/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

Romance डॉलर बहू

adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

चंद्रूनं येताना हर्षसाठी भारी आकर्षक खेळणी आणली होती. ती पाहून आनंदित होण्याऐवजी विनिता म्हणाली,
`कशाला आमच्या मुलासाठी तुम्ही एवढी भारी खेळणी आणलीत? तुम्हालाही बाळ होईल. त्याच्यासाठी तुम्ही काढून ठेवू शकाल. तुम्ही प्रत्येक वेळी भारी भेटवस्तू आणल्या तर आमच्यासारख्यांनी कशी परतफेड करायची?’
हे ऐकून चंद्रू दिग्मूढ झाला.
`काय झालंय हिला? अशी का ही श्रीमंती-गरिबीचंच बोलत राहतेय?’
`विनिता, हर्ष आमच्या घरचा पहिला नातू आहे. त्याच्यासाठी मी मला वाटलं ते घेऊन आलोय. माझ्या मुलाला मी इथं घेऊन येईल तेव्हा तुम्हाला जे करायचं ते करा, जे द्यायचं ते द्या.’ एवढं सांगून त्यानं विषय बदलला.
जमुनेच्या बाळंतपणासाठी गौरम्मांना वर्षभरासाठी अमेरिकेला जाण्याची तीव्र अपेक्षा होती. पण शामण्णांनी मात्र ठाम नकार दिला. त्यांनी स्पष्टच सांगितलं, `चंद्रू, मी हर्षला सोडून वर्षभर राहणं शक्यच नाही! त्यात माझ्या प्रकृतीच्या तक्रारी असतात. काही कमी-जास्त झालं तर तुम्हांला परदेशात त्रास होईल. तुझ्या आईलाच आशा आहे- तिला घेऊन जा.’
आणखी दोन महिन्यांनंतर गौरम्मांचं अमेरिकेत जायचं पक्कं ठरलं. त्या तर हुरळून गेल्या, `जमुनाला काय पाहिजे ते कळव हं! मी येताना घेऊन येईन!’
चंद्रूनं आईच्या प्रवासाची सारी व्यवस्था केली आणि तो निघून गेला.
त्यानंतर गौरम्मांच्या बोलण्यात अमेरिकेच्या प्रवासाव्यतिरिक्त दुसरा विषयच येईना! शामण्णांचं डोकं पिकून गेलं. राघवेंद्रस्वामींच्या मठात संध्याकाळी जमणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना हजारदा त्याविषयी सांगून झालं. शेजार-पाजारच्यांनाही सांगून झालं. नंजनगूडच्या नंजुडेश्वराला अभिषेक सांगून त्यांनी जमुनाचं बाळंतपण सुखरुप होऊ दे म्हणून साकडं घातलं. सुरभीबरोबर दुकानात जाऊन त्यांनी जमुनेसाठी पाच हजारांची हिरवी रेशमी साडी आणली.
विनिता मूकपणे सगळं पाहत होती. यातलं काहीही तिच्या गर्भारपणात तिच्या वाटेला आलं नव्हतं. गौरम्मांनी त्या वेळी स्पष्टच सांगितलं होतं, `गिरीशनं दिली तर तुला साडी घे.’ सुरभीच्या लग्नाचा खर्च असल्यामुळे गिरीशला ते शक्यही नव्हतं. आता जमुनेला मात्र त्यांनी स्वत: साडी आणली होती.
गावाला जायचा दिवस जवळ येऊ लागला. वेगवेगळे मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या-लोणची, कडबोळी, चकल्या तयार झाल्या. फारसं लक्ष न देणारा गिरीशही म्हणाला, `अम्मा, तू काही तिथं खाद्य-पदार्थांचं दुकान काढायला निघाली नाहीस! त्यातलं थोडं या मुलासाठीही ठेव ना!’
यावर त्यांनीही ठणकावून सांगितलं, `तुला हवं असेल तर विनितेला सांग! ती करुन देईल. शिवाय इथं दुकानं आहेत. तिथं जमुनाला कुणी नाही!’ आणि सगळं सामान नीट भरुन घेतलं.
जमुनाच्या माहेरकडूनही ढीगभर सामान आलं. गौरम्मांना आणखी आनंद झाला.
`ही पाहा चार रेशमी लुगडी आणि चार सुती लुगडी घेते. चार भारी साड्या घेते. पुरतील की नाही? बाळासाठी सोन्याची साखळी करुन घेऊ की नुसतं वळंच असू दे? इथून कुणी येणार असलं, तर त्यांच्याबरोबर काय पाठवायचं ते मी कळवेन. तेवढं पाठवून द्या.’
शामण्णांचा संयम सुटला.
`वर्षभरच कशाला, पाच वर्षं राहून ये मुलाकडे. तू काही चंद्रावर निघाली नाहीस! तुझ्यासारखी हजारो माणसं दररोज जात-येत असतात. तू निघशील त्या दिवशी निवांत झोप काढेन मी!’ शामण्णांचं हे बोलणं ऐकल्यावर तर गौरम्मांना रडू कोसळलं.
`जळला मेला आमचा जन्म! तुम्ही तर मला कुठंही नेलं नाही. आपल्या चंद्रूमुळे अमेरिकेला जायला निघाले! तुम्ही घरचे यजमान! तुम्हीच असं बोललं तर कसं?’
कधीही यजमान नसलेले शामण्णा तिथून उठून निघून गेले. विनिताही आत गेली. तिला आपलं गरोदरपण आठवत होतं. ते जाऊ दे, हर्षच्या बारशाच्या वेळी त्यांनी फक्त शंभर रुपये दिले होते. न जन्मलेल्या बाळाचं आतापासून कौतुक आणि डोळ्यांसमोरच्या नातवाकडे पूर्णपणे डोळेझाक! सतत तिथल्याच गोष्टी बोलत होत्या. इथल्या घराची किंवा नातवाची त्यांना काळजीच वाटत नव्हती. त्या एकदा तरी `विनिता, घराकडे आणि हर्षकडे नीट लक्ष दे. त्याच्यावर रागावू नकोस’ असं तोंडदेखलं का होईना, म्हणतील अशी विनितेची अपेक्षा काही पूर्ण झाली नाही. ती मनोमन दुखावली.
गौरम्मांना भेटायला सुरभी आणि सुरेश आले. त्यांनीही जमुनासाठी कोचमपल्ली साडी आणि तिच्या बाळासाठी खेळणी आणली होती. हर्षसाठी मात्र काहीही नव्हतं. विनितेनं तिकडेही दुर्लक्ष केलं. पण मनात कळ उठलीच.
रात्री सुरभीनं आईपुढे विषय काढला.
`अम्मा, हेही म्हणताहेत, आपणही अमेरिकेला जाऊ. तिथंच नोकरी करेन.’
गौरम्मा हरकून म्हणाल्या, `वा! फारच छान! सुरेश, तुम्ही लगोलग तिथं या. मीही असेनच.’
`तसं नव्हे अम्मा! तिथली परीक्षा दिल्यानंतरच तिथं नोकरी मिळते म्हणे. त्याशिवाय नोकरी मिळत नाही.’
`तुला कुणी सांगितलं हे?’
`यांनीच सांगितलं. लग्नाआधीच त्यांनी सगळी चौकशी करुन ठेवली होती.’
`तुझा नवरा हुशार आहे बाई! सहज पास होईल ती परीक्षा!’
`त्यासाठी खूप खर्च असतो, म्हणतात. तिथं येण्याचा विमानाचा खर्च. आम्हां दोघांनाही वर्षभर तिथं राहावं लागेल!’ सुरभी सावधपणे म्हणाली.
गौरम्मा मोठ्या विश्वासानं म्हणाल्या, `त्यात विचार कसला करायचा? चंद्रूचं घर आहेच ना? तिथं तुम्ही दोघंही राहा. असा कितीसा खर्च येणार आहे दोघांचा? विमानाच्या खर्चाच्या दृष्टीनंही चंद्रू मदत करेल. तुम्हांला नोकरी मिळाल्यावर द्या त्यांचे पैसे परत हवं तर!’
सुरभी साशंक स्वरात म्हणाली, `चंद्रू तयार झाला तरी जमुनावहिनी तयार होईल काय?’
`होईल तर! माझी खात्री आहे. श्रीमंत घरात वाढलेय ती! त्यामुळे मनाचा तेवढा मोठेपणा असेलच. शिवाय तिलाही सोबत होईल ना! सुरेश घरचा जावई. जमुना त्याच्याशी नम्रपणे वागेल. कशाला काळजी करता? मी स्वत: सांगेन ना त्या दोघांनाही!’
आईनं एवढं आश्र्वासन देताच सुरभी अमेरिकेची स्वप्नं बघत सुखानं झोपी गेली.
दुसरे दिवशी शामण्णांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी बजावलं, `तू यात अडकू नकोस गौरी! मुलांची लग्नं लावून दिली की आपली जबाबदारी संपली. कुणाला घरात ठेवून घ्यायचं आणि कुणाला नाही याचा निर्णय ज्याचा त्यानं घ्यायचा असतो. आपण कोण त्यांना सांगणार? स्वत:च्या हिमतीवर त्यांना चंद्रावर जायचं तर जाऊ दे. तू नसती जबाबदारी अंगावर घेऊ नकोस!’
`काहीतरीच काय तुमचं? बहिणीच्या नवऱ्याला मदत करायला आपला चंद्रू तयार होणार नाही असं तुम्हाला कसं वाटतं? एका वर्षाचा तर प्रश्न आहे. त्यानंतर ते नोकरी धरून वेगळेच राहणार आहेत.’
`तिथं कशी काय पद्धत आहे कुणास ठाऊक!’ शामण्णा म्हणाले.
`तुम्ही अमेरिका पाहिलीय काय? तुमचं हे नेहमीचंच आहे! उगाच काहीतरी खुसपट काढता! मी तर जमुनाला सांगणारच!’ गौरम्माचा स्वर कठोर झाला होता.
गौरम्मांना बेंगळूरहून निघतानाच गिरीगौडांची सोबत मिळाली. तेही चंद्रूच्या गावीच जाणार होते. त्यामुळे गौरम्मांच्या अमेरिका प्रवासाची सुरुवात तर निश्चिंतीनं झाली.
बेंगळूर-मुंबई-लंडन-न्यूयॉर्क-मिनिसोटा असा त्यांचा प्रवास होता.
एअर-होस्टेसनं दिलेला कुठलाही शाकाहारी पदार्थ गौरम्मांनी तोंडात घातला नाही. केवळ फळांचा रस पीत त्या प्रवास करीत राहिल्या.
त्यांनी आयुष्यात कधीही अंघोळ न करता जेवण केलं नव्हतं. एवढ्या लांबच्या प्रवासात अंघोळ करायला कुठून जमणार?
गौरम्मांचा हा पहिला विदेश प्रवास होता. त्याचबरोबर त्या पहिल्यांदा विमानात बसल्या होत्या. त्यामुळं त्यांना सगळं नवंच वाटत होतं. क्षाणोक्षणी त्या आश्चर्यचकित होत होत्या.
गिरीगौडांच्याही हे लक्षात आल्यामुळे सीटचा पट्टा बांधणं त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे टॉयलेट कसा वापरायचा वगैरे गोष्टी त्यांनी गौरम्मांना समजावून सांगितल्या.
एरोड्रमवर चंद्रूला पाहताच गौरम्मांना साऱ्या प्रवासाचा शिणवटा क्षणार्धात निघून गेल्यासारखं वाटलं. सारा कंटाळाही निघून गेला.
गिरीगौडाही `चंद्रू, माझी जबाबदारी संपली! तुमच्या आर्इंना तुमच्या ताब्यात दिलंय!’ म्हणत हसत निघून गेले.
चंद्रू गौरम्मांचं सामान गाडीत ठेवत होता. गौरम्मा लगेच उत्तेजित होऊन म्हणाल्या, `याच गाडीचा फोटो जमुनानं पाठवला होता ना रे चंद्रू?’
पाठोपाठ त्यांनी विचारलं, `अरे हो! जमुना का आली नाही एअरपोर्टवर?’
`ती कामावर गेलीय. यायला उशीर होईल तिला.’
`गर्भारशी! अजून कामावर जाते?’ गौरम्मांचा जीव कासावीस झाला.
`अम्मा, इथं डिलव्हरीच्या दिवसापर्यंत बायका कामावर जातात.’
`होय!’ त्यांना आश्चर्य वाटलं. मुलाच्या आलिशान गाडीत बसताना मात्र त्यांचं मन तृप्तीनं भरुन गेलं होतं.
चंद्रूनं आईभोवती सीट-बेल्ट बांधला.
`अरे काय हे? मी काय लहान बाळ आहे? काढ बघू हा पट्टा!’
`नाही, अम्मा! इथं तसा कायदाच आहे.’
मनात कुठं तरी जमुनाही प्रेमानं एअरपोर्टवर भेटायला येईल अशी अपेक्षा होती. ती भारतात आलेल्या प्रत्येक वेळी कितीही अडचण असली तरी त्या पोहोचवायला जायच्याच ना! तिची आई आली नाही तरी त्या जायच्या.
गाडी वेगानं धावत होती. काचेच्या खिडकीतून बाहेरचं जग दिसत होतं. ही अमेरिका! भूलोकीचा स्वर्ग हा! इथं येण्यासाठी कितीतरी माणसं वाट पाहत असतात! चंद्रूमुळंच आपल्याला इथं येणं शक्य झालं! केवळ चंद्रूमुळे! जर चंद्रूही गिरीशप्रमाणे तिथंच राहिला असता, तर आपल्याला या महान देशाचं दर्शनच झालं नसतं.
या भावनेनं गौरम्मा रोमांचित झाल्या.
विस्तीर्ण रस्ते, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोठाले वृक्ष, रस्त्यावर अगणित गाड्या! संपूर्ण वातावरणात फक्त गाड्यांचाच आवाज भरला होता. बाहेर रक्त गोठवणारी थंडी असली तरी आत सुखावह उबदार वातावरण! गाडीचं ऐश्वर्य बघून गौरम्मा चकित होऊन गेल्या.
आपल्या देशात आणि या देशात किती अंतर आहे! तिथली माणसांची गर्दी, त्यातून धावणाऱ्या सायकली, रिक्षा, बैलगाड्या, गाढवं, हातगाड्या आणि मोटारी. इथं त्यातलं काहीच दिसत नव्हतं. केवळ वेगानं धावणाऱ्या गाड्याच दिसत होत्या.
गौरम्मांनी पुराणांमध्ये नागलोक, पाताळलोक, किन्नर लोकांविषयी ऐकलं होतं. हा कुठला लोक?
चंद्रूच्या बोलण्यानं त्या भानावर आल्या.
तो चौकशी करत होता, `घरी सगळे कसे आहेत? हर्ष कसा आहे?’
`अतिशय खोडकर झालाय! मीही येणार म्हणून पदर धरुन रडत बसला होता. पण आजोबा येणार नाहीत म्हटल्यावर मीही येत नाही म्हणून गप्प बसला. यांचाही फार जीव आहे त्याच्यावर!’ त्यांनीही नातवाचं कौतुक केलं.
`खरंय! हर्ष नशिबवान आहे. आजी-आजोबांचं प्रेम मिळतंय त्याला! अण्णाही यायला हवे होते.’
`त्यांचा स्वभाव तुलाही ठाऊक आहेच. त्यांना काहीही नकोच असतं. इथं येऊन इथलं वैभव बघायला काय हरकत होती? अगदी संन्याशासारखं बोलतात. ते जाऊ दे. जमुनेचे बाळंतपणाचे दिवस केव्हा येतात?’
`बहुतेक पुढच्या आठवड्यात होईल. तू आल्यावर ती घरातच राहणार आहे. मुलगी छान पोसलीय असं डॉक्टर म्हणत होते.’
गौरम्मा निराश झाल्या.
`अरे, तू थोरला मुलगा. पहिला मुलगाच झाला असता तर बरं झालं असतं.’
`आपलं काय श्रीरामचंद्राचं राज्य आहे की काय? राज्य चालवायला राजकुमारच पाहिजे असं म्हणायला? आपण आपली चार चौघांसारखी माणसं. मूल नॉर्मल असलं तरी खूपच झालं.’
चंद्रूचे हे विचार टी. नरसीपूरमध्ये चौथीपर्यंत शिकलेल्या गौरम्मांना कसे समजणार?
भरपूर मोठं अंगण असलं तरी त्याला कंपाऊंड नव्हतं. घराभोवती भलं मोठं गवताचं लॉन होतं. अधूनमधून फुलांची झाडं दिसत होती. घराजवळ गाडी नेण्यासाठी सिमेंटचा रस्ता होता.
गौरम्मांच्या मनात आलं, कुठल्या ऑफिसपाशी आलो आपण?
