शनिवारी संध्याकाळी नेहमीच्या जागी तिला यावंच लागणार होत. त्या आठवड्यामध्ये खूपच काही गोष्टी घडल्या होत्या ज्याचे तिला नीटपणे अवलोकन करायचे होते. तिला ते सगळे अनुभव आले जे बालपणतून तारुण्याकडे प्रवास करणाऱ्या एका मुलीच्या आयुष्यात फार क्वचित येतात.
"म्हणजे खरेच मी सुंदर आहे. शाळेतला असा मुलगा माझ्या मागे लागून मला प्रपोज करतो ज्याच्या साठी बाकी मुली पण तयार आहेत. पण मला का असे वाटत नाही कि माझे पण त्याच्यावर प्रेम आहे. परवा त्याने मला जवळ घेतले तेव्हा किती घाबरले होते मी. पण नंतर तेच सगळे किती आल्हाददायक वाटत होते. त्याच्या ओठांची उष्णता. तो कमरेवरती त्याच्या हाताचा स्पर्श. त्याचे खांदे किती रुंद आहेत. मला तर खरेच तिथून दूर व्हावे वाटत नव्हते. पण तरीही... प्रेम? ती भावना अजून इतकी काही तीव्र वाटत नाहीये मनामध्ये. तो जवळ असावा असे वाटते पण.. पण फक्त .. नाही नाही.. काय विचार करतीये मी. मी अजूनही त्याला नीटशी स्वीकारू शकली नाहीये. माझच काही चुकतंय का? म्हणजे मला समजत नाहीये कि हि गोष्ट कशी हाताळू. प्रथमेश छानच आहे प्रश्नच नाही. मला त्याच्याशी मिळतं जुळतं करून घ्यावं लागणार आहे. त्याच्या आणि माझ्या आवडी थोडीच सारख्या असतील? मग मी त्याच्या समजून घेतल्या आणि त्याने माझ्या समजून घेतल्या तर झाले. काही अवघड नाही. पण हे सर्व कुठपर्यंत?..." ह्याचे उत्तर काही तिला मिळाले नाही.
तिने त्या प्रश्नाचे उत्तर शोधायचे नाही असे ठरवले. कारण काही प्रश्न वेळ आली कि आपोआप सुटतात. आपण काही करायचे नसते असे तिला नेहमी वाटायचे. ती रिलॅक्स झाली. तो दरीतला घोंगावणारा वारा तिच्या मनातल्या भावनांना सहज करत होता. शरीराला भिडणाऱ्या सलील स्पर्शाने तिला प्रथमेशची पहिल्यांदाच प्रखर आठवण आली. हे पहिल्यांदाच घडले होते कि शारीरिक पातळीवर असणारे तिचे आकर्षण तिला त्याच्या आठवणींमध्ये बेभान करत होते. त्या भावनिक अवस्थेमध्ये ती घराकडे परतली.
****
सोमवारी मधल्या सुट्टीत प्रथमेश तिच्या वर्गात आला. त्याला पाहून ती लाजली. तो तिच्याकडे पहात होता. पण कोणाला कळू नये म्हणून त्याने नजर फिरवली. तिच्या जवळच्या बेंचवर बसणाऱ्या त्याच्या एका मित्राला त्याने सांगितले कि,
"शाळा सुटल्यावर तो मारुतीच्या मंदिराकडे जाणार आहे. तुला यायचं का? मागच्या विहिरीवर पोहायला."
"मला आज नाही जमणार रे. घरी काम आहे." असे तो मुलगा म्हणाला.
"ठीके." म्हणून तो पुन्हा एकदा स्वरालीकडे बघत बाहेर गेला. जाताना परत त्याने त्याला हाक मारली. "मी तर जाणार आहे. जमले तर ये."
नीलिमा स्वरालीला म्हणाली,"तुला बोलावतोय तो."
"कळले मला. एवढी बुद्धू समजू नकोस." स्वराली तिला खोट्या रागाने म्हणाली.
शाळा सुटल्यावर ती आणि नीलिमा शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या मारुती मंदिराजवळ गेल्या. कोणीतरी बोलल्याचे आवाज त्यांना ऐकू गेले.
"कशासाठी आलायस मग इथे?" कोणीतरी विचारात होतं.
"तुला काय करायचंय?" प्रथमेश म्हणत होता.
स्वराली मंदिराच्या मागच्या बाजूला आली तर तिथे प्रथमेश आणि विराज एकमेकांच्या जवळ जवळ नाकाला नाक लावून उभे होते. सगळ्यात मोठा धक्का तिला हा बसला कि तिथे तिचा मोठा चुलत भाऊ गजाननपण होता. तिने डोळे मोठे करत तोंडावर हात ठेवला. नीलिमा तर जाम घाबरली. तेवढ्यात त्या तिघांना दोघींच्या अस्तित्वाची चाहूल लागली.
"बघ रे गजा. तुला काय बोललॊ होतो मी. ती बघ स्वराली. ह्याला भेटायला आलीये.ह्यांचे खूप दिवस झाले चालू आहे."
"स्वराली! इकडे ये." गजानन ओरडला.
स्वराली घाबरी झाली होती. "आता काही खरे नाही. घरी कळणार."
" तिला तरी पण एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते कि प्रथमेश आपल्यापासून तुटू शकतो ह्या गोष्टीला आपण जास्त घाबरायला हवे तर आपण घरी कळेल म्हणून घाबरत आहोत. असले कसले प्रेम करत आहोत आपण."
"तू याला भेटायला आली होतीस?" गजाननने विचारले.
"..." स्वराली शांत होती.
आडदांड गजानन पुढे सरसावला. माझ्या बहिणीला नादाला लावतो. हरामखोर साल्या.. असे म्हणून त्याने प्रथमेशची कॉलर धरली आणि त्याच्या मुस्काटात मारली. नंतर एक, दोन , तीन, चार.. तो प्रथमेशला मारतच होता. स्वराली तोंड ओंजळीत लपवून रडत होती. भीतीने तिच्या पोटात गोळा आला होता.