बाळ कुठून येतं?

User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: Mon Aug 17, 2015 11:20 am

बाळ कुठून येतं?

Post by rangila »

बाळ कुठून येतं?


बाळ कुठून येतं? हा मुलांचा प्रश्न बहुतांशी पालकांसाठी हादरविणारा असतो, कारण त्यामागे त्यांची पालकांची ठरावीक विचारसरणी असते. मात्र मूल जन्मणे ही नवरा-बायकोतील खासगी बाब न मानता आई-बाबा होण्याच्या अनुभवांवर भर दिला तर? मुलं तीन-चार वर्षांची झाली की, कधी तरी एक प्रश्न अचानक आपल्यासमोर थडकतो, ‘बाळ कुठून येतं?’ आई-बाबांसाठी हा जरा हादरवणारा प्रश्न असू शकतो. ‘‘बाप रे! काय विचारतो आहे हा/ ही आपल्याला आणि काय उत्तर देऊ आता याला/ हिला?’’ मुलांनी याआधीही आपल्याला अनेक प्रश्न विचारलेले असतात, ‘पाऊस कसा पडतो, देव कुठे राहतो? प्राणी बोलत का नाहीत?..’, असे अनेक. यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण मुलांशी नीट बोलून दिलेली असतात, पण बाळ होण्याशी संबंधित काहीही प्रश्न आला की, आईबाबांना एक क्षण धडधडतं. खरं तर बाकीच्या प्रश्नांसारखा हाही एक प्रश्न! पण त्याचं उत्तर लैंगिकतेशी थेट संबंधित. त्यामुळे आपणच गोंधळून जातो. मुलांना नेमकं काय सांगावं आणि किती सांगावं, असे असंख्य प्रश्न आपल्यालाच पडतात. अशा वेळी ती वेळ थकवून नेणं, ही आपली स्वाभाविक प्रतिक्रिया असू शकते. देव बाळ देतो किंवा आम्ही देवाला सांगितलं, मग त्याने तुला आमच्याकडे पाठवून दिलं, अशी उत्तरं मुलांना दिली जातात. इंग्लिशमधला ‘स्टॉर्क व्हिजिटेड द हाऊस’ हा वाक्प्रचारही याच पंथातला आहे. एवढय़ाने मुलाचं समाधान झालं नाही, त्याने आणखी आणखी प्रश्न विचारायला सुरुवात केली, की आई-बाबा ठेवणीतलं अस्त्र काढतात, ‘तू मोठा झाल्यावर सांगेन!’ बहुतेक मुलांना ही प्रतिक्रिया आवडत नाही. एरवी, ‘तू आता मोठा झाला आहेस, तुला आता स्वत:चं स्वत: जेवता आलं पाहिजे, युनिफॉर्मची बटणं लावायचा तू प्रयत्न केला पाहिजेस’, हे मुलं ऐकतच असतात, त्यामुळे काही बाबतीत मी मोठा झालो आहे आणि काही बाबतीत नाही, अशी आईबाबा सोयीस्करपणे पगडी फिरवत राहतात, असं मुलांना वाटू शकतं. हे जास्त वेळा झालं, तर काही ‘विशिष्ट प्रकारचे’ प्रश्न विचारले की उत्तरं मिळत नाहीत, हा निष्कर्षही मुलं काढू लागतात. यातून पुढचा संवाद क्षीण होऊ शकतो, अगदी कायमसाठी खुंटूही शकतो. लैंगिकतेच्या बाबतीत संवादाची दारं खुली असणं ही अगदी मूलभूत, आवश्यक बाब आहे. मुलांच्या प्रश्नांना आपण बगल देत नाही, हा संदेश मुलांपर्यंत जाणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. या वयाच्या मुलांना ‘हे सगळं माहिती असणं जरुरी आहे का’, असा प्रश्न अनेकजण विचारतात. या प्रश्नात ‘‘मुलांना ‘हे सगळं’ माहीत असायला हवं, असं आम्हाला अजिबात वाटत नाही,’’ असा एक