त्या वेळी चंद्रू म्हणाला, `अम्मा, घर आलं. उतर.’
जयनगरमधल्या तीस बाय चाळीसच्या प्लॉटवर, अजिबात जागा न सोडता बांधलेलं छोटंसं घर- माडी असली तरी घर छोटंसं होतं- ते कुठं आणि हा भव्य राजवाडा कुठं! आपल्या मुलाचं हे घर! या घराच्या मालकाची मी आई! गौरम्मा अभिमानानं फुलून आल्या.
मुलाबरोबर पायऱ्या चढून दारापाशी आल्यावर दार उघडलं. जिनं दार उघडलं ती आपली सून जमुना? त्यांचा क्षणभर स्वत:वर विश्वास बसला नाही.
सुरभीच्या लग्नात पावलो-पावली रेशमी साड्या बदलणारी, अंगभर विविध दाग-दागिने घालून साक्षात लक्ष्मी भासणारी जमुना आणि या जमुनामध्ये कितीतरी अंतर होते.
केसांचा छोटासा बॉब, अंगात सैल डगल्याप्रमाणे लांबलचक गाऊन, रितं कपाळ, रिते हात, गळ्यात मंगळसूत्राचा पत्ता नव्हता, नाकात चमकी नव्हती. तिचा सावळा वर्ण मात्र उजळला होता. प्लेझर टाऊनमध्ये मासे विकणाऱ्या सर्वसामान्य बाईसारखी ती दिसत होती.
तिनंही हसत चौकशी केली, `अम्मा, बऱ्या आहात ना?’
`छान आहे!’- म्हणत गौरम्मांनी घरात प्रवेश केला.
त्यांच्या कल्पनेपेक्षाही तो परिसर वेगळा होता. त्यांना वाटलं होतं, आपल्याला पाहताच जमुना वाकून नमस्कार करेल. आपण आनंदानं बेंगळूरहून सांभाळून आणलेल्या अक्षता तिच्या मस्तकावर टाकत आशीर्वाद द्यायचा असं त्यांनी ठरवलं होतं. सून सकल-सौभाग्यसूचक आभरणे घालूनच आपलं स्वागत करेल अशी त्यांची खात्री होती.
जमुना आत निघून गेली. मऊ सोफ्यावर बसून गौरम्मा सूक्ष्मपणे सभोवताली पाहू लागल्या.
एखाद्या श्रीमंताचं ते घर दिसत होतं. जमिनीवर गालिचे, खिडक्यांना सुरेख भारी पडदे, भला मोठा रंगीत टी. व्ही., शोकेसमध्ये चांदी आणि चंदनाच्या शोभेच्या महाग-महाग वस्तू, शिसवी लाकडाचं भलं मोठं डायिंनग टेबल, भिंतीवर लटकणाऱ्या अनेक भारी वस्तू.
बेंगळूरच्या कृष्णप्पा सावकारांच्या घरापेक्षाही अधिक वैभव तिथं होतं.
जमुनानं विचारलं, `अम्मा, कॉफी देऊ?’
`नको गं बाई! अंघोळ केल्याशिवाय मी कधीच कॉफी प्यायले नाही. आधी मला न्हाणी-घर दाखव.’
जमुनानं त्यांना न्हाणीघर दाखवलं.
`इथं टॉयलेट आहे. इथं अंघोळ करून सोवळं कसं राखता येईल? नुसती अंघोळीची न्हाणी दाखव.’
जमुनेनं चंद्रूकडे पाहिलं.
`अम्मा, इथं असंच असतं. एकाच ठिकाणी दोन्ही असतं. आपल्याकडे जसा संडास आणि न्हाणी वेगवेगळे असतात तसं नसतं इथं. इथल्या प्रत्येक न्हाणीघरात अशीच व्यवस्था आहे.’
`म्हणजे? इथं आणखी न्हाणीघरं आहेत? एका घराला एका संडास आणि न्हाणी असते ना?’ गौरम्मांनी डोळे विस्फारून म्हटलं.
`तसं काही नाही. आपल्या घरात तीन आहेत. तू आपली डोळे मिटून अंघोळ कर बघू! म्हणजे टॉयलेट कमोड दिसणार नाही!’ चंद्रू हसत म्हणाला.
`चंद्रू, मी कधीही टबमध्ये अंघोळ केली नाही. एक बादली दे बघू! टबमध्ये बादली ठेवून अंघोळ करून घेते.’ गौरम्मांनी आपल्या परीनं त्यातून मार्ग काढला.
पण चंद्रूच्या घरी बादली नव्हती. आधी हा मुद्दा त्याच्याही लक्षात आला नव्हता. इंडियन स्टोअर्समधून बादली आणायची ठरवून त्यानं घरातल्या मोठ्या पातेल्यात समशीतोष्ण पाणी काढून आईला अंघोळ करायला सांगितलं.
थोड्या असमाधानानंच गौरम्मांनी अंघोळ उरकली आणि सोवळ्याचं लुगडं नेसून बाहेर आल्या. बाहेर अंधार होत आला होता. घड्याळ पाहिलं- चार वाजले होते.
`चंद्रू, एवढ्यात अंधार झाला?’
`होय अम्मा! इथं हिवाळ्यात असंच असतं.’
कॉफी प्यायल्यावर गौरम्मा घर बघायला उठल्या.
`आमचं अगदी सर्वसामान्य घर आहे. फक्त पाच बेडरुम्स आहेत. फक्त दोन गॅरेज आहेत-’ म्हणत चंद्रूनं सगळं घर फिरुन दाखवलं.
` प्रत्येक बेडरूममध्ये एकेक पलंग, त्यावर रेशमी आच्छादन, मऊ गादी, ड्रेसिंग टेबल- साऱ्याच वस्तू एकापेक्षा एक सुंदर होत्या. तरीही चंद्रू याला साधं घरच म्हणत होता!
`चंद्रू, अगदी राजवाड्यासारखं थाटाचं घर आहे तुझं!’
`अम्मा, इथं सगळ्यांची घरं अशीच असतात. अण्णा आम्हांला शाळेत शिकवायचे, ते आठवतं. मलय पर्वतावरच्या भिल्ल स्त्रिया चंदनाचीच लाकडं स्वयंपाक करण्यासाठी जाळतात म्हणे! तसंच आहे इथं!’
गौरम्मांच्या डोक्यात तो काय म्हणतो ते शिरलं नाही. जमुना त्यांना स्वयंपाकघरात घेऊन गेली.
किती स्वच्छ आहे स्वयंपाकघर! नव्यानं बांधल्यासारखं वाटतंय! मायक्रोवेव्ह, गॅस, ग्रार्इंडर, भला मोठा फ्रीज!
`जमुना, आणखी किती दिवस कामावर जाणार?’
`फक्त उद्या जाऊन येईन. बाळंतपणानंतर दोन महिन्यांनंतर पुन्हा कामावर जाईन.’
`लहान मूल म्हटल्यावर तू का नोकरी करायची? गिरीशचा बेताचा पगार आहे म्हणून विनिता मूल झालं तरी नोकरी करते. तुम्हाला काय कमी आहे? एवढा मोठा राजवाडा– दोन-दोन गाड्या!’
जमुनेनं चंद्रूला खूण केली- तुमच्या बावळट आईला समजावून सांगा अशा अर्थाची! चंद्रूच्या ते ध्यानात आलं. तो म्हणाला, `अम्मा, हत्तीचं ओझं हत्तीला आणि बकरीचं ओझं बकरीला! हे घर, या घरातलं सगळं फर्निचर, गाड्या सगळं काही हप्त्यानं घेतलं आहे. दर महिन्याला सगळ्यांचे हप्ते भरलेच पाहिजेत ना! आता तर तूही आहेस बाळाकडे बघायला. जमुनाचाही वेळ जात नाही. करु दे नोकरी. पुढंच पुढं बघता येईल.’
चंद्रूनं विषय संपवला. त्या निमित्तानं गौरम्मांना हप्त्याच्या व्यवहाराचा परिचय झाला. किती छान सोय आहे ही! आपल्याकडेही अशी सोय असती तर आपल्यालाही असंच थाटात राहता आलं असतं! दर महिन्याला हप्ते भरत राहिलो असतो!
दुसऱ्या दिवशी जमुना आणि चंद्रू नोकरीवर निघून गेले. त्या भल्या मोठ्या घरात गौरम्मा एकट्याच राहिल्या.
भारतात रात्र असेल तेव्हा इथला दिवस. इथं रात्र असताना तिथला दिवस त्यामुळे गौरम्मांना झोपेचा थोडा त्रास वाटला.
आता त्यांना सुरभीची आठवण झाली. एवढं मोठं घर आहे! जमुना नको म्हणणार नाही. सुरभीही जमुनाला मदत करेल, तिच्या मुलाला सांभाळेल. सुरभीलाही मुलांची भरपूर हौस आहे. बेंगळूरला आली की हर्षला क्षणभरही सोडत नाही. चंद्रूही नको म्हणणार नाही.
त्यांना जुनी आठवण आली. त्या चंद्रूच्या खेपेला बाळंतपणासाठी माहेरी गेल्या होत्या. दोन वर्षं तिथंच राहिल्या. कारण शामण्णा वर्षभरासाठी ट्रेनिंगला गेले होते. शामण्णांना आई-वडील कुणीच नव्हतं. गौरम्मांच्या भावानं आणि भावजयीनं गौरम्मा आणि चंद्रूला दोन वर्षं आपल्या घरी ठेवून घेतलं. एवढंच नव्हे, तर जाताना त्यांनी लुगडंही नेसवलं होतं. त्यांची परिस्थितीही फारशी बरी नव्हती.
सुरभीला येऊ नको म्हणायला यांना तर काहीही कारणच नाही!
सुरभी इथं आली की आपली दोन मुलं अमेरिकेत! मग मनात येईल तेव्हा इथं येता येईल.
या विचारानंच गौरम्मा हुरळून गेल्या.
गौरम्मांना येऊन आठवडा झाला होता.
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

चंद्रू त्यांना घेऊन डिपार्टमेंट-स्टोअरला जाऊन आला होता.
केवढं मोठं ते किराणा मालाचं दुकान! प्रत्येक पदार्थ नीट स्वच्छ करूनच ठेवला होता. काय त्या भाज्या! काय ते धान्य! काय ते विविध प्रकारचे फळांचे रस! दूध, दही, सरबत, पन्हं, ताक- सगळं काही तिथं मिळत होतं. विविध प्रकारचं आईस्क्रीम! पलीकडचा मांसाहारी पदार्थांचा विभाग वगळता गौरम्मांना दुकान फारच आवडलं. सारं बघताना दोन डोळे अपुरे पडताहेत असं जाणवलं.
आठवड्याभरात गौरम्मा हळूहळू घरात रुळल्या होत्या. स्वयंपाक करणं, मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणं- सगळं त्यांनी शिकून घेतलं होतं. थोडा-फार उष्ट्या-खरकट्याचा प्रश्न जाणवायचा- त्याहीपेक्षा खरा कंटाळा यायचा तो भांडी घासायचा!
बेंगळूरच्या गरिबीच्या संसारात निंगी धुणं-भांडी करून जायची. इथं मात्र त्यासाठी कुणीही नव्हतं. त्यामुळे वॉशिंग-मशीनमध्ये कपडे धुवायला सगळेच शिकले होते.
जमुना बाळंतीण होण्याआधी तिचं डोहाळजेवण करायची गौरम्मांची इच्छा होती. तिच्यापुढे ही इच्छा त्यांनी मांडली,
`जमुना, गावाहून मी मुद्दाम हिरवी साडी, हिरव्या बांगड्या आणल्या आहेत. कोचमपल्ली साडी सुरभीनंही पाठवली आहे. चकली, कडबोळी वगैरेही घेऊन आलेय मी. चार सवाष्णींना बोलाव एखाद्या संध्याकाळी. आरती करून ओटी भरता येईल.’
`अम्मा, ते कसं जमणार?’
`का गं?’
`वर्कींग डे असेल तर कुणीही येत नाही. बाळाच्या बारशालाच बोलवू या.’
गौरम्मांच्या उत्साहावर थंडगार पाणी ओतलं गेलं. तरीही त्यांनी तिला देवापुढे बसवून साडी आणि हिरव्या बांगड्या दिल्या. आरतीही केली.
पण जमुनानं हिरव्या साडीची घडीच मोडली नाही. हिरव्या बांगड्याही बॉक्समधून बाहेर आल्याच नाहीत.
गौरम्मांना मात्र याचं वाईट वाटलं.
प्रसूति-वेदना सुरू झाल्यावर जमुना रडू लागली. डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवशीच प्रसूति-वेदना सुरू झाल्या होत्या. गौरम्मा आपल्या पद्धतीनं तिची समजूत काढू लागल्या, `शांत राहा. स्वत:ला आवर. मलाही तीन मुलं झाली आहेत. हे दु:ख सोसावं लागतंच बाई माणसाला!’
पण जमुनेचं रडणं कमी झालं नाही.
एवढ्यात चंद्रू आला. त्यानं गाडी बाहेर काढली. गौरम्मांनी विचारलं, `मी येऊ काय रे?’
`नको अम्मा. तिथं फक्त मला आत सोडतात. मी नंतर दवाखान्यातून फोन करेन.’
चंद्रू आणि जमुना दवाखान्यात निघून गेले. गौरम्मांना हे सगळं विचित्र वाटत होतं. पण या देशात अशाच कितीतरी विचित्र वाटणाऱ्या पद्धती सर्वसामान्य मानल्या जात असाव्यात हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं होतं.
अखेर त्या फोनपाशी बातमी ऐकायला बसून राहिल्या. तिरुपतीच्या वेंकटरमणाला आणि नंजनगूडच्या नंजुंडेश्वराला नवस बोलून त्यांनी थोडे पैसे बांधून वेगळे ठेवून दिले होते.
चंद्रूचा फोन आला, `मुलगी नॉर्मल आहे. बाळंतपण सरळ झालं. दोघीही छान आहेत.’
संध्याकाळी गौरम्मा चंद्रूबरोबर बाळाला बघायला निघाल्या. बाळ आईसारखंच सावळ्या रंगाचं होतं. तिथल्या इतर गोऱ्यापान मुलांमध्ये तर तिचा सावळा रंग आणखी गडद वाटत होता.
तिसऱ्या दिवशी जमुना घरी आली.
गौरम्मा मनोमन अस्वस्थ झाल्या होत्या. खरं तर दहा दिवस सोयराचे असतात. ही तर घरभर सारं शिवते! खरोखरच यांना सोयर नाही आणि सूतकही नाही! सोवळं-ओवळं ठाऊकच नाही.
पण काहीही इलाज नसल्यामुळे त्या गप्प बसल्या.
बाळाला वेगळ्या खोलीत झोपवायची व्यवस्था करण्यात आली होती. पाळणाही विचित्र होता. बाळासाठी असंख्य खेळणी, रंगीबेरंगी पडदे, अनेक चित्रे वगैरे तयारी केली होती.
बाळाला त्याच्या खोलीत झोपवून जमुना आपल्या खोलीत जायला निघाली तेव्हा मात्र न राहवून त्या म्हणाल्या, `जमुना, एवढं लहान बाळ ते! एकटंच त्या खोलीत कसं गं झोपेल? पाहिजे तर माझ्यापाशी त्याला झोपू दे.’
`नको. उद्या तुम्ही गावाला गेलात तर मला त्रास होईल. आतापासूनच तिला वेगळं एकटीनं राहायची सवय करते.’ पुढं त्यांनी काही बोलू नये म्हणून ती तडक निघून गेली.
त्यांना हर्षची आठवण झाली. अगदी तान्हा असल्यापासून तो आजोबांच्या शेजारीच झोपायचा. त्यामुळे त्याला आजोबांचा खूपच लळा लागला होता. पहिल्यापासूनच लांब राहिलं तर लळा लागणार तरी कसा? वाढणार कसा?
जमुना बाळाला छोट्या टबमध्ये अंघोळ घालत होती. न राहवून त्या म्हणाल्या, `दे तिला. मी न्हाऊ घालते. तेलाचं कुठं आहे? मुलं तान्ही असताना तेल-पाण्यात आणि झोपेतच पोसली जातात.’
जमुनेला हे पटलं नाही. ती म्हणाली, `इथं मुलांना असं वाढवत नाहीत. मुलांना कसं वाढवावं यावर पुस्तकं मिळतात!’
