तुझ्या सारखे कोणीही नाही: १
गाडीला आणखी तब्बल चार तास अवकाश होता. आणखी चार तास त्या भकास वेटिंग रूममध्ये कसे घालवायचे हा प्रश्न त्याला पडला होता. भिंतीवर फडफणाऱ्या कॅलेंडरच्या व्यतिरिक्त कोणताही आवाज तेथे नव्हता. मधूनच एखादी गाडी धडधडत पसार होतं होती.
समोर दरवाजातून दिसणाऱ्या फलाटावरच्या भल्यामोठ्या घड्याळात अकरा वाजून चाळीस मिनिटे झाली होती. मध्येच कुणीतरी दरवाजातून आत डोकावे आणि निघून जाई. मोबाईलचे चार्जिंग संपत आल्यामुळे त्याने तो चार्जिंगला लावला होता. आता टाइमपास काय करायचा म्हणून विचारात तो पडला होता.
काही वेळ तसाच बसून राहिल्यानंतर उठून त्याने मोबाईल पहिला. ५१% चार्ज झाला होता. मोबाईल चार्जरसकट जॅकेटच्या खिशात कोंबत त्याने आपली सॅक उचलली व चालत स्टेशनच्या बाहेर आला.
सगळीकडे शुकशुकाट होता. सगळ्यात कडेच्या ट्रॅकवर एक मालगाडी थांबली होती. माथाडी कामगारांची कसलीशी पोती उतरून घ्यायची लगबग सुरु होती. तेवढाच काय तो जिवंतपणा त्या स्टेशनच्या आवारात जाणवत होता.
तामिळनाडूतल्या त्या एका छोट्याश्या स्टेशनवर गर्दी असण्याचं काही एक कारण नव्हतं. एका एनजीओच्या कामासाठी तिथे आलेल्या त्याला एकेक क्षण एका युगासारखा भासत होता.
तो स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडला. समोरच्या रस्त्यापलीकडे दोन तीन हातगाड्यांवर चहाची पातेली खदखदत होती. आजूबाजूला पाच दहा लुंगीवाले अण्णा लोक बिड्या फुकत चहाचे घोट घेत होते.
“आण्णा टी?” तो एका हातगाडीजवळ जाऊन तिथल्या माणसाला बोलला.
“हाउ मच?” अण्णाने तो तमिळेतर असल्याचं झटक्यात ओळखलं आणि तोडक्या मोडक्या इंग्रजीत प्रतिप्रश्न केला.
“वन!” त्याने खिशातल्या पाकिटातून पन्नास रुपयाची नोट काढून अण्णा समोर धरली.
“अण्णा चेंजा!” चहावाला
“नो चेंज! सिगरेट??” तो
“व्हॉट सिग्रेटा?” कदाचित अण्णाला कुठला ब्रँड असं विचारायचं असावं.
“वन!” त्याला जेवढं त्याचं इंग्रजी कळत होतं त्यावरून तो अंदाजे उत्तरं देत होता.
“बेर्कले?” अन्नाचा प्रतिप्रश्न
“नो नो! माइल्डस्!” तो
“वोके!” एक सिगारेट आणि काडेपेटी त्याच्यासमोर धरत अण्णाने आपलं चहा ढवळण्याचं काम चालू ठेवलं.
त्याने सिगारेट पेटविली आणि चहाचे घोट घेत बाजूच्या कट्ट्यावर बसून तो धुराचे लोट सोडू लागला.
एखाद्या मिनिटांत तिथे एक बस येऊन थांबली. गच्च भरलेल्या बसमधून वीसेक प्रवासी उतरले आणि क्षणात आपल्या वाटेला लागून गायबही झाले. बस निघून गेली पुन्हा तीच भकास शांतता.
जिथे बस थांबली होती तिथे एक पंचवीस एक वर्षाची तरुणी आपल्यासमोर तीनचार बॅग घेऊन उभी होती. मध्यम बांध्याच्या त्या तरुणीने अगदी फिकट गुलाबी रंगाचा घट्ट शर्ट घातला होता आणि तशीच घट्ट काळी रंगाची थ्री फोर्थ जीन्स! तिच्या शरीरयष्टीवरून एखाद दुसऱ्या वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं असावं असं वाटत होतं. तिची नजर इकडेतिकडे भिरभिरत होती. कदाचित ती एखाद्या हमालाला शोधत होती.
तो एकटक तिच्यावर लक्ष ठेऊन होता. तशा नजरेने नव्हे! त्याला माहिती होतं इथे दूरदूरपर्यंत दुसरी कुठली स्त्री असण्याची शक्यता नव्हती. तिच्यासोबत कोणती अप्रिय घटना घडू नये म्हणून तो तिच्याकडे लक्ष ठेऊन होता.
ती बावरल्यासारखी इकडेतिकडे पाहत होती. समोरचे सगळे लुंगीवाले तिला खाऊ का गिळू अशा नजरेने एकटक पाहत होते. तिला अगदी कसेसेच झाले. तिने एकदोनदा त्या बॅग उचलण्याचा प्रयत्न केला पण तिला ते शक्य नव्हते. शेवटी हार मानून ती त्यातल्या एका बॅगेवर बसली आणि मोबाईलशी चाळे करू लागली. बहुधा कुणालातरी मेसेज करत असवी. चहा संपवून तो उठला.
“अण्णा चेंज!” तो चहावल्याला बोलला. अण्णाने दहाच्या नोटा आणि काही नाणी त्याच्यासमोर धरली. त्याने ते खेशात कोंबले आणि त्या तरुणीजवळ गेला.
“एक्सक्युज मी मिस!” तो बोलला. तिने मोबाईलमध्ये गाडलेली मान वर करून प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं.
“आय मीन, आर यू वेटिंग फॉर समवन?” तो
“अंऽऽ! नॉट ऍक्चुअली! आय एम अनएबल टू कॅरी माय लगेज टू द स्टेशन!” ती
“मे आय हेल्प?? ओन्ली इफ यू वॉन्ट!” तो