सोमवारी शाळेत आली नेहमीप्रमाणे पहिले ४ तास झाले. तीने तिच्या मैत्रिणीसोबत डबा खाल्ला. पाणी पिऊन ती वऱ्हांड्यात गप्पा मारत होती. तेवढ्यात तिथे प्रथमेश आला. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रपण होता. प्रथमेशने केस वैगरे विंचरून कपडे निटनिटके करून तिथे एंट्री मारली होती. नीलिमा स्वरालीकडे पाहून हसली. स्वरालीने डोळ्यांनीच "काय ग?" असा प्रश्न केला.
ती फक्त स्वरालीच्या कानात जाऊन पुटपुटली,"उत्तर द्यायला तयार राहा."
स्वरालीला काहीच न कळून तिने कपाळावर आठी पाडली. "काय म्हणालीस?" असे विचारेपर्यंत नीलिमा आणि बाकीच्या मुली तिथून निघाल्या.
"स्वराली." मागून आवाज आला.
ती दचकली. पोटात फुलपाखरे उडू लागली. तिने हलकेच वळून मागे पहिले तर. प्रथमेश उभा होता. स्वरालीचे हात पाय थरथरत होते. कारण ती कितीही बिनधास्त असली तरी असा प्रसंग तिला पहिलाच होता. त्यातून तिला ह्या मुलाबद्दल थोडे कन्फयुजन होते. ती अचानक कशी काय सामना करणार होती? त्याने फारच कमजोर क्षणी तिला पकडले असे तिला वाटले.
ती काहीच बोलत नाहीये असे पाहून त्याने त्याच्या मित्राकडे नजर फिरवली. तो मागे सरला आणि लांब जाऊन उभा राहिला.
"स्वराली मला तू आवडतेस. मला कळले आहे कि हे तुला पण माहिते. तू मला ओळखतेस कि ग. माझी गर्लफ्रेंड बनशील?" प्रथमेश एका दमात म्हणाला.
शांतता. स्वरालीच्या मनात पूर्ण शांतता पसरली. अशी अवस्था तर तिची कधी तोंडी परीक्षेच्या वेळी सुद्धा नाही झाली. तिला प्रयत्न करून सुद्धा नकारात्मक असे काहीच बोलता येत नव्हते. तिचा संभ्रम खूपच वाढला होता. तिचे ओठ थरथरत होते. तीने काहीतरी बोलण्यासाठी ओठांची हालचाल केली.
"आत्ता काही बोलू शकत नसशील तर शाळा सुटल्यावर प्लिज सायकल स्टॅन्डजवळच थांब ना. फक्त पाच मिनिट.ठीके?
स्वराली थांबशील ना?" तो म्हणाला.
"ठीके." एवढेच काय ते तिच्या ओठातून सुटले.
तो मागे वळून निघाला. जाताना त्याचा मित्र त्याच्या जवळ आला. दोघेजण हसत हसत पुढे गेले. स्वराली बावचळल्यासारखी तिथेच उभी होती. थोड्यावेळाने वर्गात गेली. पुढचे वर्गातले चारही तास कसे झाले तिला काहीच कळले नाही. तिचे लक्षच नव्हते. मनात विचारांनी गर्दी केली होती. २-३ वेळा तिने ओरडा पण खाल्ला. तिच्या मनाची अवस्था सध्या निलीमाला काही अंशी माहित होती.
"मूर्ख आहे मी. सरळ सरळ नाही म्हणायचे तर, ठीके काय म्हणाले. आता भेटून काय करायचे? तो जे म्हणेल ते ऐकायचे? कसं करू यार." स्वराली खूप गोंधळली होती.
तिने एक कागद फाडला त्यावर लिहिले आणि तो नीलिमा कडे दिला.
"निले. तो सायकलस्टँडजवळ शाळा सुटल्यावर भेट म्हणाला."
नीलिमाने उत्तर लिहिले. "भेट ना मग."
"मला नाही भेटायचं." तिने लिहिले.
"मग ठीके का म्हणालीस?" नीलिमाने लिहिले.
स्वरालीने अचानक नीलिमाकडे पहिले. ती हसत होती. स्वरालीला कळले कि हि सुद्धा त्याला सामील आहे कारण ती ठीके म्हणालेली निलीमाला कसे ठाऊक. तिने बेंचच्या खालून नीलिमाच्या मांडीला जोरात चिमटा काढला. नीलिमा ओरडली.
दोघींना २-२ छड्या प्रसादात मिळाल्या. स्वराली ने तो कागद बोळा करून दप्तरात टाकला होता म्हणून नशीब.
शाळा सुटली. सगळे निघाले. स्वराली बेंचवर बसून होती. तिने निलीमाला सोबत चल म्हणून बजावले होते. दोघी निघाल्या. सायकल स्टॅन्ड जवळ आता तुरळक गर्दी होती. सगळी सायकलवाली मुले निघून गेली होती. तिने पहिले तर प्रथमेश त्याच्या मित्रासोबत उभा होता. ती आणि नीलिमा आपल्या आपल्या सायकली घेण्यासाठी जिथे गेल्या. तिथे ते दोघे पोहोचले. नीलिमा आणि प्रथमेशचा मित्र प्रसंगाची मागणी समजून लांब गेले.
"स्वराली. दुपारी मी तुला जे काही विचारले. त्याचा विचार केला का तू?" प्रथमेशने विचारले.
स्वरालीचा सगळा वेळ भेटायचे कि नाही ह्याचा विचार करण्यात गेला होता. हा तर फार पुढचे विचारत होता. आली का पंचाईत? आता काय करावं? तिला प्रश्न पडला.
कसे बसे अवसान गोळा करत ती म्हणाली.
"बाबांना आवडणार नाही मी असे काही केलेले. त्यांना कळले तर मला खूप त्रास होईल."
"अच्छा म्हणजे बाबाना आवडणार नाही म्हणून तुला अडचण आहे. बाकी तुला माझी गर्लफ्रेंड बनण्यात काहीच अडचण दिसत नाहीये." तो म्हणाला.
"मूर्ख. बावळट. अगं विचार करून बोल ना नीट." स्वतःशीच स्वराली म्हणाली.
"नाही म्हणजे. तसे नाही. पण शाळेत असे काही नको करायला."
"ठीके मग मी तू माझी गर्लफ्रेंड आहेस हे शाळेत पण कोणाला कळणार नाही. एकदम सिक्रेट राहील सगळे. प्रॉमिस." तो गळा चिमटीत पकडत म्हणाला.
"हा तर सगळीच तयारी करून आला आहे. मला स्पष्ट नकार द्यायला हवा. कारण का देऊ मी? हा कोण लागून गेला? सरळ नाहीच म्हणते." स्वराली मनात म्हणाली.