गौरम्मा तान्ह्या बाळांना उत्तम न्हाऊ घालतात, हे त्यांच्या आळीत सगळ्यांना ठाऊक होतं. घरात बाळंतीण असली की, त्या घरातली प्रौढ बाई त्यांना आवर्जून भेटत असे आणि सांगत असे, `तुमच्यासारखं कुणीही न्हाऊ घालत नाही गौरम्मा! तुम्हाला वेळ असेल तर बाळाला न्हायला घालायला येता का थोडे दिवस?’ मग गौरम्माही मोठ्या प्रेमानं दररोज बाळाला न्हाऊ घालायला जात.
अशा प्रकारे त्यांनी कितीतरी बाळांना न्हायला घातलं होतं. ही मुलं मोठी होऊन परीक्षांमध्ये पास झाली की, त्यांच्या आया मुलांना घेऊन येऊन गौरम्मांना नमस्कार करायला लावत आणि आवर्जून सांगत, `तुम्ही न्हाऊ-माखू घातलं ना? आता पास झालाय बघा!’
गौरम्माही एखादं पुण्यकार्य केल्याच्या भावनेनं हे सारं करत होत्या. अजूनही हर्षलाही त्यांनीच न्हायला घातलं होतं. आजही विनितेला सासूसारखं मुलाला न्हायला घालता येत नाही.
एकाएकी गौरम्मांना वाटलं, `मी इथं निघून आले, हर्षला कोण न्हाऊ घालत असेल?’
दोन महिने झाले आणि जमुनेचं बाळंतपण संपलंच. ओळखीच्या काही कुटुंबांना बोलावून मुलीचं बारसं करायचं जमुनेनं ठरवलं होतं.
गौरम्मा उत्साहानं खाद्यपदार्थ करण्याचा विचार करू लागल्या. त्या पद्धतीनं त्या कामालाही लागल्या. तीसेक माणसं अपेक्षित होती. शनिवारी संध्याकाळी कार्यक्रम ठरला होता. सगळ्यांसाठी शिरा, बिशीबेळे हुळी अन्न, पुरी असा बेत ठरला. त्या तयारीला लागल्या.
मुलीचा शुक्रवारचा जन्म असल्यामुळे एखादं लक्ष्मीचं नाव ठेवावं ही गौरम्मांची अपेक्षा होती. पण त्यांच्या अपेक्षेची चौकशी कोण करणार? हॉस्पिटलमध्ये असतानाच बाळाचं नाव `मानसी’ म्हणून नोंदलं होतं
हा फक्त नावापुरता बारशाचा विधी होता.
ठरलेल्या वेळी माणसं जमली. जमलेल्यांपैकी थोडी माणसं उत्तर भारतातली आणि काही कर्नाटकातली होती. काही तमीळ माणसंही होती. सगळे भारतीयच होते, पण सगळ्यांच्या मधली संभाषणाची भाषा मात्र इंग्लिश होती.
मानसीसाठी अनेक प्रकारच्या भेटवस्तू आल्या होत्या. काही लहानसे फ्रॉक्स पन्नास डॉलर्स एवढ्या किंमतीचे होते! गौरम्मांना तर वाटलं, एवढ्या पैशांत उत्तमपैकी रेशमी परकर-पोलकं, तेही मोठ्या मुलीचं, आलं असतं. नाहीतर सोन्याची चेन आली असती.
कार्यक्रम संपला. चंद्रू गाडी स्वच्छ करण्यासाठी बाहेर गेला. जमलेली मित्रमंडळी समाधानानं निघून गेली होती. जमुनाही दमली होती. बाळाला झोपवून ती उमाबरोबर ड्रॉर्इंग रुममध्ये पाय पसरुन निवांत बसली होती. गौरम्मा दमून झोपल्या होत्या.
उमा जमुनेची कन्नड भाषिक मैत्रीण. दोघींच्या गप्पा चालल्या होत्या.
उमा म्हणत होती, `जमुना, या वर्षी मुलगी झाली ना! पुढच्या वर्षी मुलगा होऊ दे. म्हणजे घर भरुन जाईल!’
`नको गं बाई! अजिबात नको.’
`का? तुला काय कमी आहे?’
`आमचं काय विशेष? चार-चौघांसारखी आम्हीही सामान्य माणसं. आम्हांला तर लहान कुटुंबच आवडतं.’
`का गं? मला म्हणतेस ते?’
`आमच्या घरी आम्ही दोघंच भावंडं. माझ्या आईलाही फार नातेवाईक आलेलं आवडायचं नाही. त्यामुळे कुणी आलं तरी रात्री आम्ही त्यांना घरात राहायचा आग्रहच करत नव्हतो. नाही म्हटलं तरी प्रायव्हसी जाते. काही म्हण! नातेवाईकांच्या भेटी लग्नघरातच ठीक आहेत!’
`हो बाई! मलाही तसंच वाटतं!’ जमुना म्हणाली.
`गेल्या महिन्यात माझा दीर कामासाठी म्हणून आला होता तो एक महिनाभर राहिला. इतका वैताग आला म्हणून सांगू! आपल्याला याच आयुष्याची सवय झालेली असते. आठ दिवसांचा एकदम स्वयंपाक करुन ठेवायचा आणि रोज त्यातलं गरम करुन खायची आपली सवय! या लोकांना ते आवडत नाही. गावाकडे जाऊन `वहिनीनं शिळं अन्न वाढलं’ म्हणून सांगतील! मला तर असे कुणी फार दिवस राहायला आले की कधी जातील असं होऊन जातं!’ उमा म्हणाली.
`खरंय तुझं! कशाचाही अतिरेक चांगला नव्हे. जमेल तेवढे डॉलर्स उचलून दिले तर कौतुक होतं. पण घरात कुणी शिरलं तर मात्र भांडण-वाद-मानसिक त्रास होतो. म्हणून मला एकत्र राहणं अजिबात आवडत नाही. शिवाय मला तशा प्रकारचा त्रासही नाही.’
`ते कसं?’
`माझा दीर एका किरकोळ नोकरीत आहे. त्याची इथं यायची ताकदच नाही! विमानाचा खर्च कसा करणार? नणंदेचा नवरा बँकेत चांगल्या पोस्टवर नोकरी करतो. तेही इथं येणार नाहीत. कुणी इथं येणार-राहणार-शिकणार म्हटलं तर मात्र खरोखरच वैताग आहे.’
गौरम्मा दमल्या असल्या तरी त्यांना झोप आली नव्हती. त्या दोघींच्या गप्पा त्या ऐकत होत्या. जमुनाही आपल्या मनातलं मोकळेपणानं बोलत होती.
त्या गप्पांमधून एक मात्र निश्चित झालं-सुरेशला जमुना शिक्षणासाठी आपल्या घरी ठेवून घेणं शक्य नाही. सुरभीला बोलावून घ्यायचा तर प्रश्नच नव्हता.
चंद्रू काय करेल? बायकोच्या विरोधात राहून तो कधीही आपल्या बहिणीला किंवा मेहुण्याला मदत करणं शक्य नाही. चंद्रूच्या स्वभावात ते बसतच नाही. गिरीशच्या स्वभावात आणि याच्या स्वभावात फार अंतर आहे. कितीतरी वेळा गिरीश विनितेचं काहीही ऐकत नसे. त्यानं स्वत: काहीतरी ठरवलं तर कुणी काही म्हटलं तरी तो स्वत:चंच खरं करायचा.
पण एका दृष्टीनं पाहिलं तर चंद्रूचंही बरोबरच नाही काय? एवढ्या लांब राहायचं, जवळपास कुणी नातेवाईक नाहीत. नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा अशी परिस्थिती. अशा वेळी असं जमवून घेतलं तरच संसार चालायचा. संसारात भांडणंही कमी होतील. भारतात मात्र बायकोबरोबर भांडून आलेल्या मुलाचं आई आनंदानं स्वागतच करते. बायकोशी जुळवून घे असं कधीच सांगत नाही! एवढं सामाजिक पद्धतीचं वैयक्तिक आयुष्यावर दडपण येतं. तिथून बाहेर पडून इथं आलेले नवरे मात्र आपल्या बायकांचं म्हणणं ऐकतात असं दिसतं.
नेहमीप्रमाणे `युगादि’ म्हणजे गुढीपाडवा आला.
पण बेंगळूरमधला `युगादि’ आणि अमेरिकेतला `युगादि’ यांमध्ये पराकोटीचा फरक होता. स्वाभाविकच आहे म्हणा! त्यात हा गुढीपाडवा `वर्कींग डे’ला आल्यावर कोण काय करणार?
गौरम्मांनी स्वत:च्या सोयीसाठी राघवेंद्रस्वामींच्या मठाचं पंचांग आणलं होतं. त्याच्या मदतीनं त्या आजच गुढीपाडवा असल्याच्या निर्णयापर्यंत आल्या.
घरात कुठल्याही प्रकारचं सणाचं वातावरण नव्हतं.
सकाळी उठून चंद्रूनं आपल्या वाट्याची कामं केली होती. भांडी, कपबशा, ग्लास धुऊन जागच्या जागी ठेवले. त्यानंतर त्यानं कपड्यांना इस्त्री केली.
इथं आल्या-आल्या गौरम्मांना पुरुष मुलानं-तेही अमेरिकेत राहणाऱ्या पुरुष मुलानं स्वयंपाकघरात भांडी घासणं, भाजी चिरणं, बायकोला मदत करणं पाहून मनस्ताप होत होता. एकदा असं झालं-
`हे काय रे चंद्रू! आपल्या घरी कुणा पुरुषानं असली कामं केल्याचं कधी पाहिलंयस काय?’
`अम्मा, तिथं कामाला माणसं मिळतात. तिथं तुम्ही पुरुषांचे जरा जास्तच लाड करता!’
जमुना चिडली. रागाच्या भरात तिनं बाळाचा हात ओढला. बाळ रडू लागलं. ती म्हणाली, `भारतात असताना मला तरी काय येत होतं? मी नाही का इथं येऊन शिकले? घरातली सगळी कामं मीच करायची काय?’
जमुनाचा संताप पाहून गौरम्मा घाबरल्या.
तिच्या जागी विनिता असती तर? एक तर तिनं अशी दुरुत्तरं दिली नसती आणि गौरम्मांनी ती ऐकून घेतली नसती!
तरीही त्या म्हणाल्या, `काही का असेना जमुना! मी इथं असेपर्यंत त्यानं स्वयंपाकघरातलं काम करायला नको. त्याच्या वाटणीचं जे काही काम असेल ते मला सांग. मी करेन. घरच्या मुलानं काम करणं मला बघवत नाही.’
`तुम्ही असेपर्यंत तुम्ही कराल. त्यानंतर त्यांनीच करायला हवीत ना? शिवाय ते काही एकटेच जगावेगळं काही करत नाहीत!’ जमुनेची भांडणाची खुमखुमी अजूनही होती.
गौरम्मा अपमान सहन न होऊन धुमसत म्हणाल्या, `सासूला उलट उत्तरं देतेय! आमचा गिरीश स्वयंपाकघरात फिरकत सुद्धा नाही. त्याला पाणी हवं असलं तरी आम्हीच बाहेर देऊन येतो! विनिता संध्याकाळचं सगळं काम करते. बाहेर कितीही काम केलं तरी घरातली कामं बायकांनीच करायची असतात.’
अठ्ठावन्न वर्षांच्या, फारसं शिक्षण न घेतलेल्या, फारसं जग न पाहिलेल्या आईबरोबर उगाच भांडण कशाला, असा विचार करून चंद्रू मध्येच म्हणाला, `जमुना, तुला उशीर होतोय! तू चल पाहू! अम्मा, भांडी विसळणं, भाजी चिरणं यातली काहीही कामं मी तू असेपर्यंत करणार नाही. पण इतर कामं मला करू दे.’
`असं का म्हणतोस?’
`ही अमेरिका आहे अम्मा! भारताप्रमाणे इथं कामाला माणसं मिळत नाहीत. मिळाले तरी त्यांना दर तासाला पाच डॉलर द्यावे लागतात! मला ते कसं परवडणार? शिवाय जमुना म्हणाली त्यात काय चूक आहे? हे घर माझंही आहे ना? माझ्या घरचं काम मी केलं तर काय चुकलं?’
डॉलर आणणाऱ्या मुलाबरोबर गौरम्मा वाद कसा घालणार?
हा मागचा प्रसंग आठवणीत असल्यामुळे त्यांनी मुलगा काम करत असला तरी तिकडे काणाडोळा केला. इस्त्री करायच्या कपड्यांच्या ढिगामध्ये बायकोची पोलकी, ब्लाऊज, स्कर्ट बघून त्यांना वैताग आला तरी त्या गप्प बसल्या.
आंब्याच्या पानांचं तोरण नाही, कडुलिंब आणि गुळाचा पदार्थ नाही, नव्या कोऱ्या वस्त्रांची सळसळ नाही, पोळ्यांचा खमंग वास नाही, पंचागाची पूजा नाही, जवसाची शेतं नाहीत- हा कसला गुढीपाडवा?
आईच्या मन:स्थितीचा अंदाज घेत चंद्रूनं कपड्यांना इस्त्री करत विचारलं, `काय विशेष, अम्मा?’
`आज गुढीपाडवा!’
`होय? इथं आल्यापासून सगळे सण विसरले गेलेत बघ! जमुना, तुझा काय प्रोग्रॅम?’
बाळाला डायपर बांधत ती उत्तरली, `आज काही नाही. या वीक-एंडला जयाच्या घरी युगादि साजरा केला जातो ना? त्याचीच चौकशी करेन.’
`असं कसं? आज गुरुवारी युगादि आहे. शनिवारी कसा युगादि येईल?’
`इथली हीच पद्धत आहे. फक्त युगादिच नव्हे, दिवाळी-दसरा-गणपती-संक्रांत सगळेच सण त्या त्या आठवड्याच्या वीक-एंडलाच साजरे करायचे.’
हे ऐकून गौरम्मा अवाक् झाल्या.
`सगळे सण अशाच प्रकारे वीक-एंडला जयाच्याच घरी करता का?’
`इथं प्रत्येकानं एकेक सण वाटून घेतला आहे. जयाकडे युगादि, उमाकडे गणेशचतुर्थी, सुधाकडे संक्रांत अशाप्रकारे प्रत्येकजण–’ चंद्रूनं समजावून सांगितलं.
`होय? तर मग तुमचा सण कुठला?’
`अजून तरी कुठलाही सण केला नाही. आता तर सगळे सण बुक्ड आहेत.’
चंद्रू ऑफिसला निघून गेला.
घर `व्हॅक्यूम’ करण्यासाठी जमुना बेसमेंटमध्ये गेली.
गौरम्मा जमुनेच्या स्वभावाचं निरीक्षण करत होत्या. आपल्या कुवतीनुसार तिला जाणून घ्यायची त्यांची धडपड चालली होती.
बेंगळूरला आल्यावर हीच जमुना मनमोकळी आणि गपिष्ट वाटत होती. इथं मात्र ती घुम्यासारखी वाटत होती. चंद्रू तिचं सगळं ऐकत होता. बेंगळूरला आल्यावर पाण्याप्रमाणे खर्च करणारे चंद्रू आणि जमुना डॉलर खर्च करताना अत्यंत कंजूषपणे वागत होते. पाच डॉलर वाचवण्यासाठी वीस मैल ड्राइव्ह करून जात होते!
वीक-एंड सोडला तर यांना वेळच नव्हता. दोघं सतत कामात असत.
तसं बघायला गेलं तर त्यात काय चूक आहे? कामाच्या दिवशी सण साजरा करत वेळ काढणं कसं शक्य आहे? भारतात सणाची सगळ्यांनाच सुटी असल्यामुळे ते शक्य असतं. इथं तसा सगळ्यांचा सण म्हणजे ख्रिसमस. तेव्हा सगळ्यांनाच सुटी असते. आपलं घरदार, भावंडं, नातेवाईक, मित्रमंडळी, परिसर- सगळ्यांपासून दूर असणारी ही मंडळी सगळ्यांच्या सोयीच्या दिवशी सण साजरा करत असतील तर त्यात काय चुकलं?
वीक-एंडला सगळे `युगादि’च्या सेलिब्रेशनसाठी उत्साहानं जयाच्या घरी जायला निघाले.
जमुनाही तयार झाली होती. मोठ्या काठाची रेशमी साडी, हिऱ्याची कानातली, हातात वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यात नाना प्रकारची आभूषणे घालून एका मोठ्या चांदीच्या भांड्यात तिनं केशरी भात करून घेतला.
तिला या थाटात पाहताच गौरम्मा चकित झाल्या. लग्नघरातल्या नवऱ्या मुलीनं रिसेप्शनच्या वेळी नटावं, तेवढं, अंहं- त्यापेक्षाही जास्तच जमुना नटली होती. अगदी काढायचंच म्हटलं तर, केसांतल्या भरगच्च गजऱ्याची तेवढी कमी होती!
