`असं का म्हणता, अण्णा?’
`एखाद्या घराचं राहणं-टिकणं त्या घरच्या बाईवर अवलंबून असतं. तुझ्या मनावरचा संयमाचा बांध फुटून संताप उफाळून आला, तर त्या ज्वाळेत आम्ही सारे होरपळून जाऊ! तू मनोरुग्ण झालीस तर आमचा संसार नष्ट होऊन जाईल. त्या वेळी आपण सगळेच एकमेकांना अपरिचित होऊ! एकमेकांचा द्वेष करु. कठीण हृदयी होऊ. विनुतेची कथा ही दास्य-नष्टतेची कथा आहे. त्यामुळेच सांगतो, गोष्टी टोकाला जाण्याआधीच तू निघून जा.’
`पण गिरीशला विचारलं पाहिजे.’
`आजच सकाळी मी त्याच्याशी या विषयावर सविस्तरपणे बोललोय आणि बदलीचा अर्ज द्दाायलाही सांगितलंय. विनू, गिरीश स्पष्टपणे बोलत नसला तरी तोही तुझी कुचंबणा जाणून आहे! त्यामुळे अधिक वाद न घालता त्यानं माझी सूचना मान्य केली.’
हाही विनितेला सुखद धक्का होता.
`आई-वडिलांचं छत्र आवश्यक आहे, त्या छत्राखाली असताना वटवृक्षाच्या सावलीत असल्यासारखं समाधान वाटतं. पण तिथं इतर झाडं वाढत नाहीत! चंद्रू अशा विचारांमध्ये वाढला आहे. आपल्या पायावर उभा राहून त्यानं स्वत:चं व्यक्तित्व साकार केलं आहे. आत्मविश्वासही खूपच वाढलाय त्याचा. अमेरिकेनं त्याला जीवनाचे उत्तम धडे दिले आहेत.’
`अण्णा, कशी असेल हो ही अमेरिका?’ मनाला लक्ष-लक्ष वेळा छळणारा प्रश्न तिनं बोलून दाखवला.
`विनू, मी तरी काय सांगू? मी कुठं पाहिलाय तो देश? पण माझ्या अनुभवाच्या आधारे एवढंच सांगू शकेन- चंद्रू अमेरिकेला जाऊन डॉलर मिळवू लागला. त्यामुळे आमच्या घरात काही सुखसोयीही आल्या. माडीवरचं घर बांधणं शक्य झालं. सुरभीचं लग्न थाटामाटात करू शकलो. डॉलर नसता तरी हे सारं घडलंच असतं. पण इतक्या सुलभतेनं झालं नसतं. गौरी चौथीही पास झालेली नाही. ती नरसीपूरला माहेरी जातानाही सोबत हवी म्हणायची. आता एकटीच अमेरिकेला गेली. त्या देशाच्या संपत्तीनं आपल्या देशातल्या कुटुंबांवर प्रचंड परिणाम घडवला आहे. पण—’
`पण काय?’
`कुठलीही गोष्ट फुकट मिळत नसते! या डॉलरमुळे आमच्या गरिबीचं रुपांतर श्रीमंतीत होतं, तसंच घरांमध्ये भेगही पडते. घरात चढ-उतार निर्माण होऊन मनाची शांती नष्ट होते. हीच गोष्ट बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. तुझ्या सासूला तर याची कणभरही जाणीव झालेली नाही. ती जाणीव असती तर तीही अशी वागली नसती. आपल्या संसारावर तिनंच निखारे ठेवले नसते. सोन्यासारख्या सुनेला डॉलरच्या बदल्यात तिनं गमावलं नसतं. मला ठाऊक आहे विनू, अज्ञान आणि गरिबी यांमुळे ती तशी झाली आहे. स्वभावत: गौरी दुष्ट नाही हे तूही मान्य करशील! परिस्थितीमुळे ती तशी झाली आहे.’
एवढ्यात गिरीश आल्याची चाहूल लागली.
`अण्णा, पुढच्या महिन्यात बदली होईल. येता-येता डी. इ. ओ. ऑफिसमध्येही जाऊन आलो. डी. इ. ओ. तुमचे विद्यार्थी होते म्हणून सांगत होते. फार आदरानं बोलत होते तुमच्याविषयी! या महिनाअखेर विनितेचीही बदली होईल म्हणे.’
