किती वाट पाहू

adeswal
Pro Member
Posts: 3161
Joined: Sat Aug 18, 2018 4:09 pm

किती वाट पाहू

Post by adeswal »

किती वाट पाहू

येतानाच त्याने तिच्यासाठी तिला आवडणारी शिफॉनची, गुलाबी फुलं असणारी व्हाईट साडी आणली होती.

तो इकडे तिकडे बघत ‘कृष्णविलास’ हॉटेलच्या बाहेर उभा राहिला. बराच वेळ झाला. ती काही आली नाही. शेवटी नाईलाजाने तो आत गेला. काऊंटरवरचा मालक किंवा मॅनेजर त्याच्याकडे बघतच होता.

राजीव एका कोपऱ्यातल्या टेबलाशी जाऊन बसला. त्याची चूळबुळ, सारखं हॉटेलच्या एन्ट्रन्सकडे पाहणं यावरून तो कोणाची तरी वाट पाहतोय, हे तिथं हजर असणाऱ्या निम्म्याधिक लोकांच्या लक्षात आलं होतं. वेटरने पाणी ठेवून दिलं.

तो अडकलेल्या आवाजाने म्हणाला, “और एक ग्लास रखो। कोई आनेवाला है।”

वेटरने ते ऐकलं. तो नकोसं तोंड करून म्हणाला. “मेरा यही टेबल है। कोई आयेगा तो रखेगा ना।” आणि लगबगीने निघूनही गेला. राजीव सोडून सगळे बिझी होते. राजीवचा मिनिटकाटा, आणि तासकाटा जणू थांबलेलाच होता. त्याने पुन्हा एकदा आपल्या डाव्या हाताच्या बाजूला ठेवलेली प्लास्टिकची पिशवी चाचपडली, ज्यात ती साडी होती.

“क्या दे दूँ? साब, ऑर्डर?” मघासचा वेटर आला होता.

राजीव गोंधळला. ‘ती यायच्या आधीच कसं काही मागवायचं? वाट किती पाहू? वडा-सांबार खावा का? नको! पण मग ती आल्यावर तिच्याबरोबर खायला भूक राहणार नाही! नुसता चहाच घेऊन जाईल ती. दहा मिनिटांत! आली की काहीवेळ तिला बघू! तिच्याशी बोलू. कित्येक वर्षाचं बोलयचं राहीलं आहे!’ राजीवच्या मनात सगळे विचार चमकून गेले.

“बताता हुँ। एक दो मिनिट।” तो अजीजीने वेटरला म्हणाला.

बाजूच्या टेबलावर एक तरुण जोडी बसलेली होती. ती लाजत बोलत होती, पण टुकूटुकू डोळ्यांनी थेट पाहत होती त्याच्या डोळ्यांत! मधेच हसायची, मध्येच मुरका मारून लाजायची. कॉलेजच्या वयातलं प्रेम, ओढ, अशीच हसायची निलांबरी!

तिला अलगद पहिल्यांदा हात लावलेला एका हॉटेलमध्ये तर कसे मोठ्ठे डोळे करून पाहत होती. तिला म्हटलं की, नको तुला माझा टच. तर परत कर, माझा टच. त्यावर ती म्हणाली होती, “अरे त्यासाठी तुला पुन्हा टच करायला लागेल ना!” आणि मग हसली आणि म्हणाली होती, “तुला नुसतं बघतच राहावंसं वाटतं.” कसली मनाला टच करून गेली होती.

“साब ऑर्डर…” माघासचा वेटर पुन्हा आला होता.

“एक इडली चटणी लाव,” तो त्याच्याकडे बघून कसंबसं म्हणाला. ‘पचायला हलकी आणि पटकन खाऊन संपवायला हवी. निलू आली तर म्हणेल, हे काय जरा थांबायला नको तुला. मी यायच्या आधीच ऑर्डर दिलीस आणि खाऊनही टाकलेस. नाही! नाही! तिला हे कळायलाच नको!’ तो मान हलवत म्हणाला.

“सुनो.. बॉस जरा जल्दी लाना हं!” वेटरने ‘हा कोण बावळट आहे’ अशा अर्थाने त्याच्याकडे बघत मान हलवली.