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

मुलींनी चांगले कपडे घालावेत, दागिने घालावेत अशी गौरम्मांना नेहमीच हौस होती. तरीही जमुनेचं नटणं पाहून मात्र त्यांना `हे थोडं जास्तच झालं!’ असं वाटलं.
तरी त्या काही बोलल्या नाहीत. उगाच डॉलर-सुनेच्या उत्साहावर पाणी फिरायचं! हळूहळू गौरम्मा सावध होत होत्या.
चंद्रू मात्र हे नेहमीचंच असल्याप्रमाणे तिकडे फारसं लक्ष देत नव्हता.
जयाचं घर खूपच मोठं होतं. स्विमिंग पूल, टीव्ही रुम, स्टडीरुम, लायब्ररी- अशा आणखी अनेक व्यवस्था तिच्या घराला होत्या. या गावातील सर्व भारतीयांमध्ये जयाच सर्वांत श्रीमंत असल्याचं दिसत होतं. पण तिच्या वागण्या-बोलण्यात कसल्याही प्रकारचा गर्व दिसत नव्हता.
भल्या मोठ्या हॉलच्या मधोमध लाकडी पाटावर नंदादीप ठेवला होता. मोठ्या मापट्यामध्ये तांदूळ भरले होते. कडुलिंब-गूळ नसला तरी वातावरणात सणाचा उत्साह भरला होता. रंगीबेरंगी कागदांनी हॉल नटवला होता. जयाच्या दोन्ही मुली सुंदर जरीची परकर-पोलकी लेवून आणि सोन्याचे दागिने घालून राजकुमारींसारख्या दिसत होत्या. तिथं आलेले भारतीय वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत असले तरी मुलं मात्र परस्परांशी इंग्लिशमध्ये बोलत होती.
तिथं आलेल्यांपैकी बऱ्याच बायका जमुनासारख्या नटल्या होत्या. प्रचंड किंमती साड्या, हिऱ्याचे आणि सोन्याचे भारी दागिने, गळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे हार!
गरीब मास्तरांची पत्नी म्हणून आयुष्य काढलेल्या निरलंकार गौरम्मा- होय, हातातल्या दोन बांगड्याही त्यांनी याच सुनेला दिल्या ना!- भेदरून जाऊन सभोवताली पाहत होत्या.
त्यांच्या अल्प ज्ञानाप्रमाणे बेंगळूरमधलं `प्रतिभा-नंदन ज्वेलरी’च दागिन्याचं सर्वांत मोठं दुकान होतं. पण इथं असलेल्या प्रत्येकीचे दागिने एकत्र केले तर तसली आठ-दहा दुकानं तयार होतील! त्यांच्या अंगावरच्या भारी साड्या एकत्र केल्या तर चिकपेटेतल्या कुठल्याही दुकानातल्या भारी साड्यांपेक्षा जास्त किंमतीच्या भरतील! काय हे वैभव! गौरम्मा अवाक् होऊन सारं ऐश्वर्य पाहत होत्या. स्टेपकट, थोडी लालसर छटा, छोटंसं कुंकू, अंगावर भारी साडी नेसलेली एक युवती गौरम्मांकडे येऊन म्हणाली, `तुम्ही मला ओळखलंत का?’
गौरम्मांनी निरखून पाहिलं. कुठंतरी-कधीतरी पाहिल्याचं अस्पष्ट आठवत होतं.
`नाव आठवत नाही. पण कुठंतरी पाहिलंय खरं!’
तीही मंद हसत म्हणाली, `मी तुमच्या यजमानांची विद्यार्थिनी. चित्रा माझं नाव. लहान असताना मी तुमच्या घरी खूप वेळा यायची. फार पूर्वी!’
विस्मरणाचा खडक बाजूला सरला. `अरेच्चा! तू चित्रा!’ त्या म्हणाल्या. पण मनात आश्चर्य उमटलं. ही त्या वेळी कशी होती! सडसडीत बांबूच्या बाहुलीसारखी! आता कशी दिसतेय! रसरशीत टोमॅटोसारखी!
त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत ती आणखी म्हणाली, `मी शंकरण्णांची मुलगी चित्रा! आता खूपच वेगळी दिसतेय ना? तुम्ही मला खूपच दिवसांनी पाहताय!’
गौरम्मांच्या मनाचा आणखी गोंधळ उडाला.
शंकरण्णांची मुलगी चित्रा आणि इथं? हिच्या लग्नाला शामण्णा मास्तर गेले होते. नंतर ती विधवा झाल्याची बातमीही ऐकल्याचं गौरम्मांना आठवत होतं!
चित्रानंच पुढं विचारलं, `अम्मा, सर चांगले आहेत? ते का आले नाहीत?’
`पुन्हा कधीतरी येतील ते.’
चित्रानं विचारलं, `अम्मा उद्या रविवारी सकाळी आमच्या घरी याल काय?’
`तूच मला घेऊन जायला पाहिजेस!’ गौरम्मा उत्साहानं म्हणाल्या. आपली भाषा बोलणाऱ्यांच्या घरी जायचा उत्साह तर होताच, त्याचबरोबर ही चित्रा इथं कशी आली हे जाणून घेण्याची उत्सुकताही प्रबल होती.
`मी येईन तुम्हांला घेऊन जायला! तुमच्या सुनेकडून तुमचा पत्ता घेते–’
चित्रा टेबलावर ठेवलेलं हळद-कुंकू, ओटीचं पाकीट, लालहिरवी सफरचंद, खाऊची पिशवी घेऊन निघून गेली.
जयानं सगळ्यांसाठी जिलेबी, बेसन लाडू, खारी बुंदी या पदार्थांची पाकिटं तयार करुन ठेवली होती. शिवाय घरी आलेल्यांना बिशीबेळे अन्न, दहीभात, सॅलड वगैरे खायलाही ठेवलं होतं.
सगळे निघाले. जयानं प्रत्येकाचा निरोप घेतला. तेव्हा न राहवून गौरम्मा म्हणाल्या, `तुम्ही एकटीनं एवढा सगळा स्वयंपाक केला? सुमारे दोनशे माणसं तरी जमली असतील! मला बोलावलं असतं तर आले असते मदतीला!’
गौरम्मांचं ते मनापासून बोलणं ऐकून जयाला आनंद झाला.
`आंटी, मी शिकॅगो स्वीट होमला ऑर्डर दिली होती. मला एकटीला एवढं सगळं जमणं कसं शक्य आहे?’
`तसं नव्हे. आजचा स्वयंपाकही मोठं काम होतं.’
`होय, देवळातल्या पुजाऱ्यांच्या पत्नीला सांगितलं होतं. त्या आल्या होत्या. त्यांनीच सारं करुन ठेवलं होतं. आंटी, तुम्ही आणखी एखाद्या दिवशी या! आज सगळ्या गोंधळात नीट गप्पाच झाल्या नाहीत!’ जयाच्या बोलण्यातून भरपूर प्रेम व्यक्त होत होतं.
गाडीतून घरी परतताना बाळ झोपलं होतं.
गौरम्मांनी विचारलं, `चंद्रू, जया दरवर्षी एवढा खर्च करून युगादि सण साजरा करते?’
`होय. मी आल्यापासून पाहतोय. त्याच करतात.’
`त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे! कितीही खर्च केला तरी संपणार नाही एवढा पैसा! मोठेपणा दाखवायला म्हणून त्या मुद्दाम पुढाकार घेतात!’
जमुना असूयेनं म्हणाली.
`तसं नव्हे जमुना! या देशात पैसा कमी आहे असा कोण आहे? तरीही आपापल्या माणसांसाठी तिनं केलं ना? मग `होय तिनं केलं’ एवढं तरी आपण म्हटलं पाहिजे.’ गौरम्मा सौम्यपणे म्हणाल्या.
हेच विनितेनं म्हटलं असतं तर त्यांनी रागावून हेच सांगितलं असतं की नाही! हा भेद का?
`चंद्रू, उद्या शंकरण्णांची मुलगी चित्रा मला घेऊन जाणार आहे आपल्या घरी!’
`अम्मा, तुझी कशी तिच्याशी ओळख?’
`तुला आठवत नाही? आपल्या शाळेत शंकरण्णा शिपाई म्हणून काम करायचा. त्याची मुलगी चित्रा. तिला तिच्या मामाला दिली होती.’
`कुणाविषयी बोलताय? चित्रा जोसेफविषयी?’ मध्येच जमुनानं विचारलं.
`नाही. शंकरण्णांच्या मुलीविषयी.’
`मला ते काही ठाऊक नाही. पण आज तू जिच्याशी बोलत होतीस, ती चित्रा जोसेफ होती एवढं मला ठाऊक आहे.’ चंद्रू म्हणाला.
जमुनाही म्हणाली, `होय. मलाही पक्कं ठाऊक आहे. आधी ते लॉसएंजिल्सला होते. आता इथं आले आहेत. जया सगळ्या इंडियन्सना बोलावत असते.’
आता गौरम्मा गडबडल्या. एखाद्या रहस्यमय कादंबरीसारखी वाटत होती ही चित्राची कथा!
`अम्मा, तू आपण होऊन चित्राला तिच्या खाजगी आयुष्याविषयी विचारु नकोस. काय आहे कोण जाणे! उगाच दुखावल्या जातील!’ चंद्रूनं आईचा स्वभाव ठाऊक असल्यामुळे बजावलं.
दुसरे दिवशी चित्रा आली. आजचा तिचा वेश आणखी वेगळाच होता. जीन्स पँट आणि टी शर्ट अशा वेशात ती होती. कपाळावर कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र होतं.
`तुमच्या अम्मांना घेऊन जाणं आणि पुन्हा आणून सोडणं ही माझी जबाबदारी’ एवढंच जमुनाला सांगून त्यांनी गाडीचं दार उघडलं. गौरम्मा विस्मित होऊन तिच्या पाठोपाठ निघाल्या.
हजार प्रश्न जिभेच्या टोकावर आले होते. तरी गौरम्मांनी स्वत:ला मोठ्या कष्टानं आवरलं होतं.
उलट चित्राच लाह्या फुटाव्यात तशी पटपट बोलत होती. बोलायला ती आसुसलेली दिसत होती.
`अम्मा, तुम्हांला बघितलं आणि माझीच आई आल्यासारखं मला वाटलं. कितीतरी वर्षं झाली होती तुम्हांला भेटून!’
`पण तू केव्हा आलीस इथं?’
गाडी इंडियन स्टोअरपाशी उभी करत चित्रा म्हणाली, `सहा वर्षं झाली. या गावातलं इंडियन स्टोअर काही फारसं मोठं नाही. पण बरंच सामान इथं मिळतंय.’
सामोसे-लाडवासारखे खाद्दपदार्थ, उत्तर भारतातल्या पद्धतीनं बनवलेल्या अनेक भाज्या, पालक पनीर, चना यांसारख्या भाज्या तयार करुन फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. तिथं कन्नड-तेलुगू-तामिळ असा फरकही नव्हता.
`अम्मा, तुम्हांला जेवायला काय हवं ते सांगा. आपण घेऊन जाऊ या.’
`मला काल रात्रीचंच जेवण जास्त झालंय. तशी सवय नाही ना! फळं आणि दूध एवढंच पुरे मला.’
चित्रानं आंबा आणि फणसाचे टिन घेतले आणि त्या पुन्हा पुढं निघाल्या.
`चित्रा, सिनेमाची कॅसेट घेतलीस काय? कुठला सिनेमा?’
`अम्मा, आपल्याला सिनेमाच्या कॅसेटची गरज नाही. माझं आयुष्यच एक सिनेमाची कथा आहे. तुम्हांला ठाऊक असेल ना?’
`नाही.’
चित्रा मनमोकळेपणानं बोलू लागली.
`मी पी. यु. सी. ला चांगले गुण मिळवून पास झाले. अप्पा सतत आजारीच असायचे. दम्याचा त्रास होता. घरची गरिबी. त्यात मीच थोरली मुलगी. कॉलेजला कोण पाठवणार? लवकर लग्न करुन सगळ्यांनाच जबाबदारीतून मोकळं व्हायचं होतं.’
`होय. मेलकोटेमध्ये झालं ना तुझं लग्न? हे, शाळेतले इतर मास्तर, मॅडम मेलकोटेला तुझ्या लग्नासाठी गेल्याचं आठवतं मला.’
`होय. तुमची स्मरणशक्ती फारच चांगली आहे. माझ्या मामाशीच- मानप्पा त्याचं नाव- माझं लग्न लावून देण्यात आलं. तेव्हा मी होते सतरा वर्षांची.’
`अगदीच अजाण वय ते!’
`मानप्पा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे होते. त्याला दारुचं व्यसन होतं. शिवाय जुगारही खेळायचा. हे सगळ्यांना ठाऊक होतं हं! तरी घरात कुणीही या लग्नाला विरोध केला नाही! उलट सगळे म्हणत राहिले- मीच फार नशीबवान. हुंडा, खर्च न करता नवरा मिळाला!’
मागच्या आठवणींमुळे चित्राच्या डोळ्यांमध्ये पाणी साचलं होतं. त्या वेळच्या मानसिक वेदनेनं आताही तिचं मन पिळवटून गेलं होतं.
मानप्पाला शिक्षणाचा गंधही नव्हता. बेंगळूरमधली तरतरीत आणि हुशार मुलगी त्याच्याकडे कशी नांदली कुणास ठाऊक! अखेर दारुच्या नशेत सायकल चालवताना ट्रकवर आदळून तो मृत्यू पावला.
चित्रा पुढं सांगत होती, `मानप्पा वारला तेव्हा मी अठरा वर्षांची होते. लग्न झाल्या झाल्या वर्षभरातच कुंकू पुसलं गेलं. नतद्रष्ट नक्षत्रावर जन्मलेली अपशकुनी मुलगी म्हणून सगळ्यांनी दोष दिला. माझी सासू माझी आजीच होती ना! पण तिनं सासू होऊनच मला भरपूर छळलं.’
`होय. त्या वेळी यांनीच तुझ्या वडिलांना सांगून तुला बेंगळूरला घेऊन यायला सांगितलं ना!’
`खरंय अम्मा! त्या वेळी सरांनी जे उपकार केले, ते मी आयुष्यात विसरणार नाही. नाहीतर आजही मी मेलकोटेमध्ये उष्टी-खरकटी भांडी घासत राहिले असते!’
`तू बेंगळूरमध्ये असताना टायपिंग क्लासला जात होतीस ना?’
`तीही तुमचीच दया! तुम्हाला ते आठवतंय की नाही कोण जाणे! मला मात्र आठवतंय. सर दरमहा पंधरा-वीस रुपये द्यायचे. त्यामुळे मी टायपिंग शिकले.’
हे मात्र गौरम्मांना ठाऊक नव्हतं. शामण्णांनी हे घरी सांगितलं नव्हतं. पण हे शामण्णांच्या स्वभावानुसारच होतं. चार पैसे देऊन त्यांनी शंकरप्पाला `तिला काहीतरी शिकव-तिला स्वत:च्या पायावर उभी राहू दे’ असं बजावलं असलं पाहिजे.
`तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळे मी आज इथं आहे. टायपिंग संपल्यावर मला तिथं लहान नोकरी मिळाली. चारशे रुपये पगार होता. पण काम भरपूर असायचं. याच वेळी वडिलांची नोकरी संपली. आम्ही गावाच्या दुसऱ्या टोकाला राहायला गेलो. त्यामुळे तुमच्याशी भेटी होण्याचं प्रमाणही कमी झालं.’
`होय. पुढं तुझ्याविषयी काहीच समजलं नाही.’
गाडी काही वेळ मूकपणे धावत राहिली. रस्ता यांत्रिकपणे मागे पडत होता. खिडकीबाहेरचं जग बघायची गौरम्मांची हौस राहिली नव्हती. त्यांच्या मनात चित्राच्या जीवनाविषयीचे विचार तरळत होते.
गरिबीमुळे गांजलेली चित्रा, विधवा चित्रा, टायपिस्ट चित्रा- आत्ता समोर असलेल्या चित्राचं स्वरुपच वेगळं होतं!
`कंपनीमध्ये काम करत असताना गोविंद भेटला. तोही आमच्याच जातीचा. काम करता करता ओळख झाली. तो आमच्या घरीही यायचा. एक दिवस त्यानं मला लग्नाचंही विचारलं. सगळ्यांना आनंद झाला. खोटं कशाला सांगू? मलाही आनंद झाला.’
`तो कुठल्या गावाचा?’
`चित्रदुर्गकडच्या एका खेड्यातला. त्या वेळेपर्यंत माझाही पगार आठशे रुपये झाला होता. माझ्या पाठीवर एक भाऊ आणि दोन बहिणींची जबाबदारी होती. घरची जबाबदारी होती- पण लग्नाची आशाही होती ना! त्याला सांगितलं- लग्नानंतर निम्मा पगार भावंडांना आणि निम्मा तुला देईन.’
