दिवसांमागून दिवस गेले, महिनेही गेले तरी विनितेकडून उत्तर आलं नाही. चंद्रूला काळजी वाटू लागली- पत्र आणखी कुणाच्या तरी हाती पडलं नसेल ना? अमेरिकेत काही वर्षं राहिल्यामुळे आपला अशा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन मोकळा असतो. धारवाडच्या माळमड्डीवर राहणाऱ्यांची दृष्टी वेगळी असते.
चंद्रूला स्वत:च्या अविचारीपणाचा राग आला.
अखेर एक दिवस पाकीट आलं. त्यानं लिहिलेलं पत्रच माघारी येऊन त्याला पोहोचलं होतं. पत्त्यावर ही व्यक्ती राहत नसल्याच्या शेऱ्यासहित पत्र आलं होतं.
आपलं पत्र आणखी कुणाच्या हातात पडलं नाही म्हणून सुस्कारा सोडत असतानाच चंद्रू गोंधळून गेला. कुठे गेली विनिता?
मनात पालवलेल्या आशा-आकांक्षा आणि गुपिताच्या त्या पत्रासोबत चिंध्या करून चंद्रूनं त्या कचऱ्याच्या टोपलीत टाकल्या. त्याचं मन निराशेनं भरून गेलं. आंब्याचं मोहोरलेलं झाड कोकिळेच्या कूजनाची आतुरतेनं वाट पाहत होतं- पण कोकिळा वेगळ्याच वृक्षावरच्या घरट्यात शिरली होती.
गौरम्मांनी शामण्णांना स्पष्टपणे सांगितलं होतं,
`अहो, बेंगळूरमध्ये घर असतं तर गोष्ट वेगळी! धारवाडमधलं घर घेऊन काय करायचं? आपल्याला काय उपयोग धारवाडमधल्या घराचा? आपल्या घरचं हे पहिलं लग्न आहे. त्यासाठी परगावचे भरपूर नातेवाईक जमतील. सगळे विचारतील- मुलीकडच्यांनी काय काय दिलं? त्यांना म्हणावं, आमच्या गावात तीन दिवसांसाठी एक चांगलं कार्यालय धरा आणि छान लग्न करून द्या. आपल्याला हुंडा मुळीच नको. म्हणावं, सालंकृत कन्यादान करून द्या. त्यांच्याच मुलीला सोनं घालू द्या. आम्हांला काही नको. लग्नाला माणसं येतील त्यांना जेवण आणि खाणं-पिणं मात्र उत्तम करा म्हणावं. ती माणसं काय पुन्हा-पुन्हा आपल्या घरी येणार आहेत? नंतर एक उत्तम रिसेप्शन करून द्या म्हणजे झालं!’
`गौरी, आपण यात लक्ष घालू नये. विनिता आणि गिरीशलाच घराच्या संदर्भात जे ठरवायचं ते ठरवू द्या. स्वत:च्या मालकीचं घर विकून गावभरच्या नातेवाईकांकडून शाबासकी मिळण्यात काय अर्थ आहे? माझं मत असं आहे!’ शामण्णांनी सांगितलं.
गिरीशनं आई-वडिलांची मतं ऐकून घेतली. विनिताशी बोलल्यानंतरच धारवाडच्या घरासंदर्भातला निर्णय घ्यायचा, हे त्याचं पक्कं ठरलं होतं.
लग्न ठरल्याच्या आनंदापेक्षा धारवाडचं घर विकण्याच्या विचारानं विनिता दग्ध झाली होती. पण मनातला दाह कुणापुढे व्यक्त करणार? घर जुनं होतं, काही ठिकाणी पडझडही झाली होती; पण ते घर म्हणजे तिच्या लहानपणी मृत्यू पावलेल्या आईची आठवण होती. आता तिचं असं या जगात केवळ ते एक घरच होतं. तिचं बालपण त्या घरात गेलं होतं. रात्रीच्या काळोखातही ती कुठलं झाड कुठं आहे हे दाखवू शकत होती.
झाडा-वृक्षांच्या सान्निध्यात वाढलेल्या विनिताच्या मनात दु:ख-वेदना ठसठसू लागली की, याच झाडा-वृक्षांच्या सान्निध्यात तिचा निचरा होऊन विनिता पुन्हा आनंदित होत असे. ती बाग- तो निसर्ग तिच्या दृष्टीनं केवळ स्थावर मालमत्ता नव्हती, तोच तिचा सखा-सांगाती होता. घरात भरपूर कामाचं ओझं असलं तरी झाडांच्या आणि सुरांच्या सावलीत तिला कष्टाचाच नव्हे; साऱ्या जगाचाच विसर पडत होता.
