अश्लील शैली
मुंबईपासून लांबच्या स्टेशनवर एक चाळ होती. शांती नाव तीच. नाव शांती असली तरी कायम अशांत असलेली. पागडी पद्धतीने राहणारी बिऱ्हाड. शेजारच्या घरातून मटणाचा वास आला की बाजूच्या घरातील नवराबायको मध्ये कमाई वरून भांडण. जवळजवळ सगळ्या बिऱ्हाडांची आपसात भांडण, पण सणवार आले की सगळे एकत्र, अस काहीसं संमिश्र वातावरण होत शांतीमध्ये.
तर आमच्या सावंत काकू ह्या चाळीत रहात. चाळीमधला सर्वात ऍक्टिव्ह ‘सी सी टीव्ही कॅमेरा’. कोणाच्या घरी कोण आलं, आज कोणाच्या घरी काय जेवण बनवलंय, कोणाचं कोणाशी आणि कशावरून भांडण झालं ह्याची सगळी माहिती त्यांना होती म्हणून त्यांना खाजगीत ‘सी सी टीव्ही’ हे टोपण नाव होत.
एक दिवस उन्हाळी दुपारची वेळ होती. अशांत असलीतरी चाळ दुपारी चिडीचूप होती. कडक उन्हामुळे शक्यतो कोणी बाहेर निघत नसे. सावंत काकू दोरीवर वाळायला घातलेले कपडे बघण्यासाठी घराच्या बाहेर गेल्या आणि त्यांनी सहज समोर बघितलं.
समोरच्या जिन्यात कोणीतरी उभं होत. एक मुलगा आणि एक मुलगी इकडे तिकडे बघत घाबरत एकमेकांशी बोलत होते. त्यांना बघताच काकूंचा सी सी टीव्ही कॅमेरा एकदम जागृत झाला आणि दोरीवरचे कपडे तसेच सोडून समोरच्या खबरेच लाईव्ह फुटेज घेण्यासाठी त्या दबकत जिन्याजवळ गेल्या.
त्या दोघांमध्ये हळू आवाजात संभाषण चालू होतं. त्याने विचारलं, “मग काय ठरवलंय?”
तीने उत्तर दिलं, “काही कळत नाही आहे काय करू ते.”
तो बोलला, “काय तो निर्णय लवकर घे. दिवस फार कमी उरलेत.”
दिवस कमी उरले आहेत हे वाक्य कानावर पडताच काकूंच्या भुवया वरती झाल्या आणि आता ती काय उत्तर देतेय, हे ऐकण्यासाठी त्यांचे प्राण कानात एकवटले.
ती थोड्या रडक्या आवाजात बोलली, “हो रे! उशीर केला तर सगळं संपेल. मग मी जगू शकणार नाही. मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून…”
तिला मध्येच तोडत तो जरा मोठ्या आवाजात तिला बोलला, “अग अशी टोकाची भूमिका घेवू नकोस. आपण ह्यातून काहीतरी मार्ग काढू. अश्या गोष्टींतून बाहेर यायचे इतरही बरेच मार्ग आहेत”
ती बोलली, “पण आता खूप उशीर झाला आहे. आजचं काहीतरी शेवटचा निर्णय घ्यायला हवा.”
वरतून कोणीतरी खाली यायची चाहूल लागली तस तो बोलला, “ओके! ओके! ठीक आहे. मी काहीतरी मार्ग काढतो. कोणीतरी येत आहे. तू जा आता. मी तुला नंतर कॉन्टॅक्ट करतो.” अस बोलून तो गडबडीत खाली पळाला. तीने वरच्या मजल्यावर धूम ठोकली.
वरतून दुसऱ्या माळ्यावरचे अण्णा खाली येत होते. वर जाणाऱ्या तिला म्हणजे सुमनला त्यांनी विचारलं, “काय ग सुमे? कुठे पळत चालली आहेस?”
त्यांच्या प्रश्नाने सुमी थोडी गोंधळली पण स्वतःला सावरत बोलली, “काही नाही अण्णा! खाली एक कुत्रा होता त्याला बघून पळत आले.”
अण्णा हसत खाली जात बोलले, “काय सुमे! आता लग्नाचं वय झालं तुझं आणि कुत्र्याला घाबरते.”
अण्णा खाली आले तश्या सावंत काकू आपल्या घराजवळ जावू लागल्या आणि मनात बोलू लागल्या, “हा बेवडा अण्णा मध्येच कुठे तडमडला. नेमका क्लायमॅक्सच्या वेळीच टपकला. दारू आणायला जात असेल मेला.” अण्णांच्या नावाने दातओठ खात काकू घरात गेल्या.
घरी गेल्यावर काकुंच काही लक्ष लागेना कामात. सारख त्यांना डोळ्यासमोर सुमी आणि संजू दिसत होते. दोन्ही पोर चांगली हुशार व्यवस्थित वागणारी मग काय चाललं होतं दोघांत? तीच बोलणं काकूंना आठवलं. “उशीर केला तर सगळं संपेल.” म्हणजे नेमकं काय? कसला उशीर? काय चूक केली सुमीने? असे नानाविध प्रश्न काकूंच्या मनात आले.
कशीतरी दुपारची काम उरकून काकू थोड्या वामकुक्षी करायला पलंगावर पहुडल्या पण त्यांचा डोळा लागेना. त्या सारख्या कुशी बदलत होत्या पण त्यांना झोप येत नव्हती. संजू-सुमी त्यांच्या झोपेसमोर राहू-केतू सारखे आडवे उभे राहिले होते. आता काकूंच्या हलकं हलकं पोटात दुखू लागलं. शेवटी त्यांनी मनाशी काहीतरी ठरवलं.
काकू घराच्या बाहेर पडल्या आणि बाजूला दोन घर सोडून परबांच्या घरात शिरल्या. शिरताना बोलल्या, “परब वहिनी, आहात का घरी?”
परब वहिनींचा नुकताच डोळा लागला होता. सामंत काकूंच्या खणखणीत आवाजाने त्या उठून बसल्या. थोड्या वैतागला होत्या पण चेहऱ्यावर तसे न दाखवता बोलल्या, “या या सावंत वहिनी, बसा!”
सावंत काकू बोलल्या “तुमची झोप मोड झाली वाटत.”
कसातरी चेहऱ्यावरचा राग लपवत परब काकू उसनं हसू आणून बोलल्या, “नाही हो झोपली नव्हती नुसती पडली होती.”
सावंत काकूंनी घरात येताच दरवाजा आतून बंद केला. त्यांची ही कृती बघून परब काकूंनी ओळखलं काहीतरी खास काम असणार सावंत वहिनींच. पोट धरून त्या परब काकूंच्या बाजूला बसल्या.
पोट धरलेले बघून परब काकूंना वाटलं की सावंत काकूंच्या कदाचित पोटात दुखत असेल. सावंत काकू बोलायच्या आतच त्या बोलल्या “पोट दुखतंय का? ओवा-सोडा काय देवू का?”
त्यांना समजावत सावंत काकू बोलल्या, “अहो, अशी खबर आहे की ती ऐकल्यावर तुमच्या पण पोटात दुखेल.”