बिचारी! काय हिचं जीवन! गौरम्मा कळवळल्या. भावंडांची जबाबदारी, त्यात वैधव्याचा साज! ह्यालाच जीवन म्हणायचं काय?
`मी गोविंदालाच लग्नाची तारीख ठरविण्याविषयी विचारलं. त्याच वेळी माझ्या आधीच्या लग्नाविषयी आणि पाठोपाठ आलेल्या वैधव्याविषयी सांगितलं. नवरा-बायकोच्या नात्यात काहीही गुपित राहू नये ना!’
`होय. अगदी बरोबर आहे तुझं!’
`पण त्याचा परिणाम काय झाला ठाऊक आहे? दुसऱ्या दिवसापासून गोविंदानं माझ्याशी बोलणंच सोडून दिलं.’
`का?’
`त्यानं माझ्यावर आरोप केला- तू मला फसवलंस म्हणून. नंतर त्यानं सुनावलं- मी कशाला विधवेशी लग्न करु? माझ्यासाठी मुलींची लाईन लागली आहे! खूप वाईट शब्दांत त्यानं माझा पाणउतारा केला.’
`मग तू काय केलंस?’
`काय करणार? खूप मनस्ताप झाला. पण नोकरी सोडता येत नव्हती. दररोज गोविंद समोर दिसायचा. पण त्यानं बोलणं टाकलं होतं. जीव द्यावा असंही वाटलं. मी विधवा म्हटल्यावर गोविंदाचं माझ्यावरचं प्रेम क्षणार्धात आटलं! त्याचं माझ्यावर प्रेमच नव्हतं, म्हणायचं काय? यानंतर माझं जीवन असंच राहील काय? सारं आयुष्य निष्प्रेम अवस्थेत काढायचं काय?’
`अगदी चक्रव्यूहात सापडल्यासारखी तुझी अवस्था झाली म्हणायची!’
`एक दिवस तर मी इतकी वैतागले होते की, मरुन जावंसं वाटलं होतं. त्या वेळी सौम्याचं पत्र आलं.’
`कोण ही सौम्या?’
`मी जिथं काम करत होते, त्या कंपनीच्या मालकाची मुलगी सौम्या. ती आणि तिचा नवरा केशव अमेरिकेत डॉक्टर असल्याचं मलाही ठाऊक होतं. लॉसएंजिल्समध्ये ते राहतात. सौम्याला जुळी मुलं झाली होती. घरचं आणि हॉस्पिटलचं बघणं तिला कठीण जात होतं. शिवाय लग्नानंतर दहा वर्षांनी झालेली जुळी मुलं सांभाळण्याची जबाबदारी होती. दोन्ही मुलीच आहेत. माया आणि ममता. एखादी इंग्लिश येणारी चुणचुणीत मुलगी मदतीसाठी पाठवा म्हणून तिनं वडिलांना लिहिलं होतं.’
`असं! अशी तू इथं आलीस!’
`होय. नशीब कसं कुठं घेऊन येतं ते सांगता येत नाही. त्या वेळी मला तर जीवच नकोसा झाला होता. बेंगळूर सोडून कुठंतरी पळून जावंसं वाटत होतं. मी लगोलग इथं यायला तयारी दर्शवली. आमच्या कंपनीच्या मालकांनी लगोलग व्हिसा-पासपोर्टचं काम केलं आणि मला पाठवायची व्यवस्था केली. माझा तिथला संपूर्ण महिन्याचा पगार त्यांनी माझ्या वडिलांना द्यायची तयारी दाखवली.’
`एका दृष्टीनं हे बरंच झालं ना!’
`होय. सगळ्या दृष्टींनीच चांगलं झालं. आधी खूप घाबरले होते मी! रेल्वेतही त्याआधी मी बसले नव्हते. विमानप्रवास- अमेरिका वगैरे का मान्य केलं मी? असंही वाटलं. मात्र मी देवाची शपथ घेऊन सांगते, सौम्या आणि केशवनं मला कधीही घरच्या नोकरासारखं वागवलं नाही. नात्यातल्या माणसाबरोबर वागावं तसंच ते वागायचे. त्यांनी मला खूप जीव लावला. त्या मुलींचा मलाही लळा लागला. पोटच्या मुलांसारखं मी त्यांना सांभाळलं. काहीही राखून न ठेवता त्यांच्यावर माया केली. नाही तरी दुसरं काही करण्यासारखं नव्हतंच म्हणा! सारं जीवन अंधारानं भरलेलं असताना त्यांच्या रुपानं देवानं मला प्रकाश दाखवला होता ना! कुठल्या जन्मीचं ऋण होतं कोण जाणे!’
आता तिच्या डोळ्यांमध्ये दु:खाऐवजी कृतज्ञतेचे अश्रू होते. त्यात कुठल्याही भाषा-जाति-पंथाचा स्पर्श नव्हता. परमपवित्र अशा माणसा-माणसातल्या संबंधाची आर्द्रता त्यात होती.
बोलता-बोलता घरचा रस्ता चुकला होता. ते लक्षात येताच चित्रा म्हणाली, `बघितलंत अम्मा? दररोज या रस्त्यानं मी ऑफिसला जाते. त्यामुळे मी विसरुन या रस्त्याला आले.’
`तू नोकरी करतेस?’
`होय. सौम्याच्या घरी असताना मी पुढं शिकू लागले. इथं संध्याकाळच्या वेळी अनेक छोटे-मोठे कोर्सेस असतात. केशव आणि सौम्यानं मला आग्रहानं शिकायला लावलं. ड्रायव्हिंगही शिकवलं. मीच घरी लागणाऱ्या सामानाची खरेदी करत होते. स्वयंपाक करत होते. मुलांनाही सांभाळत होते. संध्याकाळी क्लासलाही जात होते.’
`आता कुठं काम करतेस?’
`बँकेत. संध्याकाळच्या क्लासमध्येच मला जोसेफ भेटला.’
`जोसेफ?’
`होय. अमेरिकन तरुण. माझ्याच वयाचा आहे. त्याची आई नर्स आहे. जोसेफही दिवसा काम करुन रात्री क्लासला येत होता. आधी मी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण त्याच्या आईमुळे आम्हां दोघांचीही ओळख झाली. नर्स असल्यामुळे सौम्या-केशवशी त्याच्या आईची ओळख झाली होती. लवकरच ओळखीचं रुपांतर स्नेह आणि प्रेमात झालं.’
चित्राच्या चेहऱ्यावर आपली प्रेमकथा सांगताना नववधूचे भाव फुलले होते.
`जोसेफलाही मी आधीच्या माझ्या पूर्वायुष्याविषयी आणि माझ्या वैधव्याविषयी सांगितलं. मागचा बेंगळूरमधला अनुभव होताच ना! यावर तो काय म्हणाला ठाऊक आहे?’ तिच्या चेहऱ्यावर हसू होतं.
`काय?’
`म्हणाला- यानंतर पुन्हा होऊ नकोस म्हणजे झालं!’ नाही म्हटलं तरी गौरम्मांना हसू आलं. ते आवरत त्यांनी विचारलं, `यावर सौम्या काय म्हणाली?’
`ती म्हणाली- जोसेफ फार चांगला मुलगा आहे. जाति-धर्म-देश याचा विचार न करता, खरोखरच तुम्हां दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असेल तर अवश्य लग्न करा. आमच्या घरच्या कामामध्ये तू तुझं जीवन पूर्णपणे गाडून टाकू नकोस. तू गेल्यामुळे आम्हांला अडचण होईल यात शंका नाही. पण मुली मोठ्या होतील. तुझं भविष्यही तितकंच महत्त्वाचं आहे ना!’
`केवढं मोठं मन तिचं!’
`होय. त्या दोघांनी संमती देताच आम्ही लग्न केलं. माझी सासू आमच्याबरोबर राहात नाही. वेगळी राहते. दर शनिवारी-रविवारी आम्ही तिच्याकडे जातो किंवा ती आमच्याकडे येते. मला कुठल्याही प्रकारे तिचा त्रास नाही.’
`तुझा धर्म?’ तिचं नाव ऐकल्यापासून मनात सलणारा प्रश्न अखेर गौरम्मांनी विचारलाच.
`जोसेफनं सांगितलं- तू ज्या धर्मात जन्मलीस आणि आत्तापर्यंत ज्या धर्माचं आचरण करतेस त्या धर्मावर तुझी श्रद्धा असेल तर तू त्याच धर्माची राहा. माझ्या धर्माचं मी पालन करतो. माझ्या कुठल्याही प्रकारच्या धर्माचरणामध्ये त्यांची आडकाठी नसते. मीही त्याच्या धर्माचरणात आडवी येत नाही. मी देवळात जाते, मंगळसूत्र घालते-’
`अगं, मानवधर्म सगळ्या धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे- तुम्ही दोघंही तो मानता ना!’ गौरम्मांना काय बोलावं ते न कळल्यामुळे त्या म्हणाल्या. पाठोपाठ त्यांनाही वाटलं, हेच खरंय ना!
चित्रानं गाडी पुन्हा योग्य मार्गावर आणली.
दोघी घरी आल्या तेव्हा गोरा जोसेफ बायकोची वाट पाहत होता.
`उशीर झाला चित्रा!’ त्याचा प्रश्न गौरम्मांना समजला नाही.
चित्रानं गौरम्मांविषयी त्याला आधीच सांगून ठेवलं असावं. त्यानं त्यांचा हात हातात घेऊन शेकहँड केला. गौरम्मा संकोचून गेल्या.
गौरम्मांनी भरल्या मनानं चित्राच्या घरी फळं आणि दुधाचा स्वीकार केला. त्यांच्यासमोरच वाढलेल्या, विधवा होऊन पुन्हा संसार करत असलेल्या चित्राच्या सुखी जीवनाकडे पाहताना त्यांचं मन भरुन आलं होतं.
चित्राचं घर छोटं होतं. तिच्या नवऱ्याचीही बँकेत नोकरी होती. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असली तरी घरभर आनंद आणि समाधान भरुन असल्याचं जाणवत होतं. दोघंही एकमेकाची काळजी करत असल्याचं लक्षात येत होतं.
एका कोपऱ्यात मले-महादेवाचं चित्र होतं. त्याला चंदनाचा हार घातला होता. शेजारीच मेरीची मूर्ती होती. समोर मेणबत्ती ठेवली होती.
चित्रा आणि जोसेफ जेवले. दिवसभर भरपूर गप्पा झाल्या. संध्याकाळी घरी जायची वेळ झाली.
गौरम्मांनी विचारलं, `चित्रा, शंकरण्णा येऊन गेला काय?’
`सुरुवातीला मी इथंच लग्न करुन राहणार म्हटल्यावर रागावून पत्र लिहायचं सोडून दिलं होतं. आता राग ओसरलाय त्यांचाही. मी दर महिन्याला दोनशे डॉलर्स पाठवते. म्हणजे सुमारे आठ हजार रुपये. दोन्ही बहिणींची लग्नं झाली. धाकट्या भावाला शिक्षणात रस वाटला नाही. मलाही भारतात जाऊन यायला जमलं नाही. पैसे हवेत ना तेवढे! तरीही मी इथं सुखात आहे, त्यामुळे अप्पा-अम्माही सुखात आहेत.’
गौरम्मा ऐकत होत्या. डॉलरमध्ये पैसे मिळवूनही यांना चणचण आहे म्हणायची!
`पैसे साठवून पुढच्या वर्षी अप्पा-अम्मांना इथं बोलवणार आहे. त्यातही अम्मा येईल की नाही कोण जाणे!’
चित्रा इथं आली, तिचं आणि तिच्या घरच्यांचं आयुष्य चांगलं झालं. हीच चित्रा भारतात राहिली असती तर काय झालं असतं? केवळ विधवा आहे म्हटल्यावर गोविंदानं तिला सोडून दिलं ना! अगदी लग्नाचा नवरा जगला असता तरी हिचं त्यानं छळून-छळून भुस्कट पाडलं असतं. हा परदेशीचा फिरंगी, गोरा नवरा, परक्या देशातला हा अमेरिकन नवराच तिचा खराखुरा जीवन-सांगाती झाला! खरा मानव झाला.
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

निघायची वेळ झाली. चित्रा गप्पच होती. रीतीप्रमाणे तिनं गौरम्मांपुढे हळदी-कुंकवाचं तबक धरायला हवं होतं. पण गौरम्मांसारख्या रुढीप्रिय कर्मठ स्त्रीला एकदा विधवा होऊन पुन्हा सवाष्ण झालेल्या चित्रानं हळदी-कुंकू देणं खपेल काय हा एक प्रश्नच होता.
गौरम्मा आपण होऊन म्हणाल्या, `निघते. कुंकवाचं घे-’
तिनं कुंकवाचं तबक त्यांच्यापुढे धरताच त्यांनी स्वत: हळद-कुंकू लावून घेतलं आणि नंतर तिलाही लावलं. नंतर तिच्या मस्तकावर अक्षता टाकत मनापासून आशीर्वाद दिला, `दीर्घ सुमंगली भव!’
अक्षतांच्या ओझ्यानं वाकलेली चित्रा त्यांच्या पायावर वाकली. तिला हुंदका फुटला. डोळ्यांमधले अश्रू त्यांच्या पायांवर सांडले.
ते आनंदाश्रू होते.
चित्राचं पाहून जोसेफनंही गौरम्मांच्या पायांना स्पर्श करुन नमस्कार केला.
गौरम्मांनीही तोंड भरुन- अर्थात कन्नडमध्ये- आशीर्वाद दिला, `असेच अमेरिकेत शंभर वर्षं सुखानं राजा-राणीसारखे राहा!’
निघताना गौरम्मांच्या हातात चित्रानं एक छोटी पेटी ठेवली.
`हे काय गं?’
`अम्मा, ही दागिन्यांची पेटी आहे. ती दागिन्यांनी भरून देण्याइतकं ऐश्वर्य माझ्याकडे नाही. तुमची मुलं ती भरून देतील. तुम्ही त्या वेळी मदत केली म्हणून मी टायपिंग शिकले. त्याचाच पुढं कॉम्प्युटर शिकताना उपयोग झाला. त्यामुळेच मला इथं बँकेत नोकरी मिळाली. तुम्हीच मला अन्नाची वाट दाखवली.’
गौरम्मांना शामण्णांची आठवण येत होती. शाळामास्तर म्हणून नोकरी करताना त्यांना पैसे साठवायला कदाचित जमलं नसेल, पण प्रेम आणि मायेनं त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं ना! नाहीतरी चित्रा मेलकोटमध्येच खितपत पडली असती.
चंद्रू आपल्या कामात यशस्वी होता. पण तो आधीचा चंद्रू राहिला नव्हता. एखादा किडा आतून लाकडाला पोखरत राहावा तसं काहीतरी, व्यक्त करता न येण्यासारखं त्याला आतल्या आत टोकरत होतं.
त्याच्या काही प्रौढ मित्रांची मुलं आता वयात आली होती. अशा मुलांचे आई-वडील घाबरे झाले होते. काही वेळा तर चंद्रूलाही गावी निघून जावं असं वाटत होतं. पण जमुना त्यासाठी मुळीच तयार नव्हती.
तिच्या मनात भारताविषयी तिरस्कार होता.
इथलं स्वातंत्र्य आणि इथं मिळणाऱ्या सुखसोयी यावर ती भाळून गेली होती. त्यामुळे चंद्रू तिच्याशी या विषयावर कितीही पोटतिडकीनं बोलला तरी ती `इतरांचं जे होईल, तेच आपलंही होईल’ असं म्हणून तो विषयच झटकून टाकायची.
चंद्रूच्या मित्राची- वेंकटूची मुलगी तेरा वर्षांची झाली होती. वेंकट तिच्या बाबतीत अतिशय चिंतातुर झाला होता. तिला कुणाचे फोन येतात, तिचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, तिला घरी यायला उशीर का झाला वगैरे प्रश्न त्याला सतत सतावत होते. स्वत:बरोबरच त्यानं आपल्या पत्नीची- शांतीची मन:शांतीही नष्ट केली होती. चंद्रूपुढे हे सारं सांगून शांती अश्रू ढाळायची.
चंद्रूनं एकदा वेंकटशी या विषयावर बोलायचा प्रयत्न केला त्या वेळी वेंकटनं सुनावलं, `चंद्रू, उद्या तुझी मुलगीही मोठी होऊन अमेरिकन मुलींसारखी डेटिंग करु लागली तर तू काय करशील? तुला भीती वाटत नाही? आपण सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहोत.’
हे जमुनाला सांगितलं तर जमुना म्हणायची, `त्या वेळी बघू या. दोन रट्टे द्यायचे तेव्हा!’
