हॅपी बर्थडे
त्याचं एमबीएचं शेवटचं वर्ष होतं यंदा. आणखी दोन तीन महिन्यांत त्यांची शेवटची परीक्षा त्यानंतर ते सगळे नोकरीधंद्याला लागणार होते. त्यांचं शिक्षण पूर्ण होऊन ते स्वतःला जगाच्या मार्केटमध्ये स्वतःला आजमावणार होते. त्यांचा सात जणांचा ग्रुप म्हणजे अगदी सिनेमातल्या सारखाच होता. सुमीत-निशा, कपिल-ऐश्वर्या, निलेश-मृन्मयी ह्या तीन प्रेमवीरांच्या जोड्या आणि सुमित्रा असे वेगवेगळ्या शहरातून आलेले सात जण! ह्या जोड्या तर त्या शैक्षणिक संकुलातल्या सगळ्या कॉलेजांमध्ये सर्वप्रसिद्ध आणि सगळ्यांच्या लाडक्या! ह्यातल्या कुणालाही कुणी कधी एकटं पाहिलं नव्हतं. हे सगळे कुठेही जाताना एकत्रच जात असत. वर्गातही ते एकत्रच बसत. ह्या जोड्यांनी आपले स्पेशलायझेशनही आपल्या एकमेकांच्या विचारानेच घेतलं होतं. अभ्यास असो, खेळ असो किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असो ह्या सात जणांशिवाय कॉलेजचं पण हलत नसे. त्यांच्यापैकी सुमित, निशा आणि सुमित्रा मुंबईचे होते. निलेश आणि ऐश्वर्या पुण्याचे, सुमित्रा नाशिक आणि मृन्मयी रत्नागिरीची होती.
त्यांचं कॉलेज म्हणजे शिक्षणसम्राट खासदार अनंतराव राजमानेंच्या प्रसिद्ध शिक्षणसंकुलातील सगळ्यात नवं सुरु झालेलं कॉलेज. थोड्या मार्कांवरून शहरातली कॉलेज ज्यांना मिळत नसत अशा विद्यार्थ्यांची पहिली पसंती राजमानेंच्या एकलव्य ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्सलाच असे. पंचतारांकत कॉलेज असं उपहासाने त्यांच्या कॉलेजांना म्हटलं जायचं. त्याचं कारणही तसंच होतं. एका तालुक्याच्या ठिकाणी अगदी अमेरिकेत शोभाव्या अश्या सुंदर इमारती, बगीचे, खेळाची मैदानं आणि एका शिक्षण संस्थेत ज्या ज्या म्हणून सुविधा असाव्यात त्या सगळ्या जागतिक दर्जाच्या सुविधा विध्यार्थ्यांना येथे मिळत मग तो साधा बीएचा विद्यार्थी असो किंवा आर्किटेक्चरचा! वैद्यकीय कॉलेज सोडून सगळी कॉलेजेस या संकुलात होती. तसं या कॉलेजांमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती पण शहरातून आलेले विद्यार्थीही बरेच असत. जोपर्यंत संकुलाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आपण पुण्या-मुंबईत असल्यासारखंच वाटत असे.
