?’
कधीही यजमान नसलेले शामण्णा तिथून उठून निघून गेले. विनिताही आत गेली. तिला आपलं गरोदरपण आठवत होतं. ते जाऊ दे, हर्षच्या बारशाच्या वेळी त्यांनी फक्त शंभर रुपये दिले होते. न जन्मलेल्या बाळाचं आतापासून कौतुक आणि डोळ्यांसमोरच्या नातवाकडे पूर्णपणे डोळेझाक! सतत तिथल्याच गोष्टी बोलत होत्या. इथल्या घराची किंवा नातवाची त्यांना काळजीच वाटत नव्हती. त्या एकदा तरी `विनिता, घराकडे आणि हर्षकडे नीट लक्ष दे. त्याच्यावर रागावू नकोस’ असं तोंडदेखलं का होईना, म्हणतील अशी विनितेची अपेक्षा काही पूर्ण झाली नाही. ती मनोमन दुखावली.
गौरम्मांना भेटायला सुरभी आणि सुरेश आले. त्यांनीही जमुनासाठी कोचमपल्ली साडी आणि तिच्या बाळासाठी खेळणी आणली होती. हर्षसाठी मात्र काहीही नव्हतं. विनितेनं तिकडेही दुर्लक्ष केलं. पण मनात कळ उठलीच.
रात्री सुरभीनं आईपुढे विषय काढला.
`अम्मा, हेही म्हणताहेत, आपणही अमेरिकेला जाऊ. तिथंच नोकरी करेन.’
गौरम्मा हरकून म्हणाल्या, `वा! फारच छान! सुरेश, तुम्ही लगोलग तिथं या. मीही असेनच.’
`तसं नव्हे अम्मा! तिथली परीक्षा दिल्यानंतरच तिथं नोकरी मिळते म्हणे. त्याशिवाय नोकरी मिळत नाही.’
`तुला कुणी सांगितलं हे?’
`यांनीच सांगितलं. लग्नाआधीच त्यांनी सगळी चौकशी करुन ठेवली होती.’
`तुझा नवरा हुशार आहे बाई! सहज पास होईल ती परीक्षा!’
`त्यासाठी खूप खर्च असतो, म्हणतात. तिथं येण्याचा विमानाचा खर्च. आम्हां दोघांनाही वर्षभर तिथं राहावं लागेल!’ सुरभी सावधपणे म्हणाली.
गौरम्मा मोठ्या विश्वासानं म्हणाल्या, `त्यात विचार कसला करायचा? चंद्रूचं घर आहेच ना? तिथं तुम्ही दोघंही राहा. असा कितीसा खर्च येणार आहे दोघांचा? विमानाच्या खर्चाच्या दृष्टीनंही चंद्रू मदत करेल. तुम्हांला नोकरी मिळाल्यावर द्या त्यांचे पैसे परत हवं तर!’
सुरभी साशंक स्वरात म्हणाली, `चंद्रू तयार झाला तरी जमुनावहिनी तयार होईल काय?’
`होईल तर! माझी खात्री आहे. श्रीमंत घरात वाढलेय ती! त्यामुळे मनाचा तेवढा मोठेपणा असेलच. शिवाय तिलाही सोबत होईल ना! सुरेश घरचा जावई. जमुना त्याच्याशी नम्रपणे वागेल. कशाला काळजी करता? मी स्वत: सांगेन ना त्या दोघांनाही!’
आईनं एवढं आश्र्वासन देताच सुरभी अमेरिकेची स्वप्नं बघत सुखानं झोपी गेली.
दुसरे दिवशी शामण्णांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी बजावलं, `तू यात अडकू नकोस गौरी! मुलांची लग्नं लावून दिली की आपली जबाबदारी संपली. कुणाला घरात ठेवून घ्यायचं आणि कुणाला नाही याचा निर्णय ज्याचा त्यानं घ्यायचा असतो. आपण कोण त्यांना सांगणार? स्वत:च्या हिमतीवर त्यांना चंद्रावर जायचं तर जाऊ दे. तू नसती जबाबदारी अंगावर घेऊ नकोस!’
`काहीतरीच काय तुमचं? बहिणीच्या नवऱ्याला मदत करायला आपला चंद्रू तयार होणार नाही असं तुम्हाला कसं वाटतं? एका वर्षाचा तर प्रश्न आहे. त्यानंतर ते नोकरी धरून वेगळेच राहणार आहेत.’