सारं इतक्या वेगानं घडलं होतं की विनितेचाही त्यावर विश्वास बसू नये!
सारं पूर्णपणे विचार करून केलं असलं तरी शामण्णांचं हृदय रडत होतं. ते दाखवू न देता ते हर्षला उचलून बाहेर निघून गेले.
एक ना एक दिवस हे घडायलाच हवं होतं.
गिरीश-विनितेनं परस्परांकडे पाहिलं. विनिता शामण्णांच्या पाठोपाठ जात म्हणाली, `आम्ही अम्मा आल्यानंतर जाऊ.’
`नको. ट्रान्सफर झाली की तुम्ही निघून जा. गौरीला सांगेन मी. पत्र लिहून आणखी गोंधळ करायला नको.’
रिक्षा घरापुढे थांबली. शामण्णा आठवणींच्या खाईतून बाहेर आले.
रिक्षाचे पैसे देऊन जेव्हा शामण्णाचं घराचं कुलूप उघडू लागले तेव्हा गौरम्मा चकित झाल्या.
`विनू शाळेला गेली?’
`तू घरात चल. सामान ठेव. फ्रेश हो. सांगेन सगळं.’
`काय झालं?’ गौरम्मा घाबरल्या.
`काहीही झालेलं नाही! मी तिला तिच्या घरी पाठवलंय.’
`धारवाडला?’
`होय. कायमची.’
`काय? घरात म्हाताऱ्या सासऱ्यांना टाकून निघून गेली ती?’ गौरम्मा संतापल्या, `गिरीला टाकून गेली?’
`गिरीला कशी टाकून जाईल? हर्ष आणि गिरीही गेलेत. ट्रान्सफर घेऊन.’
`काय सांगता! गिरीशनं बेंगळूर सोडून धारवाडला बदली करुन घेतली?’ त्या अविश्वासानं विचार लागल्या.
`होय. मीच तसं करायला सांगितलं!’ शामण्णांचा आवाज शांत होता.
`का?’
`कारण सांगू? त्या अमेरिकेत राहणाऱ्या सुनेवरच्या मोहापायी इथं आपल्यापाशी राहून आपल्यासाठी राबणाऱ्या सुनेला तुच्छ लेखून तू पाणउतारा करत होतीस. आता अमेरिकेहून आल्यावर प्रत्येक बाबतीत मानसीशी तुलना करुन हर्षला उगाच हलकं लेखणार यात शंका नव्हती. तुझ्या सान्निध्यात विनू मनोरुग्ण होऊन डिप्रेशनमध्ये गेली असती. त्याची लक्षणं हळूहळू तिच्या वागण्यात दिसायला लागली होती. माझ्या एका जुन्या विद्यार्थिनीशी- आता ती मनोरोगतज्ज्ञ आहे- या विषयावर मी चर्चा केली. डॉक्टरांनीच हा सल्ला दिला. एका सालस गुणी मुलीला मनोरुग्ण बनवण्याच्या पापापासून बचाव करुन घेण्यासाठी एवढाच उपाय माझ्यापुढे होता.’
गौरम्मा दुखावलेल्या स्वरात म्हणाल्या, `पण तिच्या वागण्यावरुन तसं काही वाटलं नव्हतं. बरीच दिसत होती!’ तरीही हे बोलताना मनाच्या कोपऱ्यातून आशा पाटील डोकावून गेली.
`खरंय, अजून ती मनोरुग्ण झालेली नाही. पण अशा वातावरणात राहिली तर व्हायची शक्यता आहे, म्हणून ही उपाययोजना! व्यक्ती असो वा प्राणी, आशा असते ती डॉलरची नव्हे, प्रेमाची! कितीही पोर धडपडली तरी आपल्या घरी तिला ते कधीच मिळालं नाही. आपल्याबरोबर मनोरुग्ण होऊन राहण्यापेक्षा दूर का होईना, सुखी राहू दे तिला!’
ह्या बदललेल्या परिस्थितीचं आकलन गौरम्मांना व्हायला काही वेळ जावा लागला. अमेरिकेला जाऊन आल्यावर उत्साहाच्या फुग्याला सुई टोचली गेली होती.
अशा परिस्थितीची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती. पण तेच आज वास्तव होतं!