केवळ तीन दिवसांच्या उत्सवासाठी असलं जिवाभावाचं घर आणि बाग विकून टाकणं हा विचारच तिला अत्यंत हिंस्त्र वाटत होता. बाग आणि घर विकून आलेल्या पैशांमधून सोनं-नाणं, रेशमी साड्या, चांदीची भांडी घ्यायची- त्या साड्यानी आपला देह झाकायचा- तिला सारंच असह्य होत होतं.
पण तिला कुणीही `या संदर्भात तुला काय वाटतं?’ असं विचारलं नव्हतं. शिवाय ते व्यवहार्यही नव्हतं. धारवाडचं घर विकल्याशिवाय लग्न होणंच शक्य नव्हतं. त्यामुळे आता तिच्यापुढे केवळ दोनच पर्याय होते- लग्न की घर? मन काहीही म्हणत असलं तरी तिला घरावरचा मोह सारावा लागणार, हे तिलाही समजत होतं.
घशाशी आलेला आवंढा गिळत विनिता बसमधून उतरली. समोर गिरीश होता. तिनं पटकन डोळे टिपले; पण गिरीशच्या तीक्ष्ण नजरेनं हे जाणलं होतं.
`विनिता, थोडं काम आहे. रजा टाकून येणार का?’
`हं-’ म्हणत तिनं मान डोलावली आणि ती गिरीशबरोबर चालू लागली.
पावलं गिरीशबरोबर पडत असली तरी, विनितेच्या मनात अनेक आशंका उमटत होत्या. याआधी ती कधीच एखद्या तरुणाबरोबर अशी फिरायला बाहेर पडली नव्हती. तरीही मनाच्या कोपऱ्यात एक आशा डोकावत होती- आपला पती होणाऱ्या या तरुणाला आपण आपल्या मनातली भावना बोलून दाखवली तर घर विकणं टाळता येईल का?
लालबागमध्ये सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे कोवळ्या प्रेमिकांची वर्दळ होती. एका चाफ्याच्या वृक्षाखाली असलेल्या दगडी बाकाच्या टोकावर बसत विनितेनं विचारलं, `काय बरं? कशाला बोलावलंत मला?’
`थोडं काम होतं? तुमच्या धारवाडच्या घराच्या संदर्भात थोडं बोलायचं होतं.’
विनितेच्या हृदयाची धडधड वाढली.
गिरीश पुढं म्हणाला, `धारवाडचं घर विकून लग्न करायला माझा विरोध आहे, हेच तुम्हांला सांगायचं होतं! तुमचं या बाबतीत काय मत आहे?’
मस्तकावर मध्यान्हीचा सूर्य तळपत असताना हजारो कारंजी एकाच क्षणी सर्व बाजूंनी उसळावीत तसा विनितेला अनुभव आला. सुकून निष्प्राण झालेल्या वेलीवर अमृत-सिंचन व्हावं तशी ती डवरून आली.
गिरीश पुढं म्हणाला, `आजच्या दिवसांत एक घर बांधणं किती कठीण आहे, हे मला ठाऊक आहे! आमचं छोटं घर आहे. माडीवरच्या दोन खोल्या बांधण्यासाठी आम्ही वीस वर्षं धडपडत होतो तरी जमत नव्हतं. आता आमचा थोरला भाऊच अमेरिकेत असतो. तो तिथं डॉलर्स वाचवून आम्हांला पाठवून देतोय. म्हणून आम्ही माडीवरच्या खोल्यांचं बांधकाम काढलं आहे. केवळ दोन खोल्या वाढवायला दोन लाखांपेक्षा जास्त खर्च आला आहे.’
विनिता मूकपणे गिरीशचं बोलणं ऐकत होती.
`दोन दिवसांसाठी सगळे पाहुणे जमतील; `लाडू उत्तम होते, अमुक छान होतं, तमुक रुचकर होतं’ म्हणत निघून जातील; पण एकदा हातातून गेलेलं घर पुन्हा मिळणार आहे काय?’
आता तीही म्हणाली, `मलाही तसंच वाटत होतं. पण तुम्ही काय म्हणाल म्हणून काही बोलले नाही.’
तिच्या आवाजातला आनंद लपत नव्हता. चेहराही समाधानानं फुलला होता.
`विनिता, आपण राघवेंद्रस्वामींच्या मठात अगदी साधेपणानं लग्न करू या. मी तुला एक साडी आणि मंगळसूत्र एवढंच देईन. एक वेळ जेवण देऊ या. या सगळ्या नातेवाईकांना थेट मठात बोलवायचं आणि तिथून परस्पर निरोप द्यायचा. माझा सगळा पगार मिळून साडेतीन हजार रुपये आहे. आईच्या हातात दोन सोन्याच्या बांगड्या आहेत आणि घर. एवढीच आमची संपत्ती. याशिवाय आणखीही एक मूल्यवान ऐवज तुझ्याकडे असेल!’
