“क्षणापुरतं जगणारी जनावरं! माणसाला जनावरसारखं जगून नाही चालत.” तिला त्याच्यासोबतचा हा संवादही खुप आनंद देत होता. तिच्या रुक्ष यांत्रिक नवऱ्याशी असा संवाद या आयुष्याततरी होण्याची सुतराम शक्यता नव्हती.
“शेवटी माणूसही जनावरच! आपली गुप्तांगे झाकली म्हणून त्याला वासना झाकता येत नाहीत. उलट माणसापेक्षा जनावरे बरी. ती खरी असतात. त्यांची मनं झाकून ठेवत नाहीत ती. निर्मळ असतात जनावरं! माणसा सारखी गलिच्छ मनं नसतात त्यांची. एकमेकांशीच नव्हे तर स्वतःशीदेखील कमालीची प्रामाणिक असतात ती नाही का?” तो
“पण माणसांमध्ये जगायचं तर त्यांनी आखलेल्या रेषा पुसून कसं चालेल? नियम अटी पाळल्या गेल्या नाही तर जग चालेल असं वाटतं का तुम्हाला?” ती आता सावरली होती.
त्याच्या बोलण्यावरून तो तिच्यावर जबरंदस्ती करणार नाही एवढं तर तिला नक्की समजलं होतं. ती समोरच्या एका दगडावर बसली. तिला आता भीती वाटत नव्हती. होती फक्त उत्सुकता… एक अनामिक हुरहुर आणि कमालीची उत्कटता!
“कसले नियम कसल्या अटी? कुणी केले हे नियम? आणि हे नियम किती पाळले जातात? दर दुसऱ्या घरात कुणी नराधम चिमुरड्यांच्या अंगाला हात घालतो. चित्रपटातल्या कलाकारांकडे पाहून मनातल्या मनात जिभल्या चाटतो आणि कुणी बाहेर त्याच्या बायकोकडे कुणी पाहिलं तर तोंडातल्या तोंडात शिव्या देतो. जर हे नियम अस्तित्त्वात आहेत आणि पाळले जात आहेत तर तो त्या माणसाच्या कानाखाली जाळ काढण्याची हिम्मत का दाखवू शकत नाही?” तो अजूनही तिच्याकडे पाहत नव्हता.
“माणसाच्या नियमांचं ठीक आहे तुम्हाला नाहीत मान्य! पण स्वतः स्वतःसाठी नियम घालणे, स्वतःच्या मर्यादा निश्चित करणं आणि त्या पाळणं हे त्याच्या स्वाभिमानासाठी गरजेचं नाही?” ती त्याच्या युक्तिवादांवर खरं तर फिदा होतं होती पण तिला आता हाव सुटली होती. तिला आणखी ऐकायचं होतं!
“का? मला हवं तसं आयुष्य मी का जगू नये? का म्हणून स्वतःला बांधून ठेऊ मी? मला अभिमान वाटेल जेव्हा जग म्हणेल बेट्याने सगळं धुडकावलं, स्वतःच्या मर्जीने जगला! स्वतःला मर्यादा तरी का घालतात माणसं? सगळ्यांनी त्याला चांगलं म्हणावं, त्याला नावजावं म्हणूनच ना? कुणी काहीही म्हणो, कितीही निस्वार्थी जगायचं म्हटलं तरी आपलं आयुष्य ‘स्व’ या दीड शब्दातच सुरु होतं आणि त्यातच संपतं!” तो
“जगात निस्वार्थीपणाची अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला सांगायला नकोत ती!” ती
“एकही नाही! माझ्यावर विश्वास ठेवा आणि बारकाईने विचार करा! असा एकही माणूस या जगात नाही ज्याला ‘स्व’ पासून मुक्ती मिळालीय” तो
“आणि हो हे सगळं मी बोलतोय ते तुम्हाला कशासाठीही कनव्हीन्स करण्यासाठी नाही. बऱ्याच दिवसांनी असं कुणीतरी भेटलंय ज्याला मी जे बोलतोय ते कळतंय म्हणून!” त्याने बऱ्याच वेळानंतर तिच्याकडे पहिले. अगदी तिच्या डोळ्यात. त्याची नजर तिच्या काळजाच्या आरपार गेली. तिच्या सर्वांगावर शहारा फुटला.
“जरी कन्विन्स करत असतात तरी मी ऐकलं असत सगळं! शेवटी माझ्यातही ‘स्व’ आहेच! फक्त त्याला मी कोंडून ठेवलंय एवढंच,” तिच्याकडून त्याला पहिल्यांदा सूचक प्रतिसाद मिळाला.
“असं होतं नसतं! त्याच्यावर तुमचा ताबा नाही. तुम्ही त्याच्या ताब्यात आहात! आजच्या घडीला लोक तुम्हाला काय म्हणतात, ते तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. पण विचार करा ती ही तुमच्या ‘स्व’ चीच गरज आहे! नंतर हळूहळू त्याला याचा कंटाळा येईल मग लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं बोलण्याची तुम्हाला सवय होऊन जाईल! नंतर तुमच्या ‘स्व’ ला दुसरं काहीतरी नवीन हवं असेल. म्हणून तर ठराविक वयानंतर माणूस लोक त्याच्याबद्दल काय बोलतात याची पर्वा करत नाहीत. कारण त्यांचा ‘स्व’ तेव्हा बदलेला असतो.”
त्याचं स्वतःचं असं वेगळंच तत्वज्ञान होतं एकदम नवीन एकदम शुद्ध! आणि त्याचे विचार ही अगदी खणखणीत होते. बोलताना त्याला एक क्षणही विचार करावा लागत नव्हता. जीवनातल्या एकटेपणाचा त्याने पुरेपूर फायदा उठवला होता.
तिला त्याला बोलतं ठेवायचं होतं पण आता तिच्याकडचे प्रतिप्रश्न संपले होते. “बोलत रहा ना! खूप छान बोलता तुम्ही!” तिने शेवटी हार मानली.
“चोपन्न पुस्तके लिहिली आहेत जेव्हा प्रकाशित करीन तेव्हा तुम्हाला नक्की पाठवीन. माझ्या कोणत्या बोलण्याचा किंवा कृत्याचा राग आला असेल तर विसरून जा!” त्याने माफीही त्याच्या अनोख्या पध्दतीनेच मागितली.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,