जरी ते सात जण नेहमी एकत्र राहत असले तरी ते सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून राहत असत आणि त्यामुळेच ते सर्वांचे लाडके होते. छोट्या गावांमध्ये प्रेमप्रकरणं जरा लपून छपूनच होतात पण या लोकांनी कधी ती लपविली नाहीत. तरीही ते सगळीकडे आपल्या मर्यादांचं भान ठेऊनच वागत. आता कॉलेज संपणार आणि सगळे वेगवेगळे होणार याची जाणीव सगळ्यांनाच झाली होती. म्हणून ते प्रत्येक दिवस काहीतरी निमित्त काढून साजरा करण्याचा प्रयत्न करत असत.उद्या निलेशचा वाढदिवस होता. निलेश म्हणजे या ग्रुपमधलाच नव्हे तर आख्ख्या कॉलेजातला एक नंबरचा अवली मुलगा. त्याला टेन्शन म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. एकदम बिनधास्त मुलगा. एखादी सुंदर मुलगी दिसली की तो थेट जाऊन तिला 'तुम्ही खूप सुंदर दिसता!' किंवा ' हा ड्रेस तुम्हाला अगदी शोभून दिसत आहे' वगैरे कंप्लीमेंट देत असे. कुणी मुलगा जर मनातल्या मनात कोणत्या मुलीवर मरत आहे असं त्याला समजलं की लगेच तो त्या मुलीकडे जाऊन तिला त्याच्याबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे. बोलण्यात अगदी चतुर आणि तेवढ्याच साफ मनाचा! अभ्यासात हुशार पण त्याला कधी अभ्यास करताना कुणी पाहिलं नव्हतं. जेव्हा सगळे अभ्यास करायचे तेव्हा हा येऊन थेट सगळ्यांना शिकवायला सुरवात करायचा, कुणाला कुठल्या विषयाची शंका असेल तर सरांकडे जाण्याआधी ते निलेशला पकडायचे. तोही सगळ्यांना मनापासून मदत करायचा. पण कुणी काही सांगितलेलं त्याला आवडायचं नाही. त्याची लाईफ तो त्याच्या आणि फक्त त्याच्याच मर्जीने जगायचा. हे कर किंवा हे करू नको असं कुणी त्याला सांगण्याचा प्रयत्नही करत नसत. थोडक्यात तो त्यांच्या कॉलेजातला थ्री इडियट्स मधला रँचो होता. त्याच्यासारखंच ह्याच्या वौयक्तिक आयुष्याबाबत त्यांचा ग्रुप वगळता कुणाला जास्त माहिती नव्हती. अशा अवलीयाचा उद्या कॉलेज जीवनातला बहुधा शेवटचा वाढदिवस होता. उद्या संध्याकाळी त्यांच्या कँटीनमध्ये त्याने सर्वांसाठी छोटीशी पार्टी ठेवली होती.
या उरलेल्या सहा जणांनी मात्र आज रात्रीच बारा वाजता त्याच्या फ्लॅटवर सेलिब्रेट करायचं असा सरप्राईज प्लॅन बनवला होता. सुमीत आणि कपिल एकत्र एका फ्लॅटवर रहायचे. निलेश एकटाच एका फ्लॅटमध्ये राहायचा आणि सगळ्या मुली कॉलेज हॉस्टेलमध्ये राहायच्या. कॉलेजमधल्या बाहेरगावाहून आलेल्या सगळ्या मुलींना हॉस्टेलमध्ये राहणं कम्पल्सरीच होतं. मुलींनी होस्टेलच्या वॉर्डन मॅडमना त्याच्या वाढदिवसाची कल्पना देताच मॅडमनी त्यांना लगेच एक रात्र बाहेर राहण्याची परवानगी दिली. ती मुलं इतक्या जबाबदारीने वागत की आख्ख्या संकुलाच्या स्टाफचा त्यांच्यावर स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त विश्वास होता. आठ वाजता त्या चौघींनी कपिलच्या फ्लॅटवर यायचं आणि तिथून रात्री बरोबर बारा वाजता सगळ्यांनी निलेशच्या फ्लॅटवर जायचं आणि सरप्राईज द्यायचं असं ठरलं होतं.
ठरल्याप्रमाणे त्या चौघी बरोबर आठ वाजता फ्लॅटवर आल्या. सुमीत बेडवर पसरून लॅपटॉपवर काहीतरी करत होता. आल्या आल्या ऐश्वर्याची नजर कपिलला शोधू लागली.
"तो नाहीये! शोधू नकोस!" सुमीत लॅपटॉपवरची नजर न हटवताच बोलला. आणि ऐश्वर्या सोडून सगळे मोठमोठ्याने हसू लागले.
"कुठेय तो? खोटारडा आत्ता मला मेसेज केला फ्लॅटवरच आहे म्हणून! हा बघ!" हातातला मोबाईल नाचवत ती बोलली.
"अगं! सामान आणायला गेलाय तो. येईल. एवढी उतावळी का होतेयस?" सुमीत
"केक आणून ठेवलाय ना पाच वाजता?" ऐश्वर्या
"आग पोटापाण्याची सोया नको का? की फक्त केक खाऊन झोपणारेस?" सुमित्रा मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करत बोलली.
नंतर ते सगळे गप्पा मारत बसले. तासाभराने सुमीत आला.
त्याच्या हातात बऱ्याच पिशव्या होत्या.