`तो कोणता?’ विनिता बुचकळ्यात पडली.
`मी!’
`त्या बाबतीत माझ्याइतकी श्रीमंत मीच!’ विनिता लाजून; पण मनापासून म्हणाली.
`गिरीशचं लग्न ठरलंय. तुला त्यासाठी इथं आलंच पाहिजे. केव्हा जमेल ते कळव. म्हणजे तसा मुहूर्त ठरवता येईल.
तू घरातला थोरला मुलगा! खरं पाहता आधी तुझं लग्न व्हायला पाहिजे. तू कळवलंस म्हणून आधी गिरीशचं लग्न ठरवलं आहे एवढंच.
मुलगी तुझ्या वडिलांच्या शाळेत नोकरी करते. पेन्शनर झाल्यानंतर तू पाठवलेल्या पैशांमधून माडीवरच्या दोन खोल्यांच्या बांधकामावर तुझे वडील लक्ष ठेवत आहेत. चंद्रू, तू नसतास तर आमचे हे दिवस कसे गेले असते, या विचारानंही मन घाबरं होतं!’
आईचं विस्तृत पत्र वाचून चंद्रूला आनंद झाला. पत्रात गिरीशच्या बायको होणाऱ्या मुलीचं नाव लिहायचं राहून गेलं होतं. गिरीश किंवा शामण्णांना पत्र लिहायची सवय नव्हती. त्यामुळे आईच्या पत्रातून जेवढं समजत होतं तेवढंच.
आईनं भरपूर आग्रहानं लिहिलं असलं तरी, आता भारतात जाण्यात शहाणपणा नाही, हे चंद्रूला समजत होतं. भावाच्या लग्नाचं कौतुक म्हणून भारतात गेलेल्या वेळीच जर ग्रीनकार्ड मिळण्याची संधी हुकली तर आपल्यावर कायमचे अविवाहित राहण्याची पाळी येईल! तीन वर्षं इथल्या जीवनाची सवय झाली आहे. संधी हुकली तर पुन्हा बेंगळूरमधल्या त्या खुराड्यासारख्या घरात गर्दी करून दाटीवाटीनं आयुष्यभर राहावं लागेल.
त्याऐवजी आता लग्नासाठी म्हणून शंभर डॉलर पाठवले तर त्यांना चार हजार रुपये मिळतील. काहीतरी खर्च करून खूष होतील.
पण आता विनिता कुठं असेल? तिची साथ ज्याला लाभेल तो मात्र खरोखरच नशिबवान म्हटला पाहिजे. तो दररोज तिची सुरेल गाणी ऐकू शकेल! तिच्यासारखी मुलगी दिवा घेऊन शोधत फिरलं तरी दुसरी सापडणार नाही! त्यासाठीही नशीब हवं ना!
चंद्रूनं सुस्कारा सोडला.
सासरी विनितेचे दिवस आनंदात चालले होते. तिच्यावर पित्याप्रमाणे वात्सल्याचा वर्षाव करणारे सासरे तिची मुलीप्रमाणे काळजी घेत होते. हृदयात प्रेमाला परमस्थान देणारा पती गिरीश होता!
सासूबार्इंनीही तिला कधी एखाद्या का होईना, कटू शब्दानं दुखवलं नव्हतं; पण त्यांच्या वागण्यात सासऱ्यांइतकी आत्मीयता नव्हती. त्यांचा स्वभावही फारसा बोलका नव्हता. त्यांच्या अंतर्मनात काय दडलंय हे विनितेला संपूर्णपणे कधीच उमजत नव्हतं. त्यांच्या बोलण्यात आणि मनातल्या भावनेत भेद असल्याचा अनुभव अधूनमधून विनितेला येत होता. त्यांच्या बोलण्यात भावनेपेक्षा व्यावहारिक कर्तव्याचा भाग अधिक असे.
हे विनितेच्या लक्षात आलं तरी तिला वाटायचं, इतर सासवांपेक्षा हे कितीतरी चांगलं, नाही का? त्या निदान घालून-पाडून बोलत नाहीत- वाईट वागत नाहीत.
सुरभीच्या वागण्यात अजूनही अल्लडपणा होता. तिला अजूनही फक्त सिनेमा, साड्या, खाणं-पिणं, मैत्रिणींबरोबर फिरणं यातच आनंद वाटत होता. कॉलेज संपवून ती घरातच असली तरी घरातल्या कुठल्याही कामाला ती हात लावत नव्हती. आईही मुलीत आपले पंचप्राण असावेत, अशा प्रकारे मुलीला जपत होती! सुरभी म्हणजे राजकुमारी आहे, तिला कुणीही कुठलंही काम सांगायचंच नाही, हे गृहीतच होतं. चुकून कुणी काही काम सांगितलंच तर त्या म्हणायच्या,
`अय्यो! ती आणखी कितीसे दिवस इथं राहणार आहे? इथं आहे तितके दिवस तिला आरामात असू द्या ना!’