`तिथं कशी काय पद्धत आहे कुणास ठाऊक!’ शामण्णा म्हणाले.
`तुम्ही अमेरिका पाहिलीय काय? तुमचं हे नेहमीचंच आहे! उगाच काहीतरी खुसपट काढता! मी तर जमुनाला सांगणारच!’ गौरम्माचा स्वर कठोर झाला होता.
गौरम्मांना बेंगळूरहून निघतानाच गिरीगौडांची सोबत मिळाली. तेही चंद्रूच्या गावीच जाणार होते. त्यामुळे गौरम्मांच्या अमेरिका प्रवासाची सुरुवात तर निश्चिंतीनं झाली.
बेंगळूर-मुंबई-लंडन-न्यूयॉर्क-मिनिसोटा असा त्यांचा प्रवास होता.
एअर-होस्टेसनं दिलेला कुठलाही शाकाहारी पदार्थ गौरम्मांनी तोंडात घातला नाही. केवळ फळांचा रस पीत त्या प्रवास करीत राहिल्या.
त्यांनी आयुष्यात कधीही अंघोळ न करता जेवण केलं नव्हतं. एवढ्या लांबच्या प्रवासात अंघोळ करायला कुठून जमणार?
गौरम्मांचा हा पहिला विदेश प्रवास होता. त्याचबरोबर त्या पहिल्यांदा विमानात बसल्या होत्या. त्यामुळं त्यांना सगळं नवंच वाटत होतं. क्षाणोक्षणी त्या आश्चर्यचकित होत होत्या.
गिरीगौडांच्याही हे लक्षात आल्यामुळे सीटचा पट्टा बांधणं त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे टॉयलेट कसा वापरायचा वगैरे गोष्टी त्यांनी गौरम्मांना समजावून सांगितल्या.
एरोड्रमवर चंद्रूला पाहताच गौरम्मांना साऱ्या प्रवासाचा शिणवटा क्षणार्धात निघून गेल्यासारखं वाटलं. सारा कंटाळाही निघून गेला.
गिरीगौडाही `चंद्रू, माझी जबाबदारी संपली! तुमच्या आर्इंना तुमच्या ताब्यात दिलंय!’ म्हणत हसत निघून गेले.
चंद्रू गौरम्मांचं सामान गाडीत ठेवत होता. गौरम्मा लगेच उत्तेजित होऊन म्हणाल्या, `याच गाडीचा फोटो जमुनानं पाठवला होता ना रे चंद्रू?’
पाठोपाठ त्यांनी विचारलं, `अरे हो! जमुना का आली नाही एअरपोर्टवर?’
`ती कामावर गेलीय. यायला उशीर होईल तिला.’
`गर्भारशी! अजून कामावर जाते?’ गौरम्मांचा जीव कासावीस झाला.
`अम्मा, इथं डिलव्हरीच्या दिवसापर्यंत बायका कामावर जातात.’
`होय!’ त्यांना आश्चर्य वाटलं. मुलाच्या आलिशान गाडीत बसताना मात्र त्यांचं मन तृप्तीनं भरुन गेलं होतं.
चंद्रूनं आईभोवती सीट-बेल्ट बांधला.
`अरे काय हे? मी काय लहान बाळ आहे? काढ बघू हा पट्टा!’
`नाही, अम्मा! इथं तसा कायदाच आहे.’
मनात कुठं तरी जमुनाही प्रेमानं एअरपोर्टवर भेटायला येईल अशी अपेक्षा होती. ती भारतात आलेल्या प्रत्येक वेळी कितीही अडचण असली तरी त्या पोहोचवायला जायच्याच ना! तिची आई आली नाही तरी त्या जायच्या.
गाडी वेगानं धावत होती. काचेच्या खिडकीतून बाहेरचं जग दिसत होतं. ही अमेरिका! भूलोकीचा स्वर्ग हा! इथं येण्यासाठी कितीतरी माणसं वाट पाहत असतात! चंद्रूमुळंच आपल्याला इथं येणं शक्य झालं! केवळ चंद्रूमुळे! जर चंद्रूही गिरीशप्रमाणे तिथंच राहिला असता, तर आपल्याला या महान देशाचं दर्शनच झालं नसतं.
या भावनेनं गौरम्मा रोमांचित झाल्या.