अध्याहृत सूर असतो. यात गंमत अशी असते की, ‘हे सगळं’ म्हणजे थेट समागमाची क्रिया असं बऱ्याच वेळा आईबाबांच्या मनात असतं. अर्थातच, तीन आणि चार हे वय काही समागमाची क्रिया सांगण्याचं नाहीच, पण त्या वयाला समजेल, उमजेल, पचेल अशा स्वरूपात नेमकं कसं सांगता येईल? आईच्या शरीरात एक खास जागा (पिशवीसारखी) असते. बाळ तिथे तयार होतं. इथे पोटात बाळ तयार होतं, हे सांगणं टाळावं, कारण पोटात अन्न जातं, हे आपण आधीपासून मुलांना सांगत असतोच. मग हे अन्न आणि बाळ एकदमच पोटात कसं राहतं, असा प्रश्न काही मुलांना पडू शकतो. ‘‘मग ते बाहेर कसं येतं?’’ ‘‘वाढ पूर्ण झालेलं बाळ योनीमार्गातून (व्हजायनामधून) बाहेर येतं.’’ क्वचित मुलं असंही विचारतात, ‘‘आईच्याच शरीरात बाळ का बनतं, बाबांच्या का नाही?’’ अशा वेळी स्त्री आणि पुरुषाच्या शरीररचनेत मुळात फरक असतो, त्यानुसार बाळ वाढायला आवश्यक त्या गोष्टी आईच्या शरीरात असतात, हेही सांगता येतं. मुलांशी बोलताना अगदी लहानपणापासून योनी (व्हजायना) आणि शिश्न (पेनिस) हे शब्द आवश्यक तिथे वापरत राहिलं, तर अशा प्रश्नांची उत्तरं देणं अवघड नाही वाटत. मग ‘‘मुली बसून सू का करतात आणि मुलं उभे राहून का करतात’’, या प्रश्नाचं उत्तरही याच अनुषंगाने देता येतं. गंमत म्हणजे आपल्या आजूबाजूला नेहमी दिसणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला याबाबतीत सोपा मोकळा संवाद व्हायला मदत करू शकतात. आईबाबांच्या लग्नाचा फोटो अल्बम किंवा व्हिडीओ शूट पाहताना मुलं ‘‘अरे, यात मी कसा नाही?’’, असं बोलून जातात. अशा वेळी ‘लग्नानंतर आईबाबा बाळ कधी हवं हे ठरवतात आणि त्यानंतर बाळ होतं’, हे सांगायची ही चांगली संधी असते. बहुतेक वेळा चार-पाच वयापर्यंत एवढी उत्तरं पुरतात. त्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा मुलांना आणखी काही गोष्टी सांगता येतात. त्याबद्दल आपण पुढच्या काही लेखांमध्ये बोलणार आहोतच. मुलांचे हे प्रश्न लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून आलेले नसतात. इतर अनेक कुतूहलजनक गोष्टींसारखी ही एक गोष्ट. त्यामुळे आईबाबांची बॉडी लँग्वेज याबाबतीत मोठी भूमिका बजावत असते. आईबाबांनी फारसं गडबडून न जाता किंवा फार चिडचिड न करता शांतपणे उत्तरं दिली, तर या विषयावर बोलण्याचा सूरच बदलतो. काही वर्षांपूर्वी ‘थ्री इडियट्स’ सिनेमा आला आणि त्याला प्रचंड व्यावसायिक यश मिळालं. अनेकांना तो सिनेमा आवडला, पण त्यातल्या बाळाच्या जन्माचं दृश्य खटकलं. हे दृश्य सोडल्यास बाकी सिनेमा धमाल होता, असं आमच्या एका पालकांच्या कार्यशाळेत अनेक आईबाबा मंडळींनी सांगितलं. आईच्या प्रसूतिवेदना, रक्त लागलेलं बाळ हे सगळं दाखवायलाच हवं होतं का, त्यामुळे आमची मुलं नको नको ते प्रश्न विचारत राहतात, असा काहींचा