सुरभीच्याच वयाची विनिता पहाटे पाच वाजता उठायची. सुरभी मात्र नऊ वाजता उठायची. त्यानंतरचा सारा वेळ ती टीव्ही पाहण्यात आणि नटण्यामुरडण्यात घालवत असे.
तसं पाहिलं तर त्या घरातही श्रीमंतीचं कुठलंही लक्षण नव्हतं. तरीही विनिता सुखी होती. पतीबरोबर प्रेम आणि जीवनातले अनुभव वाटून घेत तिचा समाधानी जीवनक्रम चालला होता. केवळ पैसा आणि दागदागिन्यांमुळे स्त्री सुखी होते, या भ्रमात ती कधीच नव्हती.
कधी-कधी तिला एका गोष्टीची मात्र खंत वाटत असे. गिरीशच्या स्वभावात कुठलीही खोट नव्हती. त्याच्यामध्ये असलेला संगीतप्रेमाचा अभाव ही एकच गोष्ट विनितेला अधूनमधून खट्टू करत होती; पण ही गोष्ट इतकी छोटी होती की, विनिता कधी त्याचा उच्चारही करत नव्हती.
शामण्णांना मात्र तिच्या संगीत-कलेचं कौतुक होतं. ते दररोज तिच्याकडून दोन-चार गाणी-भजनं ऐकत. त्यांनी तर तिला आणखी संगीत शिकायचाही आग्रह केला होता.
धारवाडमध्ये विनितेचं हिंदुस्थानी संगीतात शिक्षण झालं होतं. बेंगळूमध्ये तसा गुरू भेटणंही कठीणच होतं. शिवाय तिला संगीताकडून आत्मतृप्तीखेरीज आणखी कशाचीच अपेक्षा नव्हती. वसंतबनात गाणाऱ्या कोकिळेला कुठं राजदरबारातल्या उच्च स्थानाची अपेक्षा असते?
अलीकडे तिची नोकरी सरकारी झाली होती. त्यामुळे तिचा पगारही समाधानकारक होता. धारवाडचं घर न विकल्यामुळे तिच्या मनात समाधानाबरोबरच गिरीशविषयी कृतज्ञभावना काठोकाठ भरलेली असे.
गिरीशही नेहमीप्रमाणेच राहात होता. त्यांच्या श्रीमंत नसलेल्या जीवनात समाधान काठोकाठ भरलेलं होतं. दिवस कसे जात होते, ते त्या दोघांनाही कळत नव्हतं.
शशिकला विनितेच्या शाळेतच नोकरी करत होती. त्या दोघींचं पटायचंही खूप. दोघी एकाच वेळी नोकरीला लागल्या होत्या. शशी अजून नोकरीत कायम झाली नव्हती. दोघीही परस्परांची सुख-दु:खे एकमेकींना सांगायच्या.
त्या दिवशी शशी शाळेत आली तेव्हा तिचा चेहरा उल्हासानं फुलला होता. मनातला आनंद लपवण्याचा शशीचा प्रयत्न विफल होत होता.
तिला पाहताच विनितेनं विचारलं, `काय गं? काय बातमी आहे? एवढा कसला आनंद?’
`आत्ता नको! लंच-टाईममध्ये सांगते-’ शशी उद्गारली.
`सांग तर!’
`अंहं- दुपारी पवित्रा हॉटेलला जाऊ या. तिथं सांगेन.’
`पार्टी आहे?’
शशी हसली.
दुपारी लंच-टाइमला दोघी ठरल्याप्रमाणे पवित्रा हॉटेलच्या माडीवर गेल्या.
खुर्चीवर बसल्या-बसल्या विनिता म्हणाली, `शशी, अभिनंदन!’
`विनू, तुला कसं समजलं?’
`तुझा चेहरा बघून!’
शशीचा चेहरा आणखी लाल झाला. ती सांगू लागली,
`आमच्या वडिलांच्या मित्राचा मुलगा. शंकर त्याचं नाव.’
`लग्न कधी?’
`आणखी दोन-तीन महिन्यांनंतर होईल असं वाटतं. आजच त्यांचे वडील घरी येऊन गेले. एवढ्यात मुहूर्त नाही.’
`कार्यालय मिळाल्यानंतर लग्न होईल म्हण ना! मुहूर्ताचं काही विशेष नाही!’ विनिता हसत म्हणाली.
`मला नोकरी सोडावी लागेल, विनू!’
`शंकर कुठली नोकरी करतात? काय शिकलेत ते?’