"ए महामयांनो! धरा ना जरा. मी काय हमाल आहे का तुमचा? ए म्हशी उठ ना!" तो निशाला बोलला.
"तुझ्या आयटमला उठाव ना कुत्र्या!" निशाने त्याच्या भाषेत त्याला उत्तर दिलं आणि त्याच्या हातातल्या पिशव्या घेतल्या!
"हे काय आणि?" त्यातली काळी पिशवी सुमीतच्या तोंडासमोर धरत निशाने विचारले.
"मी आणलय का ते? त्याला विचार ना!" वैतागत त्याने पिशवी बाजूला केली आणि लॅपटॉपमध्ये तोंड गाडले.
"कपल्या काय आहे हे?" निशा ओरडली. बाकीच्या तिघी इतर पिशव्या उचकून त्यात काय काय आहे हे बघत होत्या.
"दिसत नाही का? दारू आहे!" कपिल बाथरूम मधून चेहरा पुसत बाहेर आला.
"एवढी??" निशा
"निळ्याचा बर्थडे आहे तो ही शेवटचा! एकदम सुपर झाला पहिजे ना!"
"बेवड्याला निमित्त पाहिजे फक्त" ऐश्वर्या बोलली
"त्या निळ्याचं शिक जरा! थेंबाला स्पर्श करत नाही तो कधी!" मृन्मयीने एकदाचं तोंड उघडलं.
"अहाहा! आली मोठी कौतुकाची. बिड्या फुकून फुकून छातीचा पिंजरा झालाय आणि म्हणे निळ्याचं शिका!" ऐश्वर्यानेही लगेच कपिलची बाजू घेतली. निशा आणि सुमीत बेडवर शेजारी शेजारी बसून त्यांचे संभाषण ऐकून हसत होते.
"ए त्याला बोलू नको हा काही. मी तुझ्या कपल्याला काही बोलते का कधी? तूच बेवड्या म्हणालीस त्याला. कपल्या सोडून दे तिला" मृन्मयी
"मी काहीही बोलेन त्याला. तू नाहीस बोलायचं! आणि मारून टाकेन त्याला त्याने तसा विचार जरी केला तरी." ऐश्वर्या फुत्कारली.
"ओ लव्हबर्डस! शांती!" सुमित्रा बोलली
"ते सोडा हे बघा सुमीतने किती छान व्हिडिओ बनवलाय निळ्यासाठी!" निशा बोलली. सगळे व्हिडिओ पाहत होते. एक त्यांचे कॉलेजातले फोटो आणि व्हिडिओ एकत्र करून सुमीतने एक तासाभराच्या व्हिडिओ बनवला होता. सगळे विडीओ बघायला बसले. गप्पांच्या नादात साडेअकरा कधी वाजले कळलंच नाही.
"मित्रहो, चला निळूभाऊंकडे जाऊयात आता!" सुमित्रा.
"होहो! चला उठा म्हणत सुमीतने लॅपटॉप बॅगेत कोंबला आणि बॅग पाठीला अडकवली.
सगळ्यांनी पिशव्या उचलल्या आणि निलेशच्या फ्लॅटकडे निघाले. त्याचा फ्लॅट दहा मिनिटांच्या अंतरावरच होता.
"मुन्ने तू त्याला काही सांगितलं नाहीस ना सरप्राईजबद्दल?" कपिलने मृन्मयीला विचारलं. ती फोनवर बोलत होती
"नाही!" तिने थोडावेळ फोनवर हात धरला आणि उत्तर दिलं. बोलत बोलत ते बिल्डिंगमध्ये पोचले. जिना चढू लागले
"ए बाई! आलो ना त्याच्या घरी ठेव ना आता फोन!" ऐश्वर्या मृन्मयीला बोलली. तिने नुसतंच नाक मुरडलं आणि पुन्हा बोलू लागली. निलेशच्या फ्लॅटच्या दारात उभे राहत त्यांनी बेल दाबली. निलेशने दरवाजा उघडला.
"हॅपी बर्थडे बाबू!" म्हणत मृन्मयीने निलेशला मिठी मारली.
"थँक यू मुनु!" निलेशनेही तिला हलकेच मिठी मारली.
"हां सोडा आता! बस!" म्हणत सुमित्राने मृन्मयीला ओढले.
