"तुम्ही असे म्हटले तर बोलणेच खुंटले...," मी उदास होत म्हटले, "पण तुम्ही का आम्हाला एकमेकांपासून दूर व्हायला सांगत आहात? त्याच्या मागचे कारण कळले तर आम्ही नक्कीच त्यावर विचार करू..."
"मी म्हटले ना... तुम्ही विचारू नका... आणि मी सांगत नाही... तुम्ही फक्त इतकेच लक्षात घ्या... तुमच्या दोघांचे लग्न होणे शक्य नाही!... तेव्हा तुम्ही एकमेकांना विसरून जा आणि आपापले मार्ग वेगळे करा..." दिपालीच्या मम्मीने ओघळत्या डोळ्यांनी म्हटले.
"अहो पण..." मी पुढे काही बोलायला गेलो तर त्यांनी मला मध्येच थांबवत म्हटले,
"प्लिज बेटा!... माझे जरा ऐक... मी जेव्हा तुम्हाला असे सांगतेय... तर त्याला खरोखरच तसे कारण आहे... फक्त ते कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही... तेव्हा माझे ऐका आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या..."
"नाही मम्मी... तुला आम्हाला सांगायलाच पाहिजे...," अचानक दिपाली मध्ये बोलत म्हणाली, "काहीही कारण असेल... आम्ही ऐकायला तयार आहोत... असे काय कारण आहे जे तू आम्हाला सांगू शकत नाही??"
"दिपाली बाळा... उगाच हटट करू नकोस!... माझे ऐक जरा..." दिपालीची मम्मी तिला समजावत म्हणाली.
"नाही, मम्मी... तुझे मी नेहमीच ऐकत आले आहे... पण ह्या बाबतीत मी ऐकणार नाही... हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे... तुला कारण सांगितलेच पाहिजे... मग ते काहीही असेल..." दिपाली पुन्हा निक्षून म्हणाली आणि तिने माझ्याकडे पाहिले. मी नजरेनेच तिला अनुमोदन दिले.
"बाळांनो... तुम्ही का माझे ऐकत नाही आहात?... मी सांगतेय ना तुम्हाला... असे काही कारण आहे की तुम्हाला सांगता नाही येणार... फक्त एवढेच लक्षात ठेवा... तुमचे लग्न होणे कदापी शक्य नाही..."
"मग ठिक आहे, मम्मी!... तुला जर सांगायचे नसेल तर मग आम्हीही तुझे ऐकणार नाही... जोपर्यंत तू आम्हाला त्या मागचे कारण सांगत नाहीस तोपर्यंत आम्ही एकमेकांशी संबंध तोडणार नाही... असे बोलून दिपालीने माझ्याकडे निग्रहाने पाहिले.
"हो, मम्मी... मीही दिपालीशी सहमत आहे... माझे पण हेच उत्तर आहे... एकतर तुम्ही आम्हाला खरे काय ते कारण सांगा नाहीतर आम्ही तुमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू..." मी दिपालीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हटले.
मग पुढे काही क्षण दिपालीची मम्मी आम्हाला समजावून सांगू लागली की कारण माहिती करून घ्यायच्या भानगडीत पडू नका आणि आम्ही तिचे न ऐकता तिला कारण सांगच म्हणून प्रेशर करत होतो... शेवटी मी किंचीत वैतागत उठलो आणि त्यांना निर्वाणीचे सांगितले,
"हे बघा, मम्मी... तुम्हाला कारण सांगायचे नाही तर सांगू नका... पण मग तुमचे म्हणणे ऐकायची सक्ती आमच्यावर करू नका... आम्ही एकमेकांशी संबंध ठेवणार म्हणजे ठेवणार... हा आमचा फायनल निर्णय आहे आणि आम्ही तो बदलणार नाही... मी येतो आता... नमस्कार!..." असे बोलून मी त्यांच्याकडे पाठ फिरवून चालायला लागलो...
"हो, मम्मी... माझा पण हाच फायनल निर्णय आहे... मी दिनेशला बाहेर सोडून येते..." असे बोलून दिपालीही माझ्या मागे निघाली...