विस्तीर्ण रस्ते, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोठाले वृक्ष, रस्त्यावर अगणित गाड्या! संपूर्ण वातावरणात फक्त गाड्यांचाच आवाज भरला होता. बाहेर रक्त गोठवणारी थंडी असली तरी आत सुखावह उबदार वातावरण! गाडीचं ऐश्वर्य बघून गौरम्मा चकित होऊन गेल्या.
आपल्या देशात आणि या देशात किती अंतर आहे! तिथली माणसांची गर्दी, त्यातून धावणाऱ्या सायकली, रिक्षा, बैलगाड्या, गाढवं, हातगाड्या आणि मोटारी. इथं त्यातलं काहीच दिसत नव्हतं. केवळ वेगानं धावणाऱ्या गाड्याच दिसत होत्या.
गौरम्मांनी पुराणांमध्ये नागलोक, पाताळलोक, किन्नर लोकांविषयी ऐकलं होतं. हा कुठला लोक?
चंद्रूच्या बोलण्यानं त्या भानावर आल्या.
तो चौकशी करत होता, `घरी सगळे कसे आहेत? हर्ष कसा आहे?’
`अतिशय खोडकर झालाय! मीही येणार म्हणून पदर धरुन रडत बसला होता. पण आजोबा येणार नाहीत म्हटल्यावर मीही येत नाही म्हणून गप्प बसला. यांचाही फार जीव आहे त्याच्यावर!’ त्यांनीही नातवाचं कौतुक केलं.
`खरंय! हर्ष नशिबवान आहे. आजी-आजोबांचं प्रेम मिळतंय त्याला! अण्णाही यायला हवे होते.’
`त्यांचा स्वभाव तुलाही ठाऊक आहेच. त्यांना काहीही नकोच असतं. इथं येऊन इथलं वैभव बघायला काय हरकत होती? अगदी संन्याशासारखं बोलतात. ते जाऊ दे. जमुनेचे बाळंतपणाचे दिवस केव्हा येतात?’
`बहुतेक पुढच्या आठवड्यात होईल. तू आल्यावर ती घरातच राहणार आहे. मुलगी छान पोसलीय असं डॉक्टर म्हणत होते.’
गौरम्मा निराश झाल्या.
`अरे, तू थोरला मुलगा. पहिला मुलगाच झाला असता तर बरं झालं असतं.’
`आपलं काय श्रीरामचंद्राचं राज्य आहे की काय? राज्य चालवायला राजकुमारच पाहिजे असं म्हणायला? आपण आपली चार चौघांसारखी माणसं. मूल नॉर्मल असलं तरी खूपच झालं.’
चंद्रूचे हे विचार टी. नरसीपूरमध्ये चौथीपर्यंत शिकलेल्या गौरम्मांना कसे समजणार?
भरपूर मोठं अंगण असलं तरी त्याला कंपाऊंड नव्हतं. घराभोवती भलं मोठं गवताचं लॉन होतं. अधूनमधून फुलांची झाडं दिसत होती. घराजवळ गाडी नेण्यासाठी सिमेंटचा रस्ता होता.
गौरम्मांच्या मनात आलं, कुठल्या ऑफिसपाशी आलो आपण?
त्या वेळी चंद्रू म्हणाला, `अम्मा, घर आलं. उतर.’
जयनगरमधल्या तीस बाय चाळीसच्या प्लॉटवर, अजिबात जागा न सोडता बांधलेलं छोटंसं घर- माडी असली तरी घर छोटंसं होतं- ते कुठं आणि हा भव्य राजवाडा कुठं! आपल्या मुलाचं हे घर! या घराच्या मालकाची मी आई! गौरम्मा अभिमानानं फुलून आल्या.
मुलाबरोबर पायऱ्या चढून दारापाशी आल्यावर दार उघडलं. जिनं दार उघडलं ती आपली सून जमुना? त्यांचा क्षणभर स्वत:वर विश्वास बसला नाही.
सुरभीच्या लग्नात पावलो-पावली रेशमी साड्या बदलणारी, अंगभर विविध दाग-दागिने घालून साक्षात लक्ष्मी भासणारी जमुना आणि या जमुनामध्ये कितीतरी अंतर होते.
केसांचा छोटासा बॉब, अंगात सैल डगल्याप्रमाणे लांबलचक गाऊन, रितं कपाळ, रिते हात, गळ्यात मंगळसूत्राचा पत्ता नव्हता, नाकात चमकी नव्हती. तिचा सावळा वर्ण मात्र उजळला होता. प्लेझर टाऊनमध्ये मासे विकणाऱ्या सर्वसामान्य बाईसारखी ती दिसत होती.