पण चंद्रूला हे पटत नव्हतं.
`असं कसं जमुना? लहानपणापासून आपण मुलांना इतर अमेरिकन मुलांप्रमाणेच उत्तम कपडेलत्ते देऊन वाढवतो, त्यांच्या बरोबरीनं शाळेत पाठवतो. आपण त्याचा अभिमानही बाळगतो. पण मुलं वयात येऊन अमेरिकन मुलांसारखी वागू लागली की, मग मात्र आपण घाबरतो. त्यांना विरोध करायला लागतो. मुलांना हा विरोधाभास कसा लक्षात येईल?’
`तुम्ही मुलीला डेटसाठी जा म्हणून सांगाल?’
`नाही. मी परिस्थितीचं विश्लेषण करुन सांगेन. काही वेळा अमेरिकन दृष्टीनं आणि काही वेळा भारतीय दृष्टिकोनातून मुलांकडे बघणं चुकीचं आहे. याच मानसिक ओढाताणीमुळे वेंकट असा वागतोय.’
जमुना कामावर हजर व्हायचा दिवस आला. तिनं सासूला दुधाची बाटलीची स्वच्छता आणि दुधाच्या-रसाच्या वेळांविषयी सांगितलं.
`अगं, तान्ह्या बाळाला आईचं दूध पाहिजे!’ न राहवून गौरम्मांनी सांगितलं.
जमुना म्हणाली, `माझंच दूध काढून मी फ्रीजमध्ये ठेवून जाते. तुम्ही तेच थोडं गरम करुन तिला पाजा.’
गौरम्मांना ही पद्धत ठाऊक नव्हती.
`तू दुपारी येऊन पाजून जात जा ना! विनिता रोज रिक्षानं घरी येऊन जायची.’
जमुना लगेच तुच्छतेनं म्हणाली, `विनितेची गोष्ट वेगळी! ही अमेरिका आहे!’
गौरम्मांना कळेना, देश कुठलाही झाला तरी आईचं दूध ते आईचंच ना! इथं अमेरिकेचा प्रश्न कुठं आला?
चंद्रू आणि जमुना कामावर निघून गेले.
सारं वातावरण नि:शब्द होऊन गेलं. स्वभावत: थोडं बोलणाऱ्या गौरम्मांना भीती वाटण्यासारखी ती नीरवता होती.
लहानगी मानसी सतत झोपलेली असायची. घरात आणखी काही कामही नव्हतं.
रस्त्यावरुनही कसले आवाज येत नव्हते. भाजीवाले किंवा फेरीवाल्यांचे आवाजही नव्हते. काळच थांबलाय की काय असं वाटण्यासारखी नि:शब्दता.
बेंगळूरमधल्या घरीही काही वेळा त्यांना घरात एकटं राहावं लागे. त्या एकांतात आणि इथल्या एकांतात जमीन-अस्मानाचा फरक होता. त्यांना इथल्या नि:शब्द वातावरणाची भीती वाटू लागली. बेंगळूरमधल्या एकांताची मात्र त्यांनाही अधून-मधून ओढ लागत असे. इथल्या शांततेत मात्र सतत कुणीतरी बोलून खंड पाडावा असं वाटत राहतं.
सुरुवातीला तिथल्या सुपर स्टोअर मार्केटस्‌चं जे कौतुक वाटत होतं ते राहिलं नव्हतं. टी. व्ही. ची अपूर्वाई राहिली नव्हती. सारखं सारखं टी. व्ही.त तरी काय बघायचं, असं त्यांना वाटू लागलं.
बेंगळूरला असताना विनिता कामावरुन घरी आली की, त्या राममंदिराला निघून जात. तिथं त्यांच्या वयाच्या आणखीही काही बायका जमत होत्या. सगळ्याजणी आपापल्या सुनांच्या चहाड्या एकमेकींना सांगत, स्वत: सून असताना कशा आज्ञाधारक होतो, आपल्या दुर्दैवानं असली सून आपल्या नशिबी आली वगैरे सांगून मन हलकं करत होत्या. देवळातलं हे `पुराण’ संपवून घरी येईपर्यंत विनिता गरम-गरम स्वयंपाक करुन अंथरूणं घालून ठेवायची.
इथं मात्र तसं नव्हतं. जमुना आणि चंद्रू दोघंही संध्याकाळी दमून यायचे. विनिता? तीही दमून यायची काय? गौरम्मांना आठवेच ना!
फारसं न बोलता मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेलं अन्न वाढून घेऊन जेवलं की तो दिवस संपायचाच. बाहेर कुठं जायचं असेल तर आतुरतेनं रविवारची वाट पाहायची.
शनिवारी-रविवारी अधूनमधून चंद्रू त्यांना कुणीतरी भारतीयांच्या घरी घेऊन जात होता. बहुतेक वेळा घरातच आठवडाभराची कामं असल्यामुळे जमुना यायची नाही. कन्नड माणसांच्या घरी गेलं तर गौरम्मांना काहीतरी बोलायची, तेही कन्नडमध्ये, संधी मिळायची. गौरम्मांना आणखी कुठल्या भाषेत बोलता येत नव्हतं.
काही रविवारी चंद्रूलाही घरासमोरचं गवत कापण्याचं काम असे. गाडी दुरुस्तीची कामंही असत. अशा प्रकारे तोही सतत काही ना काही कामांत गुंतलेला असे. त्यातही तो गौरम्मांसाठी वेळ काढत असे. काही वेळेला तेही गौरम्मांना नकोसं वाटे.
इथं घरी कुणीतरी आलं तर किती छान होईल! पण एवढ्या लांबच्या खेड्यात कोण येणार? बेंगळूरला मात्र सतत कुणी ना कुणी येत-जात. शामण्णांचे विद्यार्थी, नातेवाईक, गिरीश तर सतत कुठल्या ना कुठल्या कार्यात गुंतलेला असल्यामुळेही ती माणसंही वरचेवर येत.
गौरम्मांचा स्वभाव तसा बडबडा म्हणता येणार नाही. पण त्यांना माणसांची खूप सवय होती. वेळी-अवेळी कितीही माणसं आली तरी न कंटाळता त्या स्वयंपाक करुन त्यांना जेवायला वाढायच्या. एखद्याा पदार्थाचं कुणी विशेष कौतुक केलं तर स्वत:च्या वाटणीचंही त्यांना वाढत. त्यांच्या या अतिउदारपणामुळे महिन्याच्या किराणा-सामानाचा खर्च दुपटीनं वाढला तरी विनितेच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे त्या दुर्लक्ष करीत.
इथं चंद्रूच्या घरी येणाऱ्यानं फोन करुन येणं आवश्यक होतं. अगदी जवळचं माणूस यायचं म्हणजे चाळीस मैलांवरन येणार!
अशा वेळी एकदा चंद्रूनं विचारलं,
`अम्मा, राधाकृष्ण नावाचे माझे एक मित्र आपल्या बायको-मुलीसह आपल्याकडे राहायला येणार आहेत. तुला काही त्रास नाही ना होणार?’
जमुना लगेच म्हणाली, `मला रजा नाही. दुसरं म्हणजे दोन्ही वेळेचा स्वयंपाक करायचा म्हणजे कष्टाचं काम! एखद्या हॉटेलात का उतरत नाहीत ते? भरपूर श्रीमंत आहेत ना ते?’
`असू दे गं! मी करेन स्वयंपाक-पाणी. येऊ दे त्यांना!’ असं एकीकडे म्हणत असताना गौरम्मांच्या मनात आलं, एवढं राजवाड्यासारखं घर असून पाहुण्यांना हॉटेलमध्ये उतरवा म्हणायला हिची जीभ कशी उचलते? पण हे स्पष्ट बोलून दाखवायचं त्यांना धैर्य झालं नाही. विनितेनं हेच म्हटलं असतं तर गौरम्मांनी लागट बोलून तिला रडवलं असतं.
पण इथं जमुनेला कसं सांगायचं? डॉलर-बहू ना ती!
राधाकृष्णांचं कुटुंब येणार म्हणताच गौरम्मा मनापासून आनंदल्या होत्या. त्यांना इथं येऊन सहा महिने होऊन गेले होते आणि हे पहिले पाहुणे घरी येणार होते. इथं भाजी, फळं, किराणा सामान उत्तम प्रकारचं मिळत होतं पण त्यात फारसं वैविध्य नव्हतं.
गौरम्मांनी सुनेची कुठलीही मदत न घेता खसखशीची खीर, ताकाची कढी, चित्रान्न, भजी- एक ना दोन! कितीतरी पदार्थ हौसेनं तयार केले. तरीही जमुना अस्वस्थ होती. गौरम्मा नसत्या तर तिनं चंद्रूला पटवून त्यांची बाहेरच राहण्याची व्यवस्था केली असती. अशा परिस्थितीत चंद्रूनंही पाहुण्यांना घरी बोलवण्याचं धैर्य दाखवलं नसतं. बायकोनं केलं नाही तरी आई करेल, या खात्रीनं चंद्रूनं त्यांना घरीच राहायला बोलावलं होतं.
पण जमुनेला हा स्वत:चा अपमान वाटला होता. आपल्या घरी आपलं मत डावललं जातं, याचा तिला राग आला होता.
राधाकृष्ण कंपनीमध्ये बऱ्याच वरच्या हुद्द्यावर होते. त्यांचं नाव खूपच प्रसिद्ध होतं. त्याचबरोबर भरपूर पैसाही त्यांनी कमावला होता. सुमारे पन्नाशीचं त्यांचं वय होतं. त्यांच्या पत्नी सावित्री सुरेख, रेशमी साडी नेसून, मोजके दागिने लेऊन प्रत्यक्ष लक्ष्मीसारख्या दिसायच्या. त्यांच्याबरोबर दहा वर्षांची त्यांची मुलगीही आली होती.
विमानातून आल्यावर गाडीनं ते घरी येऊन पोहोचले. घरात आल्या आल्या सावित्रीनं गौरम्मांना वाकून नमस्कार केला.
क्षणभर गौरम्मा सुखावल्या. अमेरिकेत येऊनही हिनं आपली पद्धत सोडली नाही, या विचारानं त्यांना बरं वाटलं.
एक गोष्ट मात्र त्यांना खटकली. एवढी श्रीमंती असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर विषादाची छाया होती. दोघांच्याही चेहऱ्यावर!
औपचारिकपणे चार वाक्यं बोलून जमुना बेसमेंटमध्ये कपडे धुवायला निघून गेली.
कॉफी प्यायल्यावर दोघंही पुरुष हॉलमध्ये गप्पा मारू लागले. गौरम्मांनी भाजी चिरण्यासाठी विळी काढली. सावित्रीही स्वयंपाकघरात येऊन म्हणाल्या, `मी चिरुन देते. पण मला विळीनं चिरायची सवय मोडली आहे. चाकूनं चिरते.’ आणि सराईतपणे चाकूनं भाजी चिरु लागल्या.
सावित्रीचं गौरम्मांशी चांगलंच जमलं. छोट्या मानसीबरोबर सविता खेळू लागली. एवढी श्रीमंत बाई असूनही सावित्रीनं प्रत्येक कामात गौरम्मांना मदत केली.
स्वयंपाक होताच गौरम्मांनी भरल्या मनानं सगळ्यांना जेवायला वाढलं. सगळेच स्वयंपाकाचं कौतुक करत भरपेट जेवले.
दररोज मानसीला फ्राममध्ये ठेवून फिरायला घेऊन जायची गौरम्मांना सवय होती. त्या दिवशी सावित्री त्यांना म्हणाली, `मीही येऊ?’
`चला ना!’ त्याही म्हणाल्या.
चालता-चालता गौरम्मांनी सहजच विचारलं, `तुम्हांला किती मुलं?’
यावर सावित्री रडू लागली. गौरम्मा संकोचून गेल्या. त्यांनी विचारलं, `काय झालं? दुखावलं का मी?’ गौरम्मांना वाटलं, कदाचित मुलं गमावलेली आई असावी ही-
सावित्रीच पुढं म्हणाली, `नाही. मी स्वत:च सांगणार होते तुम्हाला. मन हलकं करायला म्हणून. मनातलं हे ओझं कुणापुढे सांगणार मी तरी?’
`एवढं काय झालंय?’
`काही नाही. अठरा वर्षं झाली इथं येऊन. त्यामुळे हाच आमचा देश झालाय आता. भारतातून इथं आलो तेव्हा आम्हांला एक मुलगी होती. शामा तिचं नाव. इथं आल्यानंतर ही सविता झाली. शामा मोठी होऊ लागली. आम्हांला सतत भीती वाटायची- ही इथल्या मुलींसारखी तर होणार नाही ना? तिच्यावर आपले संस्कार व्हावेत म्हणून सगळे सण, इतर अनेक पूजा आणि धार्मिक विधी करण्याची आम्ही पद्धत ठेवली. सतत तिला सांगत होतो- हा आपला देश नाही- आपण भारतातले- इथं पैसे मिळवायला म्हणूनच आलो आहोत. वरचेवर भारतातच नव्हे, गावाकडे नेऊन तिला तिकडचीही सवय ठेवली.’
`तुमचं गाव कुठलं?’
`तिपटूरमध्ये आमच्या वडिलांची खोबऱ्याची वखार आहे. मी फक्त इंटरपर्यंत शिकले. लग्नही लवकर झालं होतं. शामालाही विसाव्या वर्षीच आम्ही नवरा शोधला.’
`शिकणाऱ्या मुलीला नवरा?’
`आपल्याकडे विसाव्या वर्षीच नवरा शोधतात ना?’
`होय!’ गौरम्मा गप्प बसल्या.
`ती कॉलेजमध्ये शेवटच्या वर्गात शिकत होती. आपण योग्य नवरा शोधला नाही, तर तीच एखादा शोधेल, अशी भीती वाटली. आम्ही पटवल्यावर अखेर ती म्हणाली, ठीक आहे. मी तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. पण भारतात मात्र राहणार नाही.’
`खरंय तिचं. तिची अपेक्षा स्वाभाविकच आहे. इतकी वर्षं इथं राहिल्यावर तिथं कसं जमेल तिला?’
`मग आम्ही पेपरमध्ये एक जाहिरात दिली. त्याला कितीतरी तरुणांनी अर्ज टाकले! चांगली शिकलेली मुलं होती. चांगल्या घरची मुलं! अखेर तिनंच चार-सहा मुलांची निवड केली. त्यातही सुरेंद्र नावाचा एक इंजिनियर मुलगा तिला आवडला. मुलगा हुशार होता, पण गरीब. कुठलंही व्यसन नव्हतं.’
`त्याच्या घरची गरिबी-श्रीमंती घेऊन तुम्हांला काय करायचं! नाहीतरी तुमची मुलगी कुठं त्यांच्या घरी नांदायला जाणार होती?’
`होय. त्याविषयीही आधीच बोलणं झालं. नंतर बेंगळूरच्या कुचलांबा देवळामध्ये पाच लक्ष खर्च करुन तीन दिवसांचं उत्तम लग्न करुन दिलं.’
`पाच लाख.’
`होय. प्रत्येकाला भेटवस्तू, कुणाला काही कमी पडणार नाही असं लग्न केलं. सुरेंद्र तिच्याबरोबर इथं आला. एम.एस्सी. साठीही त्याला सीट मिळाली होती. पण स्कॉलरशिप मिळाली नव्हती. आम्हीच त्याची फी भरली. त्या दोघांना स्वतंत्र घर विकत घेऊन दिलं. सगळं ठीक झाल्यावर आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला. पण नियतीला हे पटलं नाही की, काय कोण जाणे!’
आपल्या मुलीच्या दुर्दैवाची कथा सांगता-सांगता त्या भावनाशील झाल्या होत्या. त्यांना रडू फुटलं.
पुढं फिरायला जाणं गौरम्मांना अवघड झालं. या साऱ्या समस्या त्यांच्या समजून घेण्याच्याही पलीकडच्या वाटत होत्या. त्या म्हणाल्या, `असू दे सावित्री! माणसाच्या हातात काय आहे? तुमच्या जावयाचं आयुष्यच तेवढं असेल! तुम्ही मनस्ताप करुन घेऊ नका!’
एकाएकी सावित्री रडायची थांबली आणि संतापानं म्हणाली, `त्याला कसली धाड भरलीय? पापी मेला! असल्या नतद्रष्ट माणसांना देव आयुष्यही भरपूर देतो!’
गौरम्मा गडबडल्या.