"हॅपी बर्थडे निल्या!" म्हणत सुमित्रानेही त्याला मिठी मारली. "थँक्स! थँक्स!" निलेश.
"ए सुमे! सुरक्षित अंतर ठेवा! आमच्या मुनुला राग येईल हं!" ऐश्वर्या मृन्मयीला चिडवत बोलली
"तू गप हां ऐशे! मला नाही काही वाटत. माझा निलेश तुझ्या कपल्यासारखा नाही!" मृन्मयी
"हो का? मग तो काल त्या फार्मसीच्या अंकिताबरोबर इतका वेळ काय गप्पा मारत होता गं?" ऐश्वर्या
"निळ्या. काय बोलतेय ती?" मृन्मयीचे गाल फुगले.
"अगं मस्करी करतेय ती!" असं म्हणून कपिलने निलेशला मिठी मारली "मेनी हैप्पी रिटर्न्स ऑ द डे भावा!"
"थँक यु ब्रदर!" निलेश
सगळ्यांनी दारातच त्याला शुभेच्छा दिल्या आणि आत गेले.
सर्वांनी मिळून केक कापला एकमेकांना भरवला. केकचा कार्यक्रम उरकेपर्यंत कपिल आणि सुमीतने प्यायची तयारी केली.
निलेश आणि मृन्मयी दारू पीत नसत. तसं निलेश पूर्वी पीत असे पण दोन वर्षापासून त्याने बंद केली होती. पेग भराभर रिकामे होऊ लागले. धुराडी पेटली. हे दोघं वगळता सगळे टुन्न झाले होते. त्यांच्यात ऐश्वर्या आणी सुमित्रा काही प्रमाणात शुद्धीवर होत्या.
"ए मुन्ने घे ना थोडी!" सुमित्रा बड्बडली
"नको मला!" मृन्मयी
"अगं घे ना!" कपिल आणि सुमित एकदाच बोलले आणि विनाकारण मोठमोठ्याने हसू लागले.
"न...को...य!" मृन्मयी
"सगळे म्हणत आहेत तर घे ना थोडी" निलेश बोलला
"नको ना बाबू!" ती
"प्लीज माझ्यासाठी.. थोडी. ट्राय करन बघावं सगळं एकदा." निलेश
"ओके पण थोडीच!" तिला टाळता येईना. तिच्या बाबूचा बर्थदे होता ना
निलेशने एक हार्ड पेग बनवला आणि तिच्या हातात दिला," गटकन पिऊन टाकायचं औषधासारखं. कडू लागेल थोडं."
तिने ग्लास घेतला आणि डोळे गच्च मिटून संपवून टाकला.
"याक! किती घाण आहे! कशी पिता तुम्ही!" गळा दोन्ही हातात धरत ती तोंड वेंगाडत बोलली. सगळे मोठमोठ्याने हसू लागले. एका ग्लासतच तिला ग्लानी आली.
"बाबू! चक्कर येतेय! मला झोपयचंय!" तिला बोलताही येईना! निलेशने तिला धरून आतल्या खोलीत नेऊन झोपवलं.
आता सगळे टाईट झाले होते. सुमित्रा अजूनही पीतच होती.
"सुमे काय झालंय बास की!" ऐश्वर्या
"नाही आज पिणार! सुमित्रा आज पिणार! जे पाहिजे ते आयुष्यात पहिल्यांदा सुमित्राला मिळवता आलं नाहीये! सुमित्रा यू आर या लुजर!" म्हणत सुमित्राने एका घोटात ग्लास सम्पवला आणि पुन्हा भरला.
"काय झालं बाळा!" निशा तिच्या हातातून ग्लास ओढू बघत होती पण तिने घट्ट धरून ठेवला होता. कपिल आणि सुमीत केव्हाच आडवे झाले होते.
"हा निळ्या आहे ना? हा निळ्या?" सुमित्रा बरळू लागली.
"काय केलं त्याने?" ऐश्वर्या
"तो माझा होता माझा! मुन्नीनं हिसकावून घेतला त्याला माझ्याकडून!" तिने आणखी एक ग्लास संपवला.
"काय?" निशा आणि निलेश यांची प्रतिक्रिया एकदाच उमटली.
