नियतीचा खेळ
*******
वाचकहों,
काही दिवसांपुर्वी माझ्या एका मित्राने मला एक सत्य-घटना सांगितली होती... ती घटना ऐकल्यापासून माझ्या डोक्यात विचारचक्र चालू झाले होते... काय आणि कसे घडले असेल ह्याचा मी माझ्या बुद्धीने विचार करू लागलो आणि एक कथा आकार घेवू लागली... त्याने सांगितलेली घटना एका पानाची होती, ज्याचा हा कल्पना-विस्तार कथे रुपाने सादर करत आहे... घटना जरी सत्य असली तरी कथा पुर्णपणे काल्पनिक आहे!
*******
"दिपाली... आपले हे असे किती दिवस चालत रहाणार? आपल्या ह्या मैत्रीला काय म्हणायचे? ही केवळ मैत्री आहे की अजून काही?" मी दिपालीच्या कानात हळुच म्हणालो. आम्ही चर्नीरोडजवळील सी-फेसच्या कटट्यावर बसलो होतो...
"ओऽऽहोऽऽहोहोहोऽऽऽ... असे विचारतोय जसे काही तुला माहीतच नाही... तुला पण माहीत आहे आणि मला पण माहीत आहे..." दिपाली हसून म्हणाली.
"माहीत आहे तर मग आपण ते स्पष्ट कबूल का करत नाही?? असे किती दिवस नाकबूल करत रहायचे?" मी मिश्किलपणे हसत म्हटले.
"दिनेश... तू असा कसा रे बुद्धू... मी कसे काय माझ्या तोंडाने म्हणणार?... मी मुलगी आहे ना... कबुली मुलाने पहिली द्यायची..." दिपाली हसू दाबत, किंचीत लाजत म्हणाली. मावळतीच्या सुर्याची सोनेरी किरणे तिचा चेहरा उजळवत होती आणि ती खूपच मोहक दिसत होती!
"हंम्म्म्मऽऽऽ... जर असे असेल तर देतो मी कबुली..." असे बोलून मी तिचा हात हळुच हातात घेतला आणि प्रेमाने दाबला. आणि मग तिच्या डोळ्यात रोखून पहात मी तिला म्हणालो, "दिपाली... तुझ्याशिवाय माझे कशातही मन लागत नाही... सतत तुझा सहवास असावा असे मला वाटत असते... मी तुझ्या प्रेमात पडलो आहे!... आय लव यु, दिपाली!"
असे बोलून मी पुढे झुकलो आणि पटकन तिच्या ओठांवर ओठ ठेवले! दिपाली शॉक झाली! पटकन ती मागे झाली आणि ओशाळत आजुबाजुला बघत लाजत म्हणाली,
"अरे... डायरेक्ट किस काय करतोस??... मला विचार तरी आधी... मला तुझे प्रेम मंजूर आहे का ते... माझे तुझ्यावर प्रेम आहे का नाही ते..."
"त्यात काय विचारायचे??... विचारायची गरज आहे का?..." मी हसून म्हटले.
"गरज आहे...," दिपालीने गंभीर चेहरा करत म्हटले, "तुला असे वाटतेय का... की मला तुझे प्रेम मंजूर आहे?... तुझा असा समज आहे का... की माझे तुझ्यावर प्रेम आहे??..."
"हो!... ऑफकोर्स!..." मी ठामपणे म्हणालो.
"नो!... देन यु आर रॉंग!..." दिपाली पटकन म्हणाली...
"काय??... काय म्हणालीस??... से अगेन..." मी चक्रावून तिला विचारले. मला धक्काच बसला!
"तू बरोबर ऐकलेस... मी म्हटले 'यु आर रॉंग!'..." दिपाली शांतपणे मला म्हणाली.
"रॉंग... म्हणजे??... म्हणजे काय?... काय म्हणायचेय तुला??..." मी गोंधळून तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
"मला असे म्हणायचेय...," दिपाली पुन्हा शांतपणे म्हणाली आणि माझ्या डोळ्यात रोखून पहात पुढे बोलली, "की तुला जर असे वाटत असेल... की मला तुझे प्रेम मंजूर आहे... किंवा मी पण तुझ्या प्रेमात पडले आहे... तर..."
"तर काय?... मी अधीर होत अस्वस्थपणे विचारले.
"तर तुझे वाटणे अगदी बरोबर आहे!... मी पण तुझ्या प्रेमात पडले आहे... मला पण तुझे प्रेम मंजूर आहे..." दिपाली खुदकन हसत पटकन म्हणाली.