चंद्रूचं बोलणं गौरम्मांना किती समजलं कोण जाणे; पण हे ठाऊक असूनही चंद्रू आपलं मन मोकळं करत होता.
काही क्षण गौरम्माही विचारात पडल्या.
नंतर त्या म्हणाल्या, `चंद्रू, श्रीकांतला बायको नाही आणि ताराला नवरा नाही. त्या दोघांनी का एकमेकांशी लग्न करू नये?’
`असं कसं शक्य आहे, अम्मा? श्रीकांतचं विवाहाच्या संदर्भात मन विटलं आहे. दुसरं म्हणजे त्या दोघांची परस्परांशी ओळख आहे, तरीही दोघे याविषयी मौन बाळगून आहेत. त्यासाठी त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल. मी यात पडून मैत्री गमवायला मुळीच तयार नाही.’
गौरम्मांना हे मुळीच पटलं नाही. रामदेवाच्या दर्शनाला देवळात गेलेल्या असताना सहज गप्पांच्या ओघात `इथं एक मुलगा लग्नाचा आहे’, `तमक्यांची मुलगी लग्नाची आहे’ एवढं सांगून कितीतरी लग्न ठरल्याचं त्यांनी जवळून पाहिलं होतं.
इथलं पाहावं तर सगळंच वेगळं! असला कसला देश हा कोण जाणे!
श्रीकांतच्या घरी ते जाऊन पोहोचले तेव्हा दुपार झाली होती. घराची मालकीण नसल्यामुळे ते भलं मोठं घर सुनं-सुनं वाटत होतं.
ते पोहोचले तेव्हा श्रीकांत घरात नव्हता. तो कुठं तरी कामावर गेला होता. पण एक सुदृढ, उमदा तरुण त्यांची वाट पाहत होता. त्यांना ओळखून त्यानं सांगितलं, `श्रीकांत संध्याकाळी येतील. तोपर्यंत तुम्ही आमच्या घरी चला.’
आश्चर्य म्हणजे तो कन्नडमध्ये बोलला. त्याचं बोलणं अत्यंत नम्र होतं. सगळ्यांनी त्याची विनंती मान्य केली. त्यानं स्वत:ची ओळख सांगितली.
`मला नाथ म्हणतात. मी मूळचा बेंगळूरचा. इथं येऊन साडेतीन वर्षं झाली.’
`काय काम करता तुम्ही?’ चंद्रूनं विचारलं.
`आधी श्रीकांतनी आपल्या कंपनीत छोट्या कामासाठी म्हणून आणलं. इथं आल्यावर काही दिवसांत मी स्वत:चा व्यापार सुरू केला.’
`कसला व्यापार?’
नाथनं अभिमानानं सांगितलं, `या छोट्या गावात मी इंडियन स्टोअर’ सुरू केलं. यानंतर इंडियन रेस्टॉरंटही सुरू केलंय. आधी सगळा व्यापार फक्त संध्याकाळीच करत होतो. सकाळी श्रीकांतकडे काम करत होतो. त्यांनीच मला या व्यवसायात पूर्णपणे पडायला सांगितलं. एवढंच नव्हे, सुरुवातीला त्यांनी मला धनसहाय्यही केलं. सर, माझ्या दृष्टीनं तेच माझे देव!
त्याच्या बोलण्यातून श्रीकांतचं आणखी एक कनवाळू रूप समोर आलं.
नाथाचंही तीन बेडरूम असलेलं घर होतं. घर बेताचं असलं तरी नीटनेटकं होतं. पाहुण्यांसाठी त्यानं रेस्टॉरंटमधून अनेक प्रकारचे खाद्दपदार्थ आणून ठेवले होते.
त्याची पत्नी मालती हसतमुख होती. तिनं पाहुण्यांचं मनापासून स्वागत केलं. आग्रह करून तिनं सगळ्यांना जेवू घातलं. सगळ्यांना बरं वाटलं.
मालती घरातच मोती, पोवळी, खडे यांचा व्यापार करायची. शिवाय नवऱ्यालाही त्याच्या कामात ती मदत करत होती.