तिनंही हसत चौकशी केली, `अम्मा, बऱ्या आहात ना?’
`छान आहे!’- म्हणत गौरम्मांनी घरात प्रवेश केला.
त्यांच्या कल्पनेपेक्षाही तो परिसर वेगळा होता. त्यांना वाटलं होतं, आपल्याला पाहताच जमुना वाकून नमस्कार करेल. आपण आनंदानं बेंगळूरहून सांभाळून आणलेल्या अक्षता तिच्या मस्तकावर टाकत आशीर्वाद द्यायचा असं त्यांनी ठरवलं होतं. सून सकल-सौभाग्यसूचक आभरणे घालूनच आपलं स्वागत करेल अशी त्यांची खात्री होती.
जमुना आत निघून गेली. मऊ सोफ्यावर बसून गौरम्मा सूक्ष्मपणे सभोवताली पाहू लागल्या.
एखाद्या श्रीमंताचं ते घर दिसत होतं. जमिनीवर गालिचे, खिडक्यांना सुरेख भारी पडदे, भला मोठा रंगीत टी. व्ही., शोकेसमध्ये चांदी आणि चंदनाच्या शोभेच्या महाग-महाग वस्तू, शिसवी लाकडाचं भलं मोठं डायिंनग टेबल, भिंतीवर लटकणाऱ्या अनेक भारी वस्तू.
बेंगळूरच्या कृष्णप्पा सावकारांच्या घरापेक्षाही अधिक वैभव तिथं होतं.
जमुनानं विचारलं, `अम्मा, कॉफी देऊ?’
`नको गं बाई! अंघोळ केल्याशिवाय मी कधीच कॉफी प्यायले नाही. आधी मला न्हाणी-घर दाखव.’
जमुनानं त्यांना न्हाणीघर दाखवलं.
`इथं टॉयलेट आहे. इथं अंघोळ करून सोवळं कसं राखता येईल? नुसती अंघोळीची न्हाणी दाखव.’
जमुनेनं चंद्रूकडे पाहिलं.
`अम्मा, इथं असंच असतं. एकाच ठिकाणी दोन्ही असतं. आपल्याकडे जसा संडास आणि न्हाणी वेगवेगळे असतात तसं नसतं इथं. इथल्या प्रत्येक न्हाणीघरात अशीच व्यवस्था आहे.’
`म्हणजे? इथं आणखी न्हाणीघरं आहेत? एका घराला एका संडास आणि न्हाणी असते ना?’ गौरम्मांनी डोळे विस्फारून म्हटलं.
`तसं काही नाही. आपल्या घरात तीन आहेत. तू आपली डोळे मिटून अंघोळ कर बघू! म्हणजे टॉयलेट कमोड दिसणार नाही!’ चंद्रू हसत म्हणाला.
`चंद्रू, मी कधीही टबमध्ये अंघोळ केली नाही. एक बादली दे बघू! टबमध्ये बादली ठेवून अंघोळ करून घेते.’ गौरम्मांनी आपल्या परीनं त्यातून मार्ग काढला.
पण चंद्रूच्या घरी बादली नव्हती. आधी हा मुद्दा त्याच्याही लक्षात आला नव्हता. इंडियन स्टोअर्समधून बादली आणायची ठरवून त्यानं घरातल्या मोठ्या पातेल्यात समशीतोष्ण पाणी काढून आईला अंघोळ करायला सांगितलं.
थोड्या असमाधानानंच गौरम्मांनी अंघोळ उरकली आणि सोवळ्याचं लुगडं नेसून बाहेर आल्या. बाहेर अंधार होत आला होता. घड्याळ पाहिलं- चार वाजले होते.
`चंद्रू, एवढ्यात अंधार झाला?’
`होय अम्मा! इथं हिवाळ्यात असंच असतं.’
कॉफी प्यायल्यावर गौरम्मा घर बघायला उठल्या.
`आमचं अगदी सर्वसामान्य घर आहे. फक्त पाच बेडरुम्स आहेत. फक्त दोन गॅरेज आहेत-’ म्हणत चंद्रूनं सगळं घर फिरुन दाखवलं.
` प्रत्येक बेडरूममध्ये एकेक पलंग, त्यावर रेशमी आच्छादन, मऊ गादी, ड्रेसिंग टेबल- साऱ्याच वस्तू एकापेक्षा एक सुंदर होत्या. तरीही चंद्रू याला साधं घरच म्हणत होता!