आता कधी दिसत असेल निलांबरी? बारीकच असेल की जाड झाली असेल? केस तेवढेच असतील की विरळ झाले असतील? तिचा नवरा असेल? असेल काय? असेलच ना! आपण नाहीये? रोहिणीच्या जीवावर? शी: आता रोहिणीचा विषय कशाला आला? रोहिणीशी लग्न झाल्यापासून निलांबरी पुन्हा आयुष्यात येईल ही आशा हळूहळू मावळतच गेली.

मग उगाच वाटत राहायचं, ती कुठे साड्यांच्या दुकानात दिसेल. मुलांना दप्तरं, वह्या-पुस्तकं घेताना दिसेल. बसमध्ये दिसेल, प्लॅटफॉर्मवर दिसेल, कधी रस्त्यावर दिसेल, कुठल्यातरी हॉटेलमध्ये, कुठेतरी दिसलेच. कधीकधी तर त्याला ‘कभी-कभी’ सिनेमासारख वाटायचं की, तिच्या मुलीच्या प्रेमात त्याचा मुलगा पडेल आणि मग ती आपली विहीणच होईल!

पण आयुष्य कुठं सिनेमासारखं असतं. असं काहीच झालं नाही. आपण तिचा हात सोडला तशी ती जणू कुठे गायबच झाली. कुठेच दिसली नाही. मीन टाईम, जरा जरा तिच्या सारखीच दिसणारी रोहिणी आपली बायको झाली. मुलं झाली. पण रोहिणी अजिब्बात निलू होऊ शकली नाही. निलू हळुवार होती. तर रोहिणी खूप डॉमिनंट आणि हेकेखोर.

वाफाळत्या इडलीची त्याची ऑर्डर आली. त्याने हॉटेलच्या एन्ट्रन्सकडे बघत इडलीचा मोठा तुकडा काट्याने तोडला आणि तोंडात टाकला. पण इडली चांगलीच गरम होती. त्याला तो घास तोंडातून काढताही येईना आणि गिळताही येईना. त्याने गालाचा फुगा करून त्यातली हवा ओठांचा चंबू करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तोंड पोळलेच.

आपण निलूशीच लग्न करायला पाहिजे होतं. असं आयुष्य तरी पोळलं नसतं.

त्याने घड्याळात पाहिलं. निलांबरीने दिलेली वेळ टळून पाऊणतास झाला होता. त्याने फुंकर मारत ती इडली खाल्ली. पण लवकर संपवली. ती आली तर फजिती व्हायला नको म्हणून!

तेवीस वर्ष कशी निघून गेली. किती चढउतार आले-गेले. आता माझी मुलगी एकवीस वर्षांची झाली. त्याच वयाची. जेवढी निलांबरी होती. मी तिचा हात सोडला तेव्हा! मला अमेरिकेला जायची संधी मिळाली होती. निलांबरीची मी तिथे जावं अशी इच्छा नव्हती.

ती किती रडली. किती तमाशा केला तिने. पण मला ती टेक्सासची संधी सोडायची नव्हती. असा हट्ट, असा आवेग. मला तो त्यावेळी मूर्खपणा वाटला होता. आता, आता मी काय करतोय? आज मला, तिला पहायची कसली घाई झालीये. मी किती उतावीळ झालोय.’ त्याने दुसऱ्या इडलीचा उरलेला शेवटचा घास तोंडात टाकला.

त्याचवेळी वेटर बाजूला येऊन उभा राहिला.

“और… कुछ लेंगे साब?” वेटरने विचारलं.

“थोडा रुको।” राजीव म्हणाला.

“ज्यादा बैठने को इधर अलाऊ नही है। बाहर वेटिंग चालू है साब।” तो काऊंटरवरच्या माणसावर एक डोळा ठेवून म्हणाला.

“ठीक है। ठीक है। एक स्पेशल चाय लावो।” राजीव म्हणाला. तो वेटर गेला. राजीवने पुन्हा घड्याळात बघितलं. एक तास दहा मिनिटं झाली होती.

तिने स्वत:च फोन करू सांगितलं. पाचला भेटू म्हणून… फेसबुकवरून शोधली तिला… निलांबरी नावाच्या दीडशे-दोनशे तरी बायका बघितल्या असतील. त्यात ही मिळाली. मग मेसेंजर… मग फोन नंबर… किती वेळा ठरवत असताना कॅन्सल झालं.

शेवटी आजचा दिवस आणि ही वेळ ठरली. तर हिचा पत्ताच नाही. त्याने शेवटी मोबाईल काढला, आणि तिचं फेसबुकचं अकाउंट शोधायला लागला. तर तिचं अकाऊंटच दिसेना. त्याचा श्वास फुलायला लागला. त्याला राग यायला लागला.