नाथनं सांगितलं, `मला बेंगळूरमध्ये पार्ट-टाईम नोकरी होती. खूपच ओढाताण व्हायची. आता मीच लोकांना नोकरी देतो. केवळ साडेतीन वर्षांत एवढा फरक झालाय! मला तर हा देश फार आवडला. इथं कशाचीच कमतरता नाही. मी इथं न येता तिथंच राहिलो असतो तर कुठं तरी कारकून होऊन खर्डेघाशी करत बसलो असतो. या देशाला कुणी नावं ठेवू लागलं तर मला मुळीच आवडत नाही. मी काही तुमच्याइतका शिकलेला नाही. मला जे वाटलं ते बोललो.’
त्याचं काही खोटंही नव्हतं. बेताचं शिक्षण घेतलेल्या मुलाचं भारतात काय भविष्य आहे? त्याची कष्ट करायची तयारी असली तरी तशी संधी कुठं मिळते?
रात्री श्रीकांत आला. नाथाच्या हॉटेलात सगळे रात्री जेवले. नाथानं कुणाच्याच जेवणाचं बिल घेतलं नाही.
निघायची वेळ झाली. गौरम्मांनी चौकशी केली, `बेंगळूरमध्ये तुमचं घर कुठल्या भागात आहे?’
`जयनगर भागात. सदोतिसाव्या क्रॉसच्या अगदी अखेरीस. अर्थात तिथं नाथ म्हटलं तर कुणाच्याही लक्षात येणार नाही. गोपीनाथ माझं नाव. आमच्या कंपनीत दोन गोपीनाथ झाले, त्यामुळे त्याला गोपी हे नाव पडलंय आणि मला नाथ म्हणतात, आमचं जुनं घर पाडून त्या जागी `श्रीकांत काँम्लेक्स’ करायचा माझा विचार चाललाय.’
गाडीनं वेग घेतला. गौरम्मांचं डोकं गरगरल्यासारखं झालं. कारण हा नाथ म्हणजे कोण हे त्यांच्या स्पष्टपणे लक्षात आलं होतं.
याच गोपीनाथशी लग्न करायची सुरभीची इच्छा होती आणि त्या वेळी आपणच `हा नको- आपण अमेरिकेचा नवरा शोधू या’ असं सांगून तिला त्यापासून परावृत्त केलं होतं. त्या वेळी विनिता आणि गिरीशनं `मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे?’ असंही म्हटल्याचं आठवलं.
त्या वेळी आपण संतापानं `तू तुझ्या मुलीला दिली असतीस काय?’ म्हणून विचारलं होतं.
खरोखरच सुरभीचं याच्याशी लग्न झालं असतं तर मालतीच्या जागी तीच दिसली असती.
गौरम्मांनी नि:श्वास टाकला.
एका दुपारी चंद्रूनं घरी फोन केला. फोन गौरम्मांसाठी होता. `अम्मा, अर्ध्या तासात तयार हो. तुला लगेच शिकॅगोला गेलं पाहिजे.’
`का रे? आणि तुम्ही?’
`ते सारं आल्यावर सांगेन.’
तपशील समजला नाही, तरी गौरम्मा एका किटमध्ये चार साड्या कोंबून तयार झाल्या.
घरी आलेल्या चंद्रूनं सांगितलं, `अम्मा, पद्माचा फोन आला होता. राजीव आणि तारा इंडियाला गेले आहेत. पद्माच्या थोरल्या मुलाला खूप ताप आलाय म्हणे. तिच्या बाळंतपणाला आणखी पंधरा दिवस आहेत, पण त्या घाबरल्या आहेत. सोबतीला कोण येईल असं वाटून त्या रडू लागल्या.’
`अरे, दिवस भरलेल्या गर्भारशी अशी एकटी टाकून राजीव-तारा आता का गेले?’
`त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आलाय म्हणे. त्यांचं काही सांगता येत नाही. एकच मुलगा आणि एकच मुलगी. अखेरच्या क्षणी त्यांना न जाऊन कसं चालेल?’
`तेही खरंच आहे म्हणा!’
असं म्हणाल्या तरी गौरम्मांना पद्माविषयी कणव दाटून आली. त्या म्हणाल्या, `तू आणि जमुना चार दिवस मुलीकडे पाहा. मी पद्माकडे राहायला जाते. अचानक बाळंतीण झाली तर अगदी अनाथासारखं वाटायला नको तिला! बाळंतपण केलं तर काशी यात्रेचं पुण्य मिळतंय बाबा!’