`चंद्रू, अगदी राजवाड्यासारखं थाटाचं घर आहे तुझं!’
`अम्मा, इथं सगळ्यांची घरं अशीच असतात. अण्णा आम्हांला शाळेत शिकवायचे, ते आठवतं. मलय पर्वतावरच्या भिल्ल स्त्रिया चंदनाचीच लाकडं स्वयंपाक करण्यासाठी जाळतात म्हणे! तसंच आहे इथं!’
गौरम्मांच्या डोक्यात तो काय म्हणतो ते शिरलं नाही. जमुना त्यांना स्वयंपाकघरात घेऊन गेली.
किती स्वच्छ आहे स्वयंपाकघर! नव्यानं बांधल्यासारखं वाटतंय! मायक्रोवेव्ह, गॅस, ग्रार्इंडर, भला मोठा फ्रीज!
`जमुना, आणखी किती दिवस कामावर जाणार?’
`फक्त उद्या जाऊन येईन. बाळंतपणानंतर दोन महिन्यांनंतर पुन्हा कामावर जाईन.’
`लहान मूल म्हटल्यावर तू का नोकरी करायची? गिरीशचा बेताचा पगार आहे म्हणून विनिता मूल झालं तरी नोकरी करते. तुम्हाला काय कमी आहे? एवढा मोठा राजवाडा– दोन-दोन गाड्या!’
जमुनेनं चंद्रूला खूण केली- तुमच्या बावळट आईला समजावून सांगा अशा अर्थाची! चंद्रूच्या ते ध्यानात आलं. तो म्हणाला, `अम्मा, हत्तीचं ओझं हत्तीला आणि बकरीचं ओझं बकरीला! हे घर, या घरातलं सगळं फर्निचर, गाड्या सगळं काही हप्त्यानं घेतलं आहे. दर महिन्याला सगळ्यांचे हप्ते भरलेच पाहिजेत ना! आता तर तूही आहेस बाळाकडे बघायला. जमुनाचाही वेळ जात नाही. करु दे नोकरी. पुढंच पुढं बघता येईल.’
चंद्रूनं विषय संपवला. त्या निमित्तानं गौरम्मांना हप्त्याच्या व्यवहाराचा परिचय झाला. किती छान सोय आहे ही! आपल्याकडेही अशी सोय असती तर आपल्यालाही असंच थाटात राहता आलं असतं! दर महिन्याला हप्ते भरत राहिलो असतो!
दुसऱ्या दिवशी जमुना आणि चंद्रू नोकरीवर निघून गेले. त्या भल्या मोठ्या घरात गौरम्मा एकट्याच राहिल्या.
भारतात रात्र असेल तेव्हा इथला दिवस. इथं रात्र असताना तिथला दिवस त्यामुळे गौरम्मांना झोपेचा थोडा त्रास वाटला.
आता त्यांना सुरभीची आठवण झाली. एवढं मोठं घर आहे! जमुना नको म्हणणार नाही. सुरभीही जमुनाला मदत करेल, तिच्या मुलाला सांभाळेल. सुरभीलाही मुलांची भरपूर हौस आहे. बेंगळूरला आली की हर्षला क्षणभरही सोडत नाही. चंद्रूही नको म्हणणार नाही.
त्यांना जुनी आठवण आली. त्या चंद्रूच्या खेपेला बाळंतपणासाठी माहेरी गेल्या होत्या. दोन वर्षं तिथंच राहिल्या. कारण शामण्णा वर्षभरासाठी ट्रेनिंगला गेले होते. शामण्णांना आई-वडील कुणीच नव्हतं. गौरम्मांच्या भावानं आणि भावजयीनं गौरम्मा आणि चंद्रूला दोन वर्षं आपल्या घरी ठेवून घेतलं. एवढंच नव्हे, तर जाताना त्यांनी लुगडंही नेसवलं होतं. त्यांची परिस्थितीही फारशी बरी नव्हती.
सुरभीला येऊ नको म्हणायला यांना तर काहीही कारणच नाही!
सुरभी इथं आली की आपली दोन मुलं अमेरिकेत! मग मनात येईल तेव्हा इथं येता येईल.
या विचारानंच गौरम्मा हुरळून गेल्या.
गौरम्मांना येऊन आठवडा झाला होता.