तेवढ्यात वेटरने चहाचा कप त्याच्या पुढ्यात आणून ठेवला.

हा काय प्रकार आहे, स्वत:च रिप्लाय केलाय. पलीकडून वेळ-दिवस ठरवला. आपण म्हटलोही घरी काय सांगशील? पुरुषांना
काही त्यांची बायको विचारत नाही, की कुठे गेलेलात? पण बायकोला नवरा नक्कीच विचारतो.

त्यावर ती हसून म्हणाली होती, “करेन मी मॅनेज. नोकरी करते मी. येता-येता भेटेन तुला.” आता साडेसहा होत आलेत तरी हिचा पत्ता नाही. केअरलेसपणा आहे. हिला मला भेटण्याची ओढ असू नये. त्याने मोबाईलमध्ये तिचा नंबर डायल केला.

“हॅलो… हॅलो…” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.

पलीकडून फक्त श्वासाचा आवाज आला.

“ऐक ए निलू. कित्ती वेळ झाला. आपलं ठरलेलं ना… आज पाचला कृष्णविलासला भेटायचं म्हणून… मी थांबलो आहे. कधी येशील? आय मीन… आणखी किती वेळ लागेल तुला यायला? हॅलो निलू?”

पलीकडून एक पुरुषाचा आवाज आला, “हॅलो… कोण बोलताय?”

“मी… मी राजीव सातपुते…”

“आई कधी बोलली तुमच्याशी?”

‘आता आपलं भांडं फुटलं’ या विचाराने राजीवचे हात, पाय थरथर कापायला लागले.

“नाही… काही नाही… जाऊ द्या…” तो घाबरतच म्हणाला, “सॉरी… सॉरी…”

“थांबा. आई कधी बोलली तुमच्याशी?”

“काल. अगदी कालच. मी तिचा कॉलेजचा मित्र आहे. राजीव.” राजीव घाबरतच म्हणाला. “आम्हाला जरा भेटायचं होतं, गप्पा मारायच्या होत्या.”

“हे कसं शक्य आहे? आईला जाऊन तीन महिने झाले. आई गेली कॅन्सरने. आई तुमच्याशी काल कशी बोलेल?”

राजीवला सुन्न झाल्यासारखं झालं. “हो का?”

“तुम्हाला माहीत नव्हतं?” मुलगा पलीकडून म्हणाला.

“अरे. सो सॉरी. मला काहीच माहीत नाही. पण कॅन्सर?” राजीव म्हणाला.

“हो ब्लड कॅन्सर होता. आता नाहीये ती आपल्यात. फोन केल्याबद्दल धन्यवाद.” असं म्हणून त्याने फोन ठेवलाही.

राजीवला हुंदकाच फुटला. मग आपल्याशी बोलणारं कोणं? त्याने फेसबुकचं ते तिचं त्याने पाहिलेलं अकाउंट काढलं. तर तीचं अकाऊंट त्याला दिसलंच नाही.

त्याने चहाचा एक सिपच घेतला होता. त्यांच्या घशात हुंदका दाटला होता. त्याला जोरात ओरडून रडायचं होतं. पण त्याला हे काहीही करता आलं नाही.

त्याने खिशातून दोनशे रुपायची नोट, बडीशेपच्या छोट्या तबकात ठेवली. बरोबर आणलेली ती साडी असलेली प्लास्टीकची पिशवी तशीच. तो बसला होता तिथेच ठेवली. आणि त्या हॉटेलमधून तो सैरभैर होत निघाला.

“साब… आपकी चेंज और ये बॅग?” तो मघासचा वेटर धावत येऊन त्याला म्हणाला.

राजीवने त्याच्याकडे वळून बघितलं. “वो टीप है… रख दो।”

“साब ये बॅग?” वेटरने विचारलं.

“जिसके लिये लायी थी। वोह है ही नही। मेरी नही है वो बॅग। तुम ले लो।”

“अरे साब…” तो वेटर म्हणाला.

राजीव मागे न बघता अस्ताव्यस्त चालत राहिला. त्याने घेतलेल्या पांढऱ्या शिफॉनच्या साडीवरची गुलाबी फुलं जणू रस्त्याभर बेवारशासारखी पडलेली होती आणि तो ती तुडवत चालला होता.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,