शशीचा चेहरा उतरला. शंकर मैसूरमध्ये राहात होते. एम. एस्सी चौथ्या क्रमांकानं पास होऊनही त्यांना बरी नोकरी मिळाली नव्हती. आता ते तात्पुरती क्लासेसमध्ये शिकवण्याची नोकरी करत होते.
`मग एवढ्यात लग्नाचा का विचार करताहेत?’
`दोन्ही घरांमध्ये खूप वर्षांचे स्नेहसंबंध आहेत. माझी आईच म्हणाली- नोकरीची वाट बघत लग्न पुढं टाकायला नको. मीही नोकरी करून संसाराला हातभार लावू शकेन किंवा दोघं मिळून क्लासेस सुरू करू.’
`हं. तेही खरंच म्हणा! उगाच लग्न का पुढं ढकलायचं? बरं! साखरपुडा कधी?’
`त्यांच्या घरी साखरपुडा करायची पद्धत नाही म्हणे. एकदम लग्नच. विनू, मला मात्र काही वेळा भीती वाटते बघ!’
`भीती कसली?’
`सगळं ठीक होईल ना?’
`होईल गं! सगळं ठीक होईल. माझाच अनुभव सांगते. दोघं मिळून कष्टाची तयारी ठेवा. धैर्य गमावू नका.’
भविष्यात काय दडलंय ते कुणास ठाऊक! तरीही विनिता तिच्या मनाचं धैर्य वाढवत होती.
शशी म्हणाली, `आजच नोकरीचा राजीनामा देते. दोन महिन्यांची नोटीस देणं आवश्यक आहे ना!’
दोघी उठल्या. हिनं आणखी थोडा विचार करून राजीनामा द्यावा, असा विचार करत विनिता तिच्याबरोबर चालू लागली.
अलीकडे शशीनं शाळेला येणं सोडून दिलं होतं. त्यामुळे विनितेला एकटेपणाची भावना जाणवत होती. `शशी सुखी आहे ना, मग झालं तर!’ अशी ती स्वत:ची समजूत काढत होती. आपल्या प्रिय मैत्रिणीच्या लग्नाला काय भेट द्यावी याचा ती विचार करत असतानाच एक दिवस ती बातमी आली.
`विनिता, तुला समजलं? शशीचं लग्न मोडलं!’ शाळेतल्या ज्येष्ठ शिक्षिका सुशीला मॅडमनी तिला विचारलं.
`नाही! मला ठाऊक नाही!’ विनिता बसलेल्या धक्क्यातून स्वत:ला सावरत म्हणाली.
`तुम्ही दोघी एवढ्या मैत्रिणी असूनही काही बोलली नाही ती? फार त्रास झालाय तिला!’
पुढचं बोलणं विनिताच्या कानात शिरलंच नाही. काय झालं असेल? शंकरला अपघात झाला असेल काय? त्याचं वेगळ्या एखाद्या मुलीशी प्रेमप्रकरण असेल काय? पण शशीशी त्याचा अनेक वर्षांचा परिचय होता आणि त्याच्या मर्जीनंच हे लग्न ठरलं होतं. मग का मोडलं असेल लग्न? विनिताच्या जिवाची तडफड झाली.
शाळा सुटल्यावर विनितेनं सरळ शशीच्या घराची वाट पकडली.
दारात विनितेला पाहताच शशीच्या मनावरचा ताबा सुटला. ती हुंदके देऊन रडू लागली.
विनितेनं घरावरून नजर फिरवली. घरभर पदोपदी लग्नाची तयारी दिसत होती. घराची रंग-रंगोटी झाली होती. एका कोपऱ्यात तांदळाची पोती रचलेली दिसत होती.
विनितेला पाहताच शशीची आई म्हणाली, `विनिता, तूच हिची समजूत काढ बाई! शशी थोडं अतीच करतेय. ह्या सगळ्या ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात. आपलं नशीब तेवढं बलवत्तर हवं. नशिबात नसेल तर काय करायचं? गेले दोन दिवस हिनं अन्नाला स्पर्श केलेला नाही!’
एवढी मोठी घटना घडलेली असताना शाब्दिक वेदांताला काही अर्थ नाही हे विनितेला समजत होतं.
शशीच तिला `इथं नको, चल-’ म्हणत माडीवर घेऊन गेली. माडीवरच्या गच्चीत मंद वारं वाहत होतं. समोर पसरलेल्या अथांग बेंगळूरचे दिवे दिसत होते.
तिथल्या चटईवर बसत विनितेनं विचारलं, `शशी, शंकरची प्रकृती बरी आहे ना?’
शशीच्या डोळ्यांमधले अश्रू अदृश्य होऊन त्यांची जागा संतापानं घेतली.