प्रथमच चंद्रूच्या मनात आईविषयी अभिमान दाटून आला. डॉलरवरच्या अपरिमित प्रेमापायी विनितेच्या मनाला होरपळून टाकणाऱ्या गौरम्मा परक्या स्त्रीच्या दु:खामुळे मृदू झाल्या होत्या. आपण होऊन मदतीसाठी जाण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. यापुढे त्याला मागं घडून गेलेल्या गोष्टी गौण वाटल्या.
पद्माचा फोन येताच चंद्रूनं तिला सांगितलं होतं, `तुम्ही काहीही काळजी करू नका! मी माझ्या आईला तुमच्याकडे पाठवून देतो. ट्रेल बसनं पाठवून देईन तिला. उतरवून घ्यायला कन्नड येणाऱ्या कुणाला तरी पाठवून द्या. कारण तिला कन्नडशिवाय दुसरी कुठलीही भाषा येत नाही. शिवाय तिनं एकटीनं कधीच प्रवास केलेला नाही.’
हे सांगताना `अम्मानं घाबरून जायला नकार दिला तर?’ असा विचारही त्यानं केला नव्हता.
घाईनं निघताना, तेवढ्याच वेळात गौरम्मांनी गावाकडून आणलेल्या शेवया आणि पापड सोबत बांधून घेतले.
चंद्रूनं जमुनाला फोन करून सारं सांगितलं. बहुधा तिला गौरम्मांचं अचानक निघून जाणं आवडलं नसावं. कारण चंद्रू फोनवर थोड्या रोषानंच सांगत होता,
`जमुना, तुला त्रास होणार असेल तर तू चार दिवस रजा घे. मानसीलाही तुझ्या मैत्रिणीच्या घरी कदाचित ठेवावं लागेल. अम्माला मात्र मी ठरल्याप्रमाणे पाठवून देणार आहे!’ आणि त्यानं फोन आपटून ठेवला. गौरम्मांना मात्र त्यानं काहीही सांगितलं नाही.
मानसीला थोपटत तो म्हणाला, `अम्मा, अगदी शेवटच्या स्टॉपवर उतरायचं. कितीही वेळ लागला तरी तिथंच उभी राहा. कुणी कन्नडमध्ये बोललं तरच त्यांच्याबरोबर घरी जा. घरी जाऊन पोहोचताच पद्माला इथं फोन करायला सांग. वाटेत हात-खर्चाला हे शंभर डॉलर्स राहू दे. हा कागद जपून ठेव. यावर इथला आणि पद्माचा घरचा फोन नंबर आहे. तू घाबरू नकोस. जमुनाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.’
`पण मानसीला कुठं ठेवशील?’
`तू त्याची काळजी करू नकोस. सगळी व्यवस्था होईल. तू निश्चिंतपणे गावाला जाऊन ये.’
चंद्रूनं गौरम्मांना ट्रेलबसमध्ये बसवून दिलं. काय ती बस! किती मोठी आणि आरामशीर तर इतकी की कल्पना करणंही कठीण! पण बसमध्ये अगदीच मोजके प्रवासी होते.
अंबाडा बांधून कासोट्याचं लुगडं नेसलेल्या आणि वर कोट घातलेल्या गौरम्मांकडे अनेकांनी दृष्टी टाकली.
गौरम्मांनी सभोवताली पाहिलं. खिडकीपाशी एक त्यांच्याच वयाची गोरी प्रौढा बसली होती. त्या तिच्यापाशी जाऊन बसल्या. यावरच्या तिच्या प्रतिक्रियेचा मात्र त्यांना धक्का बसला. तिनं त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त करणारा कटाक्ष टाकला आणि ती ताडकन उठून दुसऱ्या जागी बसली!
गौरम्मांना कुणी तरी मुस्काटात मारावं तसं झालं. पाठोपाठ त्यांना बेंगळूरात घडलेली एक घटना आठवली.
एकदा दुपारी गौरम्मा सिटी मार्केटच्या बसमध्ये चढल्या. त्यांच्या घरासमोरचा रस्ता झाडणारी मुक्तालम्बाही त्याच बसमध्ये चढली आणि त्यांच्या शेजारची जागा रिकामी असल्यामुळे तिथे येऊन बसली. त्या वेळी गौरम्मांचा संताप शिगेला पोहोचला होता. काय हे! रस्ता झाडणाऱ्या मुक्तालम्बानं आपल्याला खेटून बसण्याइतकी सलगी दाखवायची म्हणजे काय! त्या वेळी त्याही अशाच ताडकन उठल्या होत्या.