`तुझ्या प्रत्येक पत्रात अमेरिकेचं वैभव, तिथल्या सामानाचं कौतुक असायचं. तरल स्वभावाच्या विनितेविषयी तू चुकूनही कधी एखादं वाक्य लिहिलं नाहीस. जमुनेनंही कधी तिचा उल्लेख केला नाही. कुणीही स्वाभिमानी व्यक्ती हा तिरस्कार सहन करु शकणार नाही!’
गौरम्मा म्हणाल्या, `तुम्हाला माझ्या मन:स्थितीची कल्पना नाही. ते पत्रातही लिहिण्यासारखं नव्हतं. आता मला सगळ्यांचे स्वभाव उमजले आहेत. जमुना कशी आहे आणि विनिता कशी आहे हे समजलंय! जमुनाचं क्षुद्र मन आणि पैशाचा अहंकार याचा मीही अनुभव घेतलाय!’
त्यांचा आवाज आर्द्र झाला होता.
`अहो, तिथंही इथल्यासारखी सुख-दु:खं आहेत. त्यांच्या दु:खाचा प्रकारही वेगळा आहे. तिथं गेल्यावर हे समजलं. या अमेरिकेच्या यात्रेनं माझे डोळे उघडले. येताना सारखं मनात येत होतं, किती नशीबवान आहे मी! विनितेसारखी सून मला मिळाली आहे! इथं येऊन पाहतोय तर ही तऱ्हा!’
गौरम्मांना दु:ख अनावर झालं. डोळ्यांमधून उष्ण पाण्याच्या धारा लागल्या. त्यांनीही त्या आवरायचा प्रयत्न केला नाही. त्या अश्रूधारांमध्ये शामण्णांना प्रामाणिक पश्चात्ताप दिसला.
`गिरीशला पुन्हा इथंच बदली घेऊन यायला कळवा ना!’
`का? तुला पश्चात्ताप झालाय म्हटल्यावर त्यांना या म्हणून कळवू? आम्ही म्हातारे झालोय- तुम्ही आमची सेवा करा म्हणू? गौरी, तुझ्या मुलांना तू तुझ्या घरात तुला जसं पटलं तसं वाढवलंस! तसंच आता विनितेला तिच्या घरात तिला वाटेल तसं आपल्या हर्षला वाढवू दे. त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हायची आपण संधी द्यायला पाहिजे. त्यांनी सतत आमच्याच छत्राखाली राहिलं पाहिजे असा आग्रह ठेवायला नको. जसा चंद्रू मोकळ्या वातावरणात वाढत आहे तसं गिरीशलाही वाढू दे. हेच खरं जीवन! आपले हात-पाय जोपर्यंत चालताहेत, तोपर्यंत आपण इथंच राहू या. नंतर त्यांच्या घरी जाऊन राहू या. तेव्हा आपण त्यांच्याशी जुळवून घेऊ.’
गौरम्मांनी डोळे पुसले.
`गौरी, दुसरं म्हणजे ही मुलं काही आपल्याबरोबर भांडून घराबाहेर पडलेली नाहीत. आनंदानं बाहेर पडली आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात कटुता नाही. तूही कडवटपणा न धरता इथं आरामात राहा.’
तरीही त्या म्हणाल्या, `जाऊ दे! निदान आपण तरी धारवाडला जाऊन हर्षबरोबर आठ-दहा दिवस राहून येऊ या! वर्ष होऊन गेलं त्याला बघून! त्याला माझी आठवण तरी आहे की नाही देव जाणे!’
`एवढंच ना? उद्याचंच रिझर्वेशन घेऊन येतो! एक मात्र बजावून सांगतो- तिथं गेल्यावर तू फक्त अमेरिकेच्याच गोष्टी बोलत राहायचं नाहीस!’
`नाही!’ दुखावलेल्या स्वरात गौरम्मा उत्तरल्या.
गौरम्मांनी आपली सूटकेसची चावी काढण्यासाठी पर्स उघडली. वाटेत खर्चासाठी म्हणून चंद्रूनं दिलेले शंभर डॉलर्स तिथंच होते. चावीबरोबर ते बाहेर पडले. गौरम्मांनी विषादानं तिकडे पाहिलं. त्यांच्या दृष्टीनं आज डॉलर्सची कायमची हार झाली होती!
रुपया जिंकला होता!