`त्याला कसली धाड भरलेय? चांगला टोणग्यासारखा माजलाय! त्याच्यामुळे आमचा अपमान झालाय. मला तर जीवनाचाच कंटाळा आला आहे. विश्वासघातकी नराधम मेला!’
`अशी कोड्यात बोलू नकोस बाई! काय झालं ते नीटपणे सांग ना! का मोडलं लग्न?’
भावनावेगानं शशीला बोलणं सुचत नव्हतं.
`सांग ना!’
विनितेनं पुन्हा-पुन्हा म्हटलं तेव्हा ती उद्गारली, `त्यानं स्वत:ला विकलंय!’
`म्हणजे? मला नाही समजलं.’
`आमच्या समाजापैकी बरेच अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यापैकी एकजण आपल्या वीस वर्षांच्या मुलीला घेऊन इथं आले होते. त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली- आमच्या मुलीशी जो लग्न करेल, त्याला अमेरिकेला घेऊन जाऊ, म्हणून!’
`शंकर गेला?’
`फक्त शंकरच नव्हेत, कितीतरी सुशिक्षित तरुणांनी ती जाहिरात वाचून अर्ज टाकले होते म्हणे! डॉक्टर, सी. ए., इंजिनिअर कितीतरी उच्चशिक्षित तरुण! शंकरनंही गमतीनं त्यासाठी अर्ज टाकला होता म्हणे. पण त्या मुलीला नेमका हाच आवडला!’
`हे काय गं? एखाद्या नोकरीचा इंटरव्ह्यू झाला हा! मग पुढं काय झालं?’
`मग काय! हाही तयार झाला. त्याला वाटलं, आपल्याला संपूर्ण आयुष्यात पुन्हा कितीही धडपड केली तरी अशी संधी मिळणार नाही. कशाला संधी सोडायची? मला त्यानं क्षमा कर म्हणून पत्र लिहिलं आहे.’
`तू त्याचं नरडं धरायचंस! गप्प का बसलीस?’
`खरं सांगू? ते त्याचं पत्र वाचून मला त्याची किळस आली. एवढ्या वर्षांची ओळख, नातं, भावना-सरळ पायदळी तुडवून डॉलर आणि ग्रीनकार्डसाठी त्या मुलीचे पाय चाटणारा शंकर! छी!’
`त्याचे आई-वडील काय म्हणतात?’
`माझे आई-वडील त्यांना जाऊन भेटले. हा कुठल्या गावाचा विपरीत न्याय? म्हणून विचारलं तर म्हणताहेत- अहो, आमच्या मुलाचं तिकडं उज्ज्वल भविष्य आहे! आम्ही का त्याचं नुकसान करू? तो इथं राहिला तर आमच्यासारखाच दरिद्री राहील. सारं जीवन सरलं तरी एक घर बांधायला जमणार नाही, आमच्या मुलींच्या लग्नाचं कर्जही फेडता येणार नाही. म्हणून आम्हीच त्याला हे लग्न करायला सांगितलंय!
`तूही नोकरी सोडलीस ना!’
`होय. त्यावरही शंकरनं उपाय सुचवलाय. त्यानं सांगितलंय- शशीच्या लग्नाला येईल तेवढा खर्च मी अमेरिकेला गेल्यावर डॉलरच्या रूपात पाठवून देईन म्हणून!’
`म्हणजे काय! डॉलरच देव होऊन बसलाय म्हणायचा!’
`देव की भूत कोण जाणे! पण डॉलरचं मोहिनीरूप असं आहे खरं! माझ्या जीवनाचा मात्र तमाशा होऊन गेला बघ! लग्न मोडलं म्हटल्यावर लोक मुलीतच काहीतरी दोष असेल असं म्हणतात ना! आता मी काय करु?’
विनिताला काय बोलावं ते सुचलं नाही. शशीच पुढं म्हणाली, `हेही जाऊ दे. पण इतकी वर्षं मनात शंकरलाच नवरा मानून मी राहिले. एका दिवसात ती भावना कशी उपटून-निपटून काढून टाकता येईल? अमेरिकेचा मोह आणि डॉलरची आशा यासाठी शंकरनं माझा हकनाक बळी दिला.’
शशीच्या दु:खाला हुंदक्याच्या रूपानं वाट फुटली होती. तिचं सारं शरीर हुंदक्यांनी हिंदकळत होतं.
विनिता असहाय्यपणे तिचा आक्रोश पाहत राहिली.
त्या दिवशी चंद्रू अत्यंत आनंदात होता. त्याला प्रमोशन मिळालं होतं.