सूर होता. तो प्रसंग असायला हवा होता की नाही, याची चर्चा न करता, आता तो मुलांनी पाहिला आहे, तेव्हा आपल्याला त्यांना काय सांगता येईल ते पाहूया का, असं मी म्हटलं. त्यासाठी मुलांनी काय प्रश्न विचारले, याची आपण आधी यादी करूया असं सुचवलं. यादी करायला सुरुवात झाली तेव्हा जेवढा गदारोळ उठला, त्यामानाने खूपच कमी प्रश्न समोर आले. मुळात मुलं काही तरी विचारू शकतील या कल्पनेनेच काहीजण अस्वस्थ झाले होते. त्यामुळे मुलांनी फारसं काही विचारलं नाही, तरी आईबाबांना मुलांबरोबर तो प्रसंग पाहणं खूप अवघड झालं होतं. आमच्या कार्यशाळेतही एकदम तणाव आल्यासारखं झालं. एका आईने मात्र वेगळा अनुभव सांगितला. तिला दोन मुलं होती. मोठा बारा वर्षांचा आणि छोटा सात वर्षांचा. छोटय़ाने तो प्रसंग पाहिल्यावर, ‘‘तुला पण असं सगळं झालं होतं का, तूही खूप दुखून ओरडत होतीस का,’’ असे प्रश्न विचारले. त्यावर तिने सांगितलं, ‘‘इतका त्रास नाही झाला, पण थोडा झाला. प्रत्येक आईला एवढा त्रास होतोच असं नाही.’’ आईचं आणि छोटय़ाचं बोलणं मोठा शांतपणे ऐकत होता. बराच काळ त्याने काहीच प्रतिक्रिया व्यक्त नाही केली. थोडय़ा वेळाने मग तो एकदम म्हणाला- ‘‘असा त्रास होतो तरी तू दुसरं मूल का होऊ दिलंस?’’ आई म्हणाली, मला एक क्षण धसकलंच, पण मग सांगितलं, ‘‘बाळाला दात येताना थोडा त्रास होतो, मूल चालायला लागतं तेव्हाही पडतं, धडपडतं, पण ते तेवढय़ापुरतं असतं. त्यातून आपल्याला काही नव्या गोष्टी जमायला लागतात, त्याचा आनंद जास्त मोठा असतो. तसंच बाळ होण्याचं आहे. बाकी तुम्हा दोघांबरोबर आम्हाला जी मजा येते, त्यापुढे त्या तेवढय़ापुरत्या त्रासाचं काही नाही वाटतं.’’ इतका वेळ ताणल्यासारखं झालेलं वातावरण हळूहळू निवळत होतं. एका आईला वाटलं, सिनेमातला तोच प्रसंग आता ‘बाळाचा जन्म’ या विषयावर बोलायला एक संधी म्हणून पाहता येईल. ‘प्राण्यांना पिल्लं होणं’, नवीन जीव जन्मतो म्हणून निसर्गात ती प्रजाती (स्पिशी) टिकून राहते.. अशा अनेक गोष्टी या अनुषंगानं मुलांशी बोलता येतील, असं मत एका बाबांनी व्यक्त केलं. आणखी एक आई म्हणाली, ‘‘आमच्या मुलांना शाळेत अन्नसाखळी (फूड चेन) शिकवली आहे. एखाद्या प्रजातीत जन्मापेक्षा मृत्यू जास्त झाले, तर निसर्गाचा समतोल बिघडतो, हे त्यांना माहीत आहे. त्याच्याशी मग नवीन जीव जन्मणं का आवश्यक आहे, हे छान जोडून घेता येईल.’’ सुरुवातीला अनेकांना मूल जन्मणे हा प्रसंग म्हणजे नवराबायकोमधली खासगी बाब बाहेर आल्यासारखं वाटत होतं. नंतर मात्र आपण आईबाबा होणं.. ते निसर्गातल्या साऱ्या प्राण्यांनी आईबाबा होणं, हा सगळा प्रवास छान उलगडत गेला. या सगळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि सगळ्यांनाच त्यानंतर खूप मोकळं वाटलं. संवादाची दारं आपोआपच उघडली गेली होती