सावित्री पुढं सांगू लागली, `सुरेंद्राला दुसऱ्या टर्मला स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर तो पूर्णपणे बदलून गेला. दररोज नवरा-बायकोमध्ये भांडणं सुरू झाली. एकदा त्यानं भांडणाच्या भरात सांगून टाकलं- मी काही तुझा चेहरा बघून तुझ्याशी लग्न केलेलं नाही. तुझ्याकडे ग्रीनकार्ड होतं म्हणून लग्न केलं मी! यावर शामाही म्हणाली- मी नसते तर तू इंडियातच सडत पडला असता. माझ्याशी लग्न करुन तुझ्या सगळ्या घराण्याचा उद्धार झालाय! शब्दानं शब्द वाढत गेला. अखेर शामा रडत घरी आली. डायव्होर्स घेऊनच आली ती!’
`आता कुठं आहे ती?’
`या घटनेला आता एक वर्ष झालंय. सुरेंद्रनं शिक्षण पुरं केलंय आणि तो पुन्हा लग्न करायला भारतात गेलाय म्हणे. तिथं काय! मुलगा अमेरिकेत हमाल आहे म्हटलं तरी मुलगी देतात! सहज एखादी चांगली मुलगी मिळूनही जाईल किंवा एव्हाना मिळालीही असेल.’
`शामा कुठं आहे?’
`डायव्होर्स झाल्यावर तिनं सगळा राग आमच्यावरच काढला. ती म्हणते- तुम्ही तुमची संस्कृती- तुमची विवाहपद्धती यासाठी माझा बळी दिलात. पाच मिनिटं परस्परांना भेटून, एकमेकांना जाणून न घेता केलेलं लग्न ते! भारतात डॉलर म्हटला की लाचार होणारे भिक्षुक! ग्रीनकार्ड असलेल्या गाढवीशी लग्न करायला ते तयार असतात! तुम्ही दोघांनी माझं जीवन मातीमोल केलंय! यानंतर मला वाटतं तसं मी राहणार! आता तुम्ही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका- आणि ती निघून गेली.’
`आता ती कुठं आहे?’
`कॅलिफोर्नियामध्ये एका ब्राझील मुलाबरोबर ती राहते. सकाळी कॉलेजला जाते आणि संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करते.’
`असं किती दिवस चालेल?’
`देवालाच ठाऊक! आमचं वेदपारंगतांचं घराणं! आमचे आजोबा महापंडित होते. मठाचे स्वामीही धर्मजिज्ञासेसाठी त्यांच्याकडे येत. माझे सासरे अवधानी. अशा घराण्याचं रक्त असलेली शामा अशी वागते- अशी राहते! सगळं आठवलं की पोटात आग पडते! हे सगळं सहन करुन आम्ही जिवंत तरी कसे राहिलो कोण जाणे!’
दु:खाचा बांध फुटून असह्य वेदना अश्रूंवाटे वाहू लागल्या. असहाय्य असल्याची भावना त्यांना घेरुन टाकत होती. बेसुमार डॉलर्स असूनही त्या हताश झाल्या होत्या.
गौरम्मा घाबरुन गेल्या. चौथीपर्यंत शिकलेल्या गौरम्मांना परिस्थितीच्या जटिलतेचं सर्वंकष दर्शन होणं किंवा त्याचं विश्लेषण करणं शक्य नव्हतं. पण दु:खानं हताश झालेल्या समोरच्या व्यक्तींच्या दु:खावर समाधानाची फुंकर घालून शांत करण्याची बुद्धी आणि मन त्यांच्याकडे होतं.
`आता सवितेची काळजी असेल ना तुम्हाला?’
`तर! थोरल्या बहिणीचे गुण हिच्याही अंगात येऊन हीही तशीच वागली तर काय करायचं, हा खरा प्रश्न आहे! रात्रंदिवस हा विचार मला छळत असतो. म्हणूनच मी त्यांच्या मागे लागले आहे- आपण भारतात निघून जाऊ या. हवा तेवढा पैसा मिळवलाय. बेंगळूरमध्ये आमचं स्वत:चं घर आहे. निदान हिला तरी तिथं वाढवू या. आपली मुलं इथं वाढली तर चेहरा-मोहरा आपला असला तरी मन इथलं होऊन जातं. विचार इथल्यासारखेच बनतात. म्हणून मी मागं लागलेय-’
`होय. तेच योग्य दिसतंय.’
`या साऱ्या घटनेमुळे आमची मनं झाली होती. तुम्हांला भेटून मन मोकळं केल्यावर बरं वाटेल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्हाला त्रास झाला?’
`छे! नाही. तसं तुम्ही समजू नका. एकमेकांना एकमेकांनी मदत केली पाहिजे ना!’ गौरम्मा म्हणाल्या. पण त्यांचंही मन अव्यक्त भीतीनं ग्रासलं होतं. आणखी वीस वर्षांनंतर, मानसी वयात आल्यानंतर तीही असाच चंद्रूला त्रास देईल काय?
यावर काळच उत्तर देईल म्हणा!
चंद्रू आणि राधाकृष्ण बाहेर हॉलमध्ये बसून याच विषयावर गंभीरपणेच विचार करत होते.
राधाकृष्ण फ्लोरिडाला आल्यापासून त्याचा त्यांच्याशी परिचय होता. त्यांच्या घरची सारी परिस्थिती त्याला ठाऊक होती.
तो एकदा काही कामासाठी कॅलिफोर्नियाला गेला होता. सॅनफ्रान्सिस्कोमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांबरोबर गेला तेव्हा शामानं सगळ्यांना ड्रिंक्स सर्व्ह केलं होतं.
त्यानं तिला ओळखलं. अवाक् झाला. सगळे मित्र निघून गेल्यावर तो पुन्हा तिथं आला होता.
`शामा, तुझ्याशी थोडं बोलायचंय.’
`काम संपल्यानंतर पिझ्झा-हटला येईन.’ शामा एवढं बोलून मंद स्मित करत निघून गेली. निर्विकार आणि आत्मविश्वासानं भरलेल्या शामाचं ते रुप पाहून चंद्रू अवाक् झाला होता.
अर्ध्या तासानंतर शामा कामाचा युनिफॉर्म बदलून सांगितलेल्या ठिकाणी आली. दिवसभर भरपूर काम झाल्यामुळे ती दमलेली दिसत होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले होते.
चंद्रूनं लहानशा रंगीत फ्रॉक घातलेल्या शामाला पाहिलं होतं.
वधू-वेषात नटलेल्या शामाला त्यानं अमेरिकेतल्या रिसेप्शनच्या वेळी पाहिलं होतं.
आता डायव्होर्स घेतलेल्या, दिवसभर राबून दमलेल्या शामालाही तो पाहत होता.
`हे काय शामा! तू अशी वागलीस तर तुझ्या पप्पांना काय वाटेल?’
कोकचा घोट घेत शामानं विचारलं, `अंकल, काहीही माहिती नसताना तुम्ही माझ्या वैयक्तिक आयुष्यात डोकावत आहात. हे योग्य आहे काय?’
तिच्या थेट प्रश्नानं चंद्रू गडबडला.
तीच पुढं म्हणाली, `अंकल, तुम्हां सगळ्यांची विचार करायची पद्धत सारखीच आहे. हे मला ठाऊक आहे. तुम्ही माझ्या दृष्टीनं विचार करुन पाहिलाय काय?’
`केलाय तर!’
`नाही केला!’ ती ठामपणे म्हणाली, `मम्मी-पप्पाही हेच करतात. त्यांनी इथं शंभर जन्म काढले तरी त्यांना इथलं जीवन समजणार नाही. तुमची मुळं तुमच्या भारतात, तुमच्या कर्नाटकात, तिपटूरमध्ये खोलवर रुजली आहेत. तुमची निष्ठा नेहमीची त्या मुळांशी राहणार! इथं येऊन तुम्ही भरपूर पैसा मिळवताय- पण तुम्ही कधीही इथले होऊ शकणार नाही. कागदोपत्री तुम्ही इथले नागरिक असालही- पण तुमचं हृदय कधीच इथं नाही.’
शामाच्या बोलण्यात उद्वेग होता. आजवर अत्यंत शांत आणि संयमानं वागणारी शामा आता ज्वालामुखी झाली होती.
`तुम्हाला तुमचा देश भारतच वाटत असेल, पण माझा देश हा आहे. मी इथं जन्मले आणि इथं वाढले. तुम्ही मात्र तुमची मूल्यं वापरुन माझं मूल्यमापन करता! रेस्टॉरंटमध्ये नोकरी केली म्हणजे काय वाईट केलं मी? तुम्हां भारतीयांच्या दृष्टीनं हे हलकं काम असेलही. माझ्या एका मैत्रिणीचे वडील न्यूयॉर्कमध्ये मोठे सर्जन आहेत. तीही इथं माझ्यासारखी नोकरी करते; पण तिच्या घरी कुणी तिला काही बोलत नाहीत. तिचं आयुष्य तिचं आहे म्हणतात.’
शामाच्या बोलण्यावर काहीही न बोलता चंद्रू घरी परतला होता.
राधाकृष्ण सांगत होते,
adeswal
Expert Member
Posts: 3283
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

Re: Romance डॉलर बहू

Post by adeswal »

`चंद्रू, मी शिक्षण संपल्यावर इथं आलो नाही. संशोधक होऊन भारतात सरकारी नोकरी करत होतो. पगाराचा फारसा विचार कधीच केला नाही. आधी दिल्लीत नोकरी होती. तेव्हा घरी फक्त जेवणापुरता येत होतो. तरुण वय, रक्तही गरम होतं. माझ्या जीवनात तेवढं काम मी कधीच केलं नाही.’
`का? इथंही काम करता ना!’
`तिथल्या कामाच्या तुलनेत हे कमीच. तिथं असताना संशोधनपर निबंध लिहिला. तिथल्या माझ्या बॉसचा माझ्यावर राग होता. त्यामागे भाषा कारणीभूत होती की जात हे मला समजलं नाही. त्यानं मला माझा निबंध वाचून दाखवण्याची कॉन्फरन्समध्ये संधी दिली नाही. शिवाय पैशाची चणचण होतीच. मन खूप निराश झालं. बॉस दररोज काही ना काही चूक शोधून काढायचा, मिळाली नाहीतरी उगाच वाकड्यात शिरायचा. मला मदतीला माणसं द्यायचा नाही. तरीही काम करत राहिलो.’
`इथं कसे आला तुम्ही?’
`शेवटी माझी गुजराथेतल्या एका कोपऱ्यात बदली करण्यात आली. माझ्या अभ्यासाच्या विषयाशी संबंध नसलेल्या एका पोस्टवर. हताश झालो. काम करायला मी तयार होतो- पण राजकारणामुळे मला कुणीही मदत करायला तयार नव्हतं. अखेर मुंबईला येऊन एक निबंध लिहिला. तो इथल्या संस्थेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी वाचला. त्यांनी मला इथं बोलावून घेतलं.’
`इथं आल्यावर तुम्हाला काही त्रास झाला नसेल.’
`इथं जुळवून घेताना जेवढा त्रास झाला असेल तेवढाच. माझ्या कामासाठी मी मागेन तेवढा फंड, असिस्टंट, सोयी मला मिळू लागल्या. मला काहीही कमी पडलं नाही. बॉसचंही कुठल्याही प्रकारचं दडपण नाही. संपूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव कामाच्या बाबतीत मी आजही घेतो. आता तर मीच संस्थेचा सर्वोच्च अधिकारी आहे. मीही केवळ गुणवत्तेला महत्त्व देण्याची त्यांची प्रथा सांभाळतो.’
`मग कसलं दु:ख?’
`कामात काहीच दु:ख नाही. घरी गेलं की मात्र वाईट वाटतं. सावित्री सतत शामाची आठवण काढत असते. इथून निघून जाऊ या म्हणून मागं लागते. मी भारतात जाऊन काय करू? पैसा भरपूर आहे; पण संशोधनापुढे मला पैशाचं महत्त्व कधीच वाटलं नाही. भारतात जाऊन काय करू मी? माझ्या संशोधनाचं स्वरूप असं आहे की, तो खर्च केवळ श्रीमंत देशांनाच परवडेल.’
`मला पटतंय तुमचं. ही तुमचीच नव्हे, अनेक वैज्ञानिक, शास्त्रज्ञ आणि विचारवंतांची कथा आहे.’
`फार विचित्र आहे हा देश!’ चंद्रू! हे एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. इथं नोकऱ्या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख-संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून इथं येतात- पण माघारी जायला जमत नाही. इथून जावं असा आपला देशही नाही. तिथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत. पण आत बोलवणारा एकही दरवाजा नाही.’
`होय. त्यामुळे विद्यार्थी-व्हिसावर इथं आलेल्यांपैकी नव्वद टक्के मुलं इथंच राहतात. पण अलीकडे कॉम्प्यूटर सॉफ्टवेअर क्षेत्रातली मुलं मात्र माघारी जाताहेत. इथं येणारी मुलं असामान्य बुद्धिमत्तेची असतात.’
`चंद्रू, आपल्या देशात आपल्याला कुठल्याही प्रकारचा मान-सन्मान मिळत नाही. बेंगळूरमध्ये मी सावित्रीच्या आग्रहासाठी एक घर बांधलं. मी अमेरिकेत राहतो म्हटल्यावर गृहप्रवेशाचे भटजी, आचारी, काँट्रॅक्टर- सगळ्यांनी दुप्पट दर सांगितले. ते तर बाहेरचे आहेत. माझ्या सख्ख्या भावंडांना वाटतं- तू डॉलरमध्ये मिळवतोस- आम्हांला पैसे का देऊ नयेस? मन खूप दुखावतं!’ त्यांच्या स्वरात वेदना होती.
चंद्रू म्हणाला, `होय. त्यांना वाटतं, इथं डॉलरची झाडं आहेत आणि त्यांना डॉलर्स लटकलेले असतात! घर-दार सोडून, इथल्या थंडी-वाऱ्याला तोंड देत आम्ही डॉलर्स मिळवतो तेव्हा केवढी किंमत देत असतो, हे त्यांना समजत नाही. शामाच्या संदर्भात द्यावी लागणारी मूल्याची किंमत, मुलांच्या मूल्यांची किंमत! छे! फारच महाग पडतो हा डॉलर! पण हे भारतात कुणालाही समजत नाही. त्यांच्या दृष्टीनं डॉलर म्हणजे चाळीस रुपये- एवढंच!’
राधाकृष्णांनी ह्याचा पुरेपूर अनुभव घेतला होता. चंद्रूला किटीची आठवण आली.
किटीनं चंद्रूला पत्र लिहिलं होतं,
`तू आपल्यापैकी आहेस आणि अमेरिकेत राहतोस हा आम्हाला अत्यंत अभिमानाचा विषय आहे. इथं येशील तेव्हा आमच्यासाठी एक टू इन वन घेऊन येशील काय? अम्माला सिंथटिक डायमंड हवा आहे. लीलानं पोवळ्याचा सर आणायला सांगितला आहे. तिथं शिकॅगोमध्ये पद्मानाभन् नावाचे एजंट आहेत. तू सारं सामान घेऊन येशील अशी मी लीलाला ग्वाही दिली आहे! बघ हं! माझा अपमान होऊ देऊ नकोस!
तू इथं येशील तेव्हा सगळे पैसे रुपयांच्या स्वरुपात देईन.’


चंद्रूला फक्त टू इन वन न्यायला जमलं तेव्हा त्यानं नाराजी व्यक्त केली होती.
तो म्हणाला होता, `चंद्रू, तू मी सांगितलेलं सोडलं असतंस तर एक वेळ चाललं असतं. पण लीलानं सांगितलेलं आणायला हवं होतं! आता तिला काय वाटेल? अरे, तू डॉलरमध्ये कमावतोस आणि टू इन वन देखील चंद्रूवर उपकार केल्याप्रमाणे घेऊन गेला होता. जाता जाता म्हणाला होता, `आमच्या शेजाऱ्यांकडे खूपच हँडी पीस आहे. तूही तसलाच आणशील असं मला वाटलं होतं. तू हा पीस आणणार हे ठाऊक असतं तर मी नकोच म्हटलं असतं!’
त्यानंतर त्यानं रुपये देण्याचाही विषय काढलाच नव्हता!
चंद्रूला या प्रसंगाचं वाईट वाटलं होतं. किटीला लीला काय म्हणेल, याची काळजी वाटली- पण चंद्रूला आपल्या बोलण्यामुळे काय वाटेल, याचा त्यानं विचारही केला नाही!
तो गेल्या खेपेला बेंगळूरला गेला होता तेव्हा सुरभी आणि सुरेशही आले होते. सुरेशनं दोन-तीनदा म्हटलं होतं, `तुमचं घड्याळ मात्र फारच छान आहे हं! अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे!’
चंद्रूनं त्या बोलण्याकडे मुद्दामच दुर्लक्षच केलं होतं. पण गौरम्मांनी चंद्रूला एकीकडे बोलावून सांगितलं, `चंद्रू, तू भरपूर डॉलर्स मिळवतोस! ते आपल्या घरचे जावई आहेत- एवढं मागताहेत- दे त्यांना. तुला हवं तर दुसरं घे.’