या अमेरिकेत मीही मुक्तालम्बाच आहे काय?
तोंडातून अवाक्षर न काढता त्या बाईनं `मी गोरी- तू काळी’ हे वागण्यातून स्पष्टपणे दाखवून दिलं होतं!
गौरम्मांना तीव्रपणे जाणवलं- आपल्याला या क्षणी जे वाटलं, तेच त्या वेळी मुक्तालम्बालाही वाटलं असेल ना! काही झालं तरी या गोऱ्यांशी आपलं जमणं शक्य नाही. आपल्याच विचारांच्या तंद्रीत गौरम्मा खिडकीबाहेर पाहत बसल्या.
शिकॅगोच्या बसस्थानकावर गौरम्मा उतरल्या तेव्हा त्या गांगरून गेल्या होत्या. न्यायला कुणीच आलं नाही तर काय करायचं? आपल्याला भाषाही येत नाही!
अर्धा-एक तास गेला असेल.
`तुम्ही गौरम्मा ना?’ अचानक गौरम्मांच्या कानांवर कन्नड शब्द पडले. त्यांनी वळून पाहिलं- पन्नाशीच्या घरातली एक स्त्री त्यांच्याशी बोलत होती.
`होय. तुम्ही?’
`मी वत्सला. पद्मानं फोन करून सांगितलं होतं. ट्रॅफिक जाम झाल्यामुळे अर्धा तास उशीर झाला मला. क्षमा करा.’
दोघीही वत्सलाच्या गाडीत बसल्या. वाटेत गौरम्मांनी आपण होऊन चौकशी केली तेव्हा थोडी माहिती मिळाली.
वत्सलाचं माहेर बीदर. नवरा रुदेश मैसूरचा. इथं येऊन अठ्ठावीस वर्षं झाली होती. कुठल्याशा मोठ्या कंपनीमध्ये ते वरच्या जागेवर नोकरी करत होते.
त्या घरी पोहोचल्या तेव्हा पद्मा त्यांचीच वाट पाहत उभी होती. वत्सलानं त्यांना सोडलं आणि तशीच बाहेरच्या बाहेर निघून गेली.
गौरम्मांना पाहताच पद्माला समाधान वाटलं. ती बोलू लागली,
`तुम्ही याल की नाही असं वाटलं होतं! जमुना काय म्हणेल असं वाटलं होतं. मला तर खूप भीती वाटते!’
`बाळंतपणाला एवढं काय घाबरायचं बाईच्या जातीनं? आमची नाही का बाळंतपणं झाली? आता तर मीही आलेय ना!’
दोघी घरात आल्या. पद्मा म्हणाली, `तुमचा काळ वेगळा होता. देशही वेगळा होता. त्या वेळी घरात कितीतरी मोठ्या बायका असायच्या. इथं आम्हीच घुबडासारखे राहत असतो ना! कुणाचीच सोबत नसते.’
`पद्मा, घरी फोन करून मी येऊन पोहोचल्याचं चंद्रूला कळवता का? त्यानं अगदी बजावून सांगितलंय.’
`पद्मा, घरी फोन करून मी येऊन पोहोचल्याचं चंद्रूला कळवता का? त्यानं अगदी बजावून सांगितलंय.’
पद्मानं लगेच चंद्रूला फोन करून गौरम्मा पोहोचल्याची बातमी कळवली.
पद्माच्या मुलाचा विकासचा ताप उतरला असला तरी चेहरा सुजला होता.
`डॉक्टरांनी असलेलीच औषधं सुरू ठेवायला सांगितलंय. इथून दहा मैलांवर त्यांचं शॉप आहे. मलाच गाडी चालवायला हवी ना! पोटात दुखल्यासारखं होतं.’
`तुमच्या यजमानांच्या ऑफिसमधला शिपाई असेल ना! त्याला तात्पुरतं घरी झोपायला बोलवायचं.’