"हाहाहा! घाबरलात ना! मस्करी केली रे निळ्या! भाऊ आहेस तू माझा! घाबरलास ना?" सुमित्रा दात काढत बोलली.
"सुमे झोप बरं आता!" निलेश बोलला
"वेड लागलंय तिला!" ऐश्वर्या
"ए कपल्या, सुम्या उठा माकडांनो. पसारा आवरा हा!" निशा कपिल आणि सुमीतला हलवून उठवू लागली.
"ए कपल्या आपण जाऊ आपल्या फ्लॅटवर! इथे कोण ग्रामस्वछता अभियान करत बसेल!" सुमीत डोळे न उघडताच बोलला.
"होहो! तिकडेच जायचं! नो ग्रामस्वच्छता!ऐशू चल उठ!" कपिलने उठून चप्पलही घातली.
"चालते व्हा लवकर! दोघेही! आम्ही झोपतो इथेच! त्याचा वाढदिवस आहे आज आणि त्याच्या उरावर या पसारा ठेऊन आरामात झोपायला निघालात का तुम्ही?" निशा चिडली.
"जाऊदे निशा मला सवय आहे. पार्टीत न पिण्याचे काही तोटेही असतात. त्यापैकी हा एक असं म्हणत निलेशने बाटल्या गोळा करायला सुरवात केली. कपिल निलेशजवळ आला आणि त्याला मिठी मारली.
"भावा सॉरी! तुला माहिती आहे ना! तू असंच राहूदे सगळं! आम्ही सकाळी नक्की साफ करू. गळ्याशप्पथ!" गळ्याला हात लावत कपिल बोलला.
"असूदे कपल्या जा तुम्ही. का येऊ सोडवायला?" निलेश
"बघ! बघ! आपला भाऊ आहे तो. दिलदार आहे. तुझ्यासारखा कुचका नाहीये तो. भाऊ कुणाचा आहे शेवटी!" सुमीत
"माझा आहे! मी बोलले ना माझा भाऊ आहे!" हात उंचावत सुमित्रा बोलली."
"निघतो का आता?" बाजूला पडलेली चप्पल उगारत निशा बोलली.
ते दोघे हलत डुलत निघून गेले. निशाने दार लाऊन घेतलं.
"निळू तू आणि मुन्नी झोपा आत. आम्ही तिघी झोपतो इथे सगळं साफ करून!" निशा बोलली
"तू बस जरा सुमीला धरून बाजूला! ऐशू आपण पटकन साफ करून घेऊ मी झोपतो इथे तुम्ही सगळ्या आत झोपा!" निलेशने सगळं गोळा करून एका पिशवीत भरलं.
"नको तूच आत जा! आम्ही तिघी झोपतो इथे!" असं म्हणत ऐश्वर्याने झाडायला सुरवात केली.
"अगं ऐक माझं! ती झोपी गेलीय आता. आम्ही थोडी गप्पा मारणार आहोत आता. आणि इथे पंखा खूप आवाज करतो तुम्ही झोपा आत!" त्याने सुमीला धरून उठवलं आणि आत नेलं! निशा भिंतीचा आधार घेत उभी राहिली. भिंतीचा हात सोडताच ती धाडदिशी जमिनीवर आदळली. शेवटी ऐश्वर्या आणि निलेशने धरून तिलाही आत नेऊन झोपवलं. दीड वाजत आले होते. निलेश फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. ऐश्वर्याने निलेशसाठी अंथरूण केलं.
"अरे कशाला एवढं मी केलं असत ना! असंही लगेच झोपणार नाहीये मी." निलेश
"असुदेत झोपशील तेव्हा झोपशील!" ऐश्वर्या उठून उभी राहत बोलली.
"ओके थँक यु!" निलेशने शर्ट काढला. तो नेहमी शॉर्टस आणि बनियनवरच झोपत असे.
"निलेश!" ऐश्वर्या
"हा?" निलेश मागे वळला.
"मेनी हॅपी रिटर्न्स ऑ द डे! हॅव अ वंडरफुल इयर अहेड!" असं म्हणत तिने त्याला मिठी मारली
"थँक्स ऐशू! आता झोपा निवांत! मी आहे इथे!" निलेश गादीवर भिंतीला टेकून बसला
"गुड नाईट!" ऐश्वर्या गोड हसली आणि झोपायला आत गेली.