आईच्या शब्दाखातर चंद्रूनं मनाविरुद्ध घड्याळ त्याला दिलं. आईनं आणखी गोंधळ करू नये म्हणून हातातलं पाचशे डॉलर्सचं घड्याळ काढून `ही माझ्याकडून तुम्हांला भेट!’ म्हणत सुरेशच्या हातावर ठेवलं.
सुरेशनंही सहज म्हटलं. `कशाला दिलंत? नको-’ म्हणत वॉच मनगटावर बांधून घेतलं.
अमेरिकेत परतल्यावर रिकामं मनगट बघून जमुनानं चौकशी केली. सारं समजताच ती संतापानं म्हणाली, `तुमची घरची माणसं अगदी भिकारी आहेत! घरी आलेल्या माणसाला लुटतात नुसते! इथं येऊन पाहिलं तर कळेल किती कष्ट आहेत ते!’ त्यानंतर चार दिवस तिनं त्याच्याशी बोलणं सोडून दिलं होतं.
गौरम्मांना येऊन सहा महिने होऊन गेले होते तरी त्या परगावी म्हणून गेल्या नव्हत्या. त्यामुळे चंद्रूनं दोन दिवस जास्तीची रजा काढली आणि सगळ्यांना शिकॅगोला घेऊन जायचं ठरवलं. तिथं त्याच्या ओळखीच्या अनेक कन्नड मित्रांची घरं होती. जमुना आणि मानसीही प्रवासासाठी तयार झाल्या.
प्रवास म्हटल्यावर गौरम्मा उत्साहानं वेगवेगळे पदार्थ करू लागल्या. रव्याचे लाडू, करंज्या, चकली, कडबोळी, वेगवेगळ्या चटण्या आणि मसाल्याचे पदार्थ.
आईच्या उत्साहावर चंद्रूनं अजिबात पाणी ओतलं नाही. शिकॅगोमध्ये जमुनेच्याही अनेक मैत्रिणी असल्यामुळे तिनंही गौरम्मांच्या पाककलेला प्रोत्साहनच दिलं!
गौरम्मा आल्यापासून जमुनेनं स्वयंपाकघरात यायचं सोडूनच दिलं होतं. शेवटी चंद्रूच म्हणाला, `अम्मा उत्साहानं कामं करतेय खरी! पण दमली वाटतं.’
`काही नाही रे! नाही तरी मला इथं काय काम असतं?’ त्या म्हणाल्या खऱ्या, पण जमुनेनंही अशी भावना व्यक्त करावी अशी त्यांच्या मनातली आशा काही पूर्ण झाली नाही. एकदाच ती म्हणाली होती, `उद्यापासून तुम्ही रेस्ट घ्या. मी कांचीपुरम् इडली करते.’ पण तेवढंच! तिनं कधीच इडली केली नव्हती.
गावाला जायची तयारी झाली. आकाश निरभ्र होतं. कडाक्याची थंडी जाऊन वसंत ऋतू आला होता. सगळी झाडं नुकतीच पालवत होती. वातावरण उत्साही होतं. गौरम्मांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली.
त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून चंद्रूनं विचारलं, `का गं? का हसलीस?’
`माझं सुदैव बघून मला हसू आलं बघ! देव किती दयाळू आहे! तू अमेरिकेला आलास, मला बोलावून घेतलंस! किती नशीबवान मी! तुझ्या गाडीतून फिरतेय आरामात!’
`यात काहीही विशेष नाही, अम्मा! इथं सगळेच गाडी घेतात. इथं गाडी पाण्याइतकीच अत्यावश्यक गोष्ट आहे! ते काही श्रीमंतीचं लक्षण नाही.’
`असू दे! आमच्या दृष्टीनं ही कौतुकाचीच गोष्ट ना!’
गाडी शिकॅगोत पोहोचली. तिथं काळ्या-सावळ्या-गोऱ्या माणसांची गर्दी पाहताच गौरम्मांना वाटलं, हीही अमेरिकाच काय?
राजीव आणि पद्मा चंद्रूचं मित्र-दांपत्य. पद्मा मूळची मैसूरची. त्यांनी घरात प्रवेश करताच तिनं आत्मीयतेनं हसत त्यांचं स्वागत केलं. त्यांची चौकशी केली.
त्यांचं चार बेडरूमचं घर होतं. पाहुण्यांसाठी तिनं एक खोली रिकामी करुन ठेवली होती. घर नेटकं होतं. तिनं कॉफी देत म्हटलं, `निवांतपणे कॉफी प्या. प्रवासामुळे तुम्ही दमून गेला असाल. आधी विश्रांती घ्या!’–
गौरम्मांना आपण बेंगळूरमध्येच असल्यासारखं वाटू लागलं.
कॉफी घेतल्यावर चंद्रू-जमुना-राजू बाहेर गेले. गौरम्मा, सपना आणि पद्मा घरात राहिल्या. पद्माला स्वयंपाकात मदत करायची गौरम्मांना अपेक्षा होती.
`पद्मा, भाजी चिरून देऊ का?’
`कालच चिरून फ्रीजमध्ये ठेवलीय मी.’
`पुरणाचा वास येतोय. पोळ्या करायच्या आहेत काय?’
`नको. पुरण वाटून तयार आहे. करेन मी!’
करायला काहीही कामच नव्हतं. बेंगळूरात अबोल असलेल्या गौरम्मा इथं आल्यापासून गप्पा मारायला आसुसल्या होत्या.
`पद्मा, इथं आपल्याला लागणारं सामान मिळतं? बन्सी रवा, सुकं खोबरं, पोहे, साबुदाणा-’
`शिकॅगोमध्ये भरपूर भारतीय राहतात. बेंगळूरच्या किराणा मालाच्या दुकानात जे मिळतं, ते सगळं इथंही मिळतं. एम.टी. आर मसाले, बेडेकरांचं लोणचं, लाह्याचं पीठ- सगळं मिळतं. पापड-कुरड्या-शेवया एवढंच काय, इथं कन्नड सिनेमाच्या कॅसेट्सही भाड्यानं मिळतात. मी गणेशन मदुवे, मयुरा वगैरे सिनेमा इथंच पाहिले.’
`होय?’ गौरम्मांनी डोळे विस्फारून विचारलं.
`गेल्या दहा वर्षांत तर इथं फारच भारतीय आले आहेत. आता पूर्वीप्रमाणे इथं भारतातून फारसं काही आणावं लागत नाही. मी तर काहीच आणत नाही. उगाच लगेज कशाला वाढवायचं? सूटकेस खराब होते. माझ्या बहिणीही मला सांगतात- तिथून काहीही आणू नकोस- इथं सगळं मिळतं- म्हणून! मीही तिकडून काही फारसं घेऊन येत नाही.’
हा मुद्दा गौरम्मांच्या लक्षातच आला नव्हता. फॉरेन म्हणजे उत्तम, आपलं म्हणजे वाईट असंच डोक्यात असल्यामुळे जमुनाला त्याही `अमुक पाठव- तमुक पाठव’ म्हणून पत्रं लिहायच्या. जमुनाला हे ठाऊक असलं तरी ती गप्प राहायची. का बरं?
`आज कोण-कोण येणार आहे?’
`कुणी नाही. तुम्ही आणि माझी नणंद तारा.’
`तुमची नणंद इथंच असते? तिचे यजमानही येतील ना?’
`जमुनानं तुम्हाला काही सांगितलं नाही?’
`नाही.’
`माझ्या नणंदेची एक कथाच आहे. तारा तिचं नाव. दिसायला सुंदर. तुम्ही पाहालच म्हणा! आमच्या सासूबाई तुमकूरच्या. ताराला शिक्षणात फारसा रस नव्हता. हप्ता-हप्त्यानं बी. ए. झाली. घरातली कामं, स्वयंपाकपाणी यात मात्र अगदी पारंगत आहे. त्यांचा मामेभाऊ रमेश. त्याच्याशी लग्नही झालं.’
`रमेश कुठं असतात मग?’
`इथंच वॉशिंग्टन नावाच्या गावात राहतो. लग्नाआधी आम्हाला येऊन भेटायच्या. ताराच्या लग्नासाठी आमच्या मालकीची एकुलती एक नारळाची बागही सासऱ्यांनी विकून टाकली. ती एकच मुलगी ना! त्यामुळे आम्हीही विरोध केला नाही. व्हिसा मिळून तारा इथं आली तर इथं वेगळीच कथा!’
`काय झालं होतं?’
`इथं रमेशनं एक गोरी बायको आणली होती. एवढंच नव्हे, एक मूलही झालं होतं. त्यामुळे तारा त्याच्याबरोबर राहायला तयार झाली नाही. त्या गोऱ्या बायकोनं रमेशला सोडलं नाही. त्यानं गयावया केल्या, चूक झाली- मोठ्यांचं ऐकून लग्नाला तयार झालो म्हणाला. क्षमाही मागितली. पण काय करणार? डायव्होर्स झाला. शिक्षणात रस नाही- त्यामुळे छोटी नोकरी करून स्वत:पुरती राहते. आमच्या घरी राहा म्हटलं, पण तिची तयारी नाही. त्यामुळे वेगळं छोटंसं घर घेऊन राहते. नवरा पोटगी देतो. अधून-मधून आमच्या घरी येऊन जाते.’
यावर काय बोलावं ते गौरम्मांना सुचेना.
तीच पुढं म्हणाली, `आम्ही ताराला सांगितलंय- आता उगाच जात-पात म्हणू नको. विश्वासानं संसार करणारा कुणी चांगला भेटला तर लग्न कर. पुन्हा तुमकूरलाही जाऊ नकोस. तिथं तर आणखी अपमानित जिणं जगावं लागेल. त्यापेक्षा इथंच राहणं चांगलं. कुणीतरी अन्याय केला आणि हिचं आयुष्य कष्टी होऊन गेलं.’
ताराची कथा ऐकत असताना गौरम्मांना तीव्रपणे विनितेची आठवण झाली. सुरभीसाठी एक अमेरिकेतला मुलगा पाहिला होता तेव्हा तिनंच सावधपणे माहिती मिळवून लग्नाला विरोध केला होता. त्या वेळी आपण तिला किती वाईट शब्दांत बोललो होतो! केवढी मोठी चूक करायला निघाले होते मी तेव्हा! सुरभीचं ते लग्न झालं असतं आणि नंतर तिचीही तारासारखीच कथा झाली असती तर?
केवळ या विचारानंही गौरम्मांच्या अंगावर काटा आला.
दुसऱ्या दिवशी श्रीकांत नावाच्या आणखी एका मित्राकडे जायचं ठरलं. त्यांचं घर स्प्रिंग फिल्डमध्ये होतं. लिंकनची समाधी असलेलं ते गाव.
चंद्रूनं लगेच सांगितलं, `अम्मा, उरलेलं सारं खाणं तू श्रीकांतसाठी ठेव. त्याला आपल्याकडचे कुरकुरीत पदार्थ फार आवडतात.’
सगळे निघाले तेव्हा पद्मानं गौरम्मांना वाकून नमस्कार करत म्हटलं, `इथं तांबूल नाही आणि नारळही नाही. इंडियन स्टोअरमध्ये गेलं तर विड्याची पानंही मिळतील आणि नारळही मिळतील. आपली मैसूर-बेंगळूरकडची पद्धत पाळायला जमत नाही म्हणून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका-’ आणि पन्नास डॉलर्स त्यांच्या हातात ठेवले.
गौरम्मांना अवघडल्यासारखं झालं. त्या नको-नको म्हणत मागं सरल्या.
पण पद्मानं ऐकलं नाही. ती म्हणाली, `तुम्हाला बघितलं आणि आईच भेटल्यासारखं वाटलं मला! तिला भेटून दोन वर्षं होऊन गेली. कुणीतरी सांगत होतं, तिला बरं नाही म्हणून. फोनवर विचारलं तर सगळं ठीक आहे म्हणूनच सांगतात. फार वाटतं, तिला जाऊन भेटून यावं म्हणून! पण ते शक्य नाही. तुम्ही नको म्हणालात तर मला वाईट वाटेल.’
बोलता-बोलता पद्माचा आवाज ओला झाला. गौरम्मांच्या डोळ्यांमध्येही अश्रू उभे राहिले. निघताना त्यांनी मागं वळून पाहिलं.
पद्माही डोळे पुसत त्यांना निरोप देत होती.
जड मनानं गौरम्मा श्रीकांतच्या घराच्या दिशेनं निघाल्या. वाटेत त्यांनी विचारलं, `चंद्रू, श्रीकांतच्या घरी बायको-मुलं आहेत ना?’
`अम्मा, इथंच हा प्रश्न विचारलास हे छान झालं! त्याच्या घरी विचारला असतास तर अवघड झालं असतं!’
`का रे? बायको वारली की काय त्याची?’
`अगदी सुखात आहे. पण त्याच्याबरोबर राहत नाही.’
`हे काय नवंच सांगतो आहेस?’
`माझ्याआधीच श्रीकांतचं लग्न झालं होतं. मद्रासमधल्या श्रीमंत घरातली ती मुलगी. रूपा तिचं नाव. डॉक्टर झाली होती. सुट्टीवर गेला असता एक दिवस धाडकन मुलगी बघितली, सहा दिवसांत धाडकन लग्नही करून मोकळा झाला. माझ्यासारखाच!’
जमुना मध्येच फणकाऱ्यानं म्हणाली, `तुम्ही माझी रूपाशी तुलना करू नका, सांगून ठेवते मी!’
`पुढं काय झालं?’
`रूपा इथं आली. इथल्या डॉक्टरीच्या काही परीक्षा असतात- त्याही पास झाली. लगोलग चांगली नोकरीही मिळाली. प्रचंड हुशार ती! भरपूर पैसे मिळवू लागली.’
`आपल्याकडेही असंच असतं ना?’
`नाही. इथले डॉक्टर आणि वकील फारच उत्तम प्रमाणात पैसा मिळवतात. रूपाही भरपूर मिळवत होती- श्रीकांतपेक्षा कितीतरी जास्त! रूपाचा अहंकारही वाढू लागला. दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. पुढं-पुढं तिची भाषाही बदलली. तुझ्यासारख्याला मी पगारावर कामावर ठेवेन म्हणून हिणवू लागली. त्याला जेव्हा सहन करणं अशक्य झालं, तेव्हा त्यांचा डायव्होर्स झाला.’
`असं कसं शक्य आहे?’
`का शक्य नाही? आता सहज शक्य आहे ते! रूपानं एका गोऱ्या डॉक्टरशी लग्न केलंय. एकुलत्या एका मुलीला तिनं मद्रासमध्ये आईकडे ठेवलं आहे. आई-वडिलांनीही तिला खूप समजावलं, पण तिनं ऐकलं नाही.’
`आणि श्रीकांत?’
`डायव्होर्स झाल्यावर त्यानं खूप मनस्ताप करून घेतला होता. आता त्यानं स्वत:च्या मालकीची कंपनी काढली आहे. फार छान चालली आहे ती. आता तर तो रूपापेक्षाही श्रीमंत झाला आहे. पैशामुळे आपल्या आयुष्याची ही गत झाली म्हणून त्वेषानं राबतो आणि पैसा मिळवतो. कितीतरी भारतीयांना त्यानं नोकऱ्या दिल्या आहेत.’
`मुलगी?’
`वर्षाकाठी दोन आठवडे रजा काढून हाच आई-वडील आणि मुलीला भेटून येतो.’
`त्यानं का दुसरं लग्न केलं नाही?’
गाडी चालवता-चालवता चंद्रू स्वगत बोलल्याप्रमाणे म्हणाला, `इथं राहता-राहता स्वत:च्या न कळत त्यांच्याही विचारांचा आमच्यावर परिणाम झाला आहे. श्रीकांत माझा अगदी जवळचा मित्र आहे हे तर खरंच- पण त्याच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करायला माझी तयारी नसते. इथल्याप्रमाणे आम्हीही वैयक्तिक स्वातंत्र्याला फार महत्त्व देतो. आई-वडीलही मुलांच्या जीवनात हस्तक्षेप करत नाहीत. ज्या क्षणी ती लक्ष्मणरेषा ओलांडली जाते, तेव्हा प्रचंड मानसिक उत्पाद घडतात. या व्यक्तिस्वातंत्र्याला धक्का लागणार नाही अशा प्रकारे आपण वागलं पाहिजे. हे स्वातंत्र्य राखण्यासाठी इथली माणसं किती त्याग करताहेत ठाऊक आहे? तेवढ्यावरून डायव्होर्सही होतात.’

Return to “Marathi Stories”