अमेरिकेला `लँड ऑफ ऑपॉरच्युनेटीज’ म्हणतात ते खोटं नाही. तुम्ही कुणीही असलात तरी चालेल. बढतीच्या पायऱ्या भराभर चढू शकता. फक्त तेवढी तुमची कुवत हवी. बढतीच्या मार्गत भारताप्रमाणे जाती, कुळ, सिनिऑरिटी, भाषा, राजकारण- यांपैकी कशाचाच अडसर येत नाही. उत्तम काम केलं की, लगोलग बढती मिळते. तसंच, कामाची फळं योग्य प्रकारे देऊ शकलं नाही, तर एका पत्राद्वारे त्याला घरीही पाठवलं जातं!
चंद्रूच्या आनंदाला आणखीही एक कारण होतं. आजच त्याचं ग्रीनकार्ड आलं होतं! संपूर्ण जीवन सार्थकी लागल्याची भावना त्याच्या मनात भरून राहिली होती. आयुष्यात कधीही लक्ष्मी प्रसन्न न झालेल्या शिक्षकाचा तो मुलगा. सारं आयुष्य पैशाच्या चणचणीत गेलेलं. आता तोच चंद्रू अमेरिकेचा अधिकृत नागरिक झाला होता! त्याच्या आजवरच्या साधनेचं हे एक फलित!
आता तो राजरोसपणे भारतात जाऊ शकत होता. तो आता आपल्या माणसांना भेटू शकत होता. हेही त्याच्या आनंदाचं एक कारण होतं.
तो घरी परतला तेव्हा एक जाड पाकीट त्याची वाट पाहत होतं. म्हणजे त्यात बरीच पत्रं असतील. म्हणजे भरपूर बातम्या! कदाचित सुरभीच्या मागण्यांची यादीही असेल.
त्यानं कॉफी-मशीनमधून मनासारखी कॉफी करून घेतली आणि कॉफीचा मग समोर ठेवून सावकाश पाकीट फोडलं.
पाकिटात गिरीशचं पत्र आणि त्यात गुंडाळलेले काही फोटो होते.
`प्रिय चंद्रू,
तू आमच्या लग्नाला हजर राहिला असतास तर फार बरं झालं असतं. लग्न साधेपणानं झालं. आम्हा दोघांनाही भपकेबाज लग्न करायचं नव्हतं.
सोबत आमच्या लग्नातले काही फोटो पाठवत आहे. विनितेची तुझ्याशी ओळख आहे असं ती सांगत होती. तिनं तुला नमस्कार सांगितला आहे.
गिरीश.’
चंद्रूनं फोटो पाहिले आणि तो निश्चल झाला. त्याच्या मनाला भावलेली विनिता, सतत चैतन्यपूर्ण राहणारी विनिता त्याच्या भावाची पत्नी झाली होती. लग्नपत्रिकेत त्यानं विनिता नाव वाचलं होतं, पण असेल कुणीतरी असा विचार करून त्यानं तिकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं.
आता जे घडलं होतं, त्याची त्यानं कल्पनाही केली नव्हती. संपूर्ण धारवाडची वसंतलक्ष्मी विनिता हीच जयनगरमधल्या शाळेत शिकवणारी शिक्षिका निघाली होती! कुठून कुठं जोडला गेला हा संबंध?’
चंद्रूला धक्का बसला होता. त्याचं विनितेवरचं प्रेम एकांगी होतं. शिवाय अव्यक्त प्रेम होतं ते!
आता त्याच विनितेचं लग्न झालं आहे, तेही आणखी कुणाशी नव्हे, आपल्याच भावाशी, आपल्याच घरची ती सून होऊन आली आहे.
चंद्रू उभ्या उभ्या कोसळला. सकाळपासून उल्हास-उत्साहानं नाचणारं त्याचं मन कोलमडून गेलं होतं.
क्षणभरच त्याच्या मनात येऊन गेलं- या ग्रीनकार्डचा मोह नसता तर याआधीच भारतात जाऊन विनितेशी विवाहबद्ध होता आलं असतं.
त्यानं फोटो पाहिले.
विनिता वधूच्या वेषात साधी आणि सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील मंद हास्य हजार हिऱ्यांच्या तेजापेक्षा अधिक तेजानं झळकत होतं. तिच्या चेहऱ्यावरची तृप्त भावना फोटोतही लपत नव्हती.
केवळ रुपाच्याच बाबतीत नव्हे; तिचा स्वभाव, सुमधुर कंठ, तिचं मृदु अंत:करण- कुठल्याही दृष्टीनं पाहिलं तरी ती कुणाही पुरुषाचं मन वेधून घेणारी होती.
प्रत्येक सासूनं अपेक्षा करावी अशी सून होती ती! चंद्रूनं तिचा सालस आणि लाघवी स्वभाव जवळून पाहिला होता. कितीही कजाग सासू असली तरी तिचं मन जिंकून घेण्याचा नम्रपणा आणि प्रेमळपणा विनितेच्या स्वभावात होता.