`इथं तशी पद्धतच नाही ना! प्रत्येकजण आपापल्या कामांमध्ये गुंतलेला असतो. प्रकृती ठणठणीत असताना इथं राहावं बघा! प्रकृतीच्या अडचणी असतील तर कुणीही मदत करायला येत नाही. कुणालाही वेळ नसतो इथं!’ दुखावलेली पद्मा मोकळेपणानं बोलत होती.
गौरम्मांनी लवकरच स्वयंपाकघराचा ताबा घेतला आणि आजारी विकाससाठी काढा उकळायला ठेवला. पद्मानं विचारलं, `काय हे? कुणासाठी?’
`तुझ्या आजारलेल्या विकाससाठी. आम्ही आमची मुलं अशीच वाढवली आहेत. हवं तर उद्दा डॉक्टरांकडे घेऊन जाऊ या.’
मुलाला काढा पाजत पद्मा म्हणाली, `अपॉइंटमेंट असल्याशिवाय हे शक्य नाही.’
एवढ्यात फोन वाजला. राजीवचा फोन होता. फोनवर बोलल्यानंतर पद्माचा चेहरा आणखी उतरला.
`माझे सासरे वारले! आता आणखी पंधरा दिवस त्यांना येता येणार नाही म्हणत होते. तुम्ही आल्याचं सांगितलंय त्यांना. तुम्हीच सांगा, इथं दिवस भरलेल्या बायकोला टाकून गेलेत! त्यांना समजायला नको काय?’
`अगं, पण मुलानंच अंत्यविधी केले पाहिजेत ना! ते त्यांचं कर्तव्य नाही काय?’
`पण जिचा हात धरलाय, त्या बायकोच्या संदर्भातही कर्तव्ये नाहीत काय? तुम्ही बघताय- घरात आजारी मूल- मी अशी! तुम्ही आहात म्हणून ठीक आहे. नाही तर माझे किती हाल झाले असते!’
दोनेक दिवसांत विकास बरा झाला. त्याला घेऊन दवाखान्यात जाताना पद्माच गाडी चालवत होती. जाताना गौरम्मा काळजीयुक्त स्वरात म्हणाल्या, `सावकाश चालव गाडी! आधीच गर्भारशी तू!’
`इथं तसं चालत नाही, अम्मा! रस्त्यावरन अमुकच वेगानं गेलं पाहिजे असा कायदा आहे!!’ पद्मा म्हणाली.
पद्मासाठी गौरम्मा दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, खिरी आणि इतर खाद्यपदार्थ करत होत्या. मधूनच काढे पाजत होत्या. इतरही खाद्यपदार्थ करून तिला कौतुकानं वाढत होत्या, आग्रह करत होत्या.
एकदा त्या उत्साहानं म्हणाल्या, `मला बोलवायला त्या वत्सला नावाच्या बाई आल्या होत्या ना? त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना बोलाव हवं तर! मी खाणं-पिणं करेन.’
`वत्सला शक्यतो कुणाच्याही घरी जात-येत नाही.’
`का?’
`ती एक मोठीच कथा आहे. वत्सलाचे आई-वडील खेड्यात राहायचे म्हणे. वत्सला हुशार असूनही तिच्या आई-वडिलांनी तिचं लवकर लग्न लावून दिलं. तिला शिक्षणाची खूप आवड. इथं येऊन ती शिकली.’
`त्रास झाला असेल पण!’
`होय ना! त्या वेळी इथं इतके भारतीयही नव्हते. मुलाला बेबी-सिटिंगमध्ये ठेवून रात्रं-दिवस अभ्यास केला. घरचं सगळं करून. नंतर मात्र चांगली नोकरी लागली.’
`किती मुलं तिला?’
`एकच मुलगा आहे. अशोक त्याचं नाव. पण-’
`का? काय झालं? संसारात किरकोळ खटके उडाले की संसारच मोडतात इथं! तसं काही झालं का?’
`छे:! तसं काही नाही. तुमची काही तरी चुकीची समजूत झाली आहे. वत्सलेचे यजमान रुद्रेश अतिशय चांगले गृहस्थ आहेत. नवरा-बायको परस्परांशी अत्यंत प्रेमानं राहतात. दोघांनीही इथं चांगलं नाव कमावलं. राजवाड्यासारखी चार घरं आहेत त्यांची. घरात चार गाड्या आहेत. भरपूर पैसा मिळवलाय त्यांनी.’
`मग त्रास कसला आहे?’