आम्ही दोघेही तिच्या बेडरूमच्या दरवाजा जवळ पोहचलो आणि आम्हाला तिच्या मम्मीची हाक ऐकू आली...
"थांबा! जावू नका!"
आम्ही जागच्या जागी थबकलो आणि वळून त्यांच्याकडे पहायला लागलो... त्यांच्या डोळ्यातून अजुनही अश्रूं वहात होते... त्यांनी नुसती मान हलवून आम्हाला जवळ यायचा इशारा केला... आम्ही परत फिरलो आणि त्यांच्या जवळ गेलो... दिपाली परत पहिल्यासारखी तिच्या मम्मीजवळ बसली आणि मी त्यांच्या समोरील चेअरवर पहिल्यासारखा बसलो... काही क्षण त्या खाली मान घालून रडत राहिल्या आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब केले नाही... नंतर मग त्यांनीच स्वत:ला सावरले आणि आपले डोळे पुसत त्यांनी वर पाहिले... माझ्याकडे पाहून त्या अगतीकपणे म्हणाल्या,
"तुम्ही जर मला कारण सांगायला असे फोर्स करत आहात तर मी तुम्हाला ते सांगते... पण तुम्ही मला वचन द्या की कारण कळल्यानंतर तुम्ही मी सांगेन ते ऐकाल... "
"ते कारण काय आहे त्यावर डिपेन्ड असेल... तुम्ही आधी कारण सांगा तर खर..." मी ठामपणे म्हणालो.
"नाही!.. आधी मला वचन द्या... तरच मी सांगेन..." दिपालीची मम्मीही हटट करू लागली.
"नाही!... जोपर्यंत कारण कळत नाही तोपर्यंत आम्ही वचन देणार नाही... कारण तसेच योग्य असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला वचन देवू... मी आधी वचन देत नाही पण शब्द देतो... मी माझा शब्द फिरवणार नाही..." मी निश्चयाने म्हणालो.
त्यावर दिपालीची मम्मी थोडी विचारात पडली... वचन न घेता ह्यांना सांगावे की नाही ह्याचा बहुतेक ती विचार करत होती... शेवटी तिने मनाचा हिय्या केला आणि ती म्हणाली,
"ठिक आहे!... मग सांगते मी कारण... पण तुम्ही आपला शब्द नाही फिरवायचा..."
"हो!... मी शब्द देतो..." मी म्हणालो.
त्यानंतर परत दिपालीची मम्मी दोन मिनीटे गप्प बसून राहिली... ती काही बोलत नव्हती आणि आम्ही काही विचारत नव्हतो... ती बहुतेक काय आणि कसे सांगावे ह्या विवंचनेत होती... पण शेवटी ती बोललीच,
"मी कारण सांगितल्यानंतर तुमच्यावर 'बॉम्ब' पडणार आहे!... धरणीकंप झाल्यासारखे तुम्हाला वाटेल... मी तुम्हाला हे सांगितले नसते तर बरे झाले असते असे तुम्हाला वाटेल... आपण उगाच कारण जाणून घ्यायची जिद्द केली असे तुम्हाला वाटेल... तेव्हा अजून एकदा शेवटचा विचार करा..." ती आम्हा दोघांकडे बघून म्हणाली.
"मम्मी... तुम्ही बिनधास्त सांगा... आमची काहीही ऐकायची तयारी आहे..." असे मी ठामपणे बोलून दिपालीकडे पाहिले आणि तिनेही होकारार्थी मान हलवली. खरे तर ती मनातून हादरलेली वाटत होती...
"ठिक आहे... मग लक्ष देवून ऐका... तुमच्या दोघांचे लग्न होवू शकत नाही... कारण... कारण..." पण पुढे सांगायची त्यांची डेअरींग झाली नाही...
"कारण काय, मम्मी??... सांगा एकदाचे..." मी शेवटी किंचीत वैतागत म्हटले.
"कारण तुम्ही दोघे 'भाऊ-बहिण' आहात!!..."