तसा स्वभाव नसता तर सावत्र आईच्या कजागपणाचा बाऊ न करता, मनातलं दु:ख, चार-दोन अश्रूंबरोबर बाहेर टाकून पुन्हा `चिक्कव्वा’- धाकटी आई म्हणत ती सांगेल ती कामं करायला पदर खोचून तयार झाली नसती. स्वत: चंद्रूनंच तिथल्या वास्तव्यात असले अनेक प्रसंग पाहिले होते. त्याला तिच्या त्या गुणांचंच आकर्षण वाटलं होतं.
असो! यानंतर आई-वडिलांची चिंता करायचं कारण नाही असं चंद्रूला तीव्रपणे जाणवलं. पोटच्या मुलीपेक्षा अधिक विश्वासानं विनिता घराकडे बघेल यात शंका नाही.
या विचारानं काही क्षण बरं वाटलं तरी, चंद्रूला गिरीशविषयी असूया वाटली. गिरीश आपल्याइतका देखणा नाही, आपल्याइतका त्याला पगार नाही, रसिकतेच्या बाबतीतही तो आपल्यापेक्षा डावा आहे. त्याला गप्पांचं तंत्रही फारसं साधत नाही. तरीही रत्नासारखी बायको त्याला मिळाली ना! सख्खा भाऊ कितीही लाडका असला तरी अशा संदर्भात तो एक वेगळा पुरुषच ना!
मत्सर हा तर माणसाचा मूलभूत स्वभावच असतो ना? त्यामुळे चंद्रूच्या मस्तकात शेकडो विचार भावनांचा गोंधळ उठला त्यात काय नवल? त्याच्या मनात आजवर अनोळखी असलेल्या भाव-भावनांचं मिश्रण झालं होतं.
चंद्रूला पूर्वीच्या मन:स्थितीत स्वत:ला आणायला दोन दिवस लागले.
लग्न ठरल्यावर गिरीशचा थोरला भाऊ अमेरिकेत असल्याचं विनिताला समजलं असलं तरी, तो चंद्रू असेल अशी तिला कल्पना नव्हती.
लग्नानंतर सासरी आल्यावर तिनं थोरल्या दिराचा फोटो पाहिला तेव्हा तिला आश्चर्य वाटलं.
धारवाडला त्यांच्या घरी भाड्यानं राहणारा चंद्रू सभ्य तरुण होता. तिचं गाणं आवडल्याचं स्पष्टपणे सांगायचा- संकोच वाटत असला तरी, त्याच्या दृष्टीतून ते तिच्या लक्षात येत होतं. आपलं गाणं तोही ऐकत आहे, हे तिलाही तेव्हा ठाऊक असायचं. आता तोच तरुण आपला थोरला दीर आहे.
बस्स! तिला चंद्रूविषयी एवढीच भावना होती.
चंद्रूला मनोमन वाटलं- आपण तिला लिहिलेलं पत्र तिच्या किंवा आणखी कुणाच्याही हातात न पडता पुन्हा आपल्याच हातात आलं, हे फार चांगलं झालं. लग्न ठरल्यानंतर किंवा झाल्यानंतर ते तिच्या हातात पडलं असतं तर किती अनर्थ झाला असता! मूर्ख रखवालदारानं म्हाताऱ्या पोस्टमनला पत्ता दिला नाही ते बरंच झालं! नाहीतर बिचाऱ्या विनितेच्या संसारात सुरुवातीपासूनच वादळांना सुरुवात झाली असती!
आज चंद्रू मातृभूमीला परतणार होता. साडेतीन वर्षांनंतर! घरात एखाद्या उत्सवाचं वातावरण भरून राहिलं होतं.
गौरम्मा आणि सुरभी चंद्रूच्या स्वागतासाठी एअरपोर्टला जायला तयार झाल्या होत्या. शामण्णा मात्र म्हणाले, `गावात आलाय तो घरी येणार नाही काय? मी येणार नाही.’
सासूबार्इंचा उत्साह पाहून विनिता म्हणाली, `तुम्ही सगळेजण जाऊन या. भावजींना काय आवडतं ते सांगून जा. मी सगळा स्वयंपाक तयार करून ठेवेन.’
`टोमॅटोचं सार कर, आंबोड्या, रायतं आणि कायरस कर. चंद्रूला फार आवडतं.’
गौरम्मा आणि सुरभीनं नीट केस विंचरले आणि ठेवणीतल्या साड्या नेसून दोघी तयार झाल्या. विनिताची कामाची निष्ठा आणि कामं करण्याची पद्धत त्या दोघींना मनापासून आवडली होती. गौरम्मांच्याही मनात आलं, `चंद्रूलाही एक अशीच बायको मिळाली तर कसलीही काळजी राहणार नाही!’