तू काय करतोस -1
फोनवरचं बोलणं संपवत ती उठली. रविवारचा दिवस होता. तशी दर रविवारी ती आपल्या घरी भोरला जात असे. पण आज ती घरी गेली नव्हती. सकाळपासून रूमवरच पडून होती. त्याच्याशी फोनवर बोलण्यात कधी दुपारचे दोन वाजले हेदेखील तिला कळले नाही.
तो तिच्या अत्याचाच मुलगा होता. नुकतंच शिक्षण संपवून तो कुठल्याश्या कंपनीत नोकरीसही लागला होता. सुरवातीस अगदी तुरळक बोलणारा अक्षय नंतर नतंर नेहमीच तिला फोन करू लागला. दिवसा कॉलेजात असताना चॅटिंग आणि संध्याकाळपासून ते अगदी मध्यरात्रीपर्यंत फोनवर बोलणं सुरु झालं.
ती भोरजवळच्या एका खेडेगावातून शिक्षणासाठी वाघोलीला आली होती. आता डिग्री पूर्ण होण्यास जेमतेम काही महिन्यांचा कालावधी उरला होता. छोटंसं गाव असल्याने कधी मुलांशी जवळीक निर्माण होण्याचा प्रश्न नव्हता.
ती तशी सिंसिअर असल्याने कॉलेजातही कधी ती त्या फंदात पडली नव्हती. पण आताशा तिच्या लग्नाबद्दल तिच्या घरात बोलणी सुरू झाली होती. घरच्यांनी तिच्यासाठी स्थळेही पाहण्यास सुरवात केली होती. यंदाच्या यात्रेच्यावेळी तिची आत्याने चेष्टेचेष्टेमध्ये तिच्या वडिलांजवळ तिला मागणीही घातली. अर्थात तीही वयात आली होतीच.
तारुण्यसुलभ आकर्षण जरा उशीराच का होईना पण तिच्यात हळूहळू जागं होऊ लागलं होतंच! पण त्या आकर्षणाला वाट करून देणं तिला जमलं नव्हतं. हेच त्यानं पुरेपूर ओळखून आपल्या जाळ्यात तिला ओढलं.
असंही सगळे लहानपणापासून अक्षु आणि अर्पणाचं लग्न होणार असं त्या दोघाना चिडवायचेच. मग तो तिला फोन करू लागला. कधी गावाला जाताना तिला स्वारगेटला सोडू लागला. महिन्यातून एखादवेळी ते डिनरला जाऊ लागले.
तो तसा हुशार होता. त्याने कधीही तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला नाही. ना कधी तिच्याशी सूचक बोलला. ते दिवस दिवस चॅटिंग करायचे, फोनवर बोलायचे पण तो कटाक्षाने तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पाच मारायचा. त्याच्या नोकरीतल्या गोष्टी सांगायचा, तिच्या कॉलेजातल्या गमतीजमती विचारायचा तर कधी नातेवाईकांच्या गप्पा मारायचा. तीही तसंच बोलायची.
तिचं मन नकळत त्याच्यात गुंतलं होतं. पण ते खूप श्रीमंत त्यात तो दिसायला एकदम स्मार्ट होता आणि एवढी चांगली नोकरीही होती त्यामुळे तो कधी आपला विचारही करणार नाही हे तिला ठाऊक होतं त्यामुळे तिने कधी आपल्या बोलण्या-वागण्यातून त्याला हे जाणवू दिलं नव्हतं. दोघेही अगदी मर्यादेत राहून एकमेकांशी वागत बोलत असत.
आज फोनवर बोलता बोलता त्याने तिला रात्री जेवायला जाऊयात का असं विचारलं. तीही नेहमीप्रमाणे लगेच तयार झाली. त्याचा फोन ठेऊन ती उठली. अंघोळ वगैरे करून तिने भराभर स्वतःच आवरलं. बाहेर खासगी फ्लॅट भाड्याने घेऊन राहत असल्याने तिला रात्री वेळेत परत येण्याचं टेन्शन नव्हतं.
ठरल्याप्रमाणे तो बरोबर साडेतीन वाजता तिच्या बिल्डिंगच्या खाली आला. तिथे पोचताच त्याने तिला मेतेज केला. ती पट्कन खाली आली आणि त्याच्या गाडीवर मागे बसली.
“कुठं जायचं आज?” त्याने ती आरशात दिसत राहील अशा पद्धतीनं आरसा सेट करत विचारलं.
“कुठंपण चालेल.” ती
“आज वातावरण मस्त आहे ना? जरा लॉंग ड्राईव्हला जायचं का?” तो
“कुठं जायचं लॉंग ड्राईव्हला?” ती
“असंच मधून थेऊरला जाऊन येऊ गणपतीला?” त्याने विचारलं.
“हो चालेल की. बरेच दिवस झाले मी पण गेले नाही गणपतीला.” तिने लगेच होकार दिला. तशी तिला देवधर्माची जरा जास्तच आवड होती.
त्याने ट्रॅफिकमधून गाडी हाकत हायवे पार करून केसनंद फाट्यावरून गाडी आतल्या रस्त्याला घातली. रस्ता जरा जास्तच खराब झाला होता. खड्ड्यातून आदळत त्यांचा प्रवास सुरु झाला. अंतर जास्त नव्हतं. जेमतेम पंधरा ते वीस मिनिटांचा रस्ता होता. किलोमीटरभर गेल्यावर त्याने गाडी बाजूला घेतली.
“अर्पणा! दोन्हीकडे पाय सोडून बसते का? गाडी लय आपटतीय! बॅलन्स करायला येईनाय मला.”
“बरं!” असं म्हणत ती गाडीवरून उतरली आणि दोन्हीकडे पाय सोडून बसली. पुन्हा त्यांचा प्रवास सुरु झाला.
ती सीटच्या अगदी मागच्या टोकाला गाडीला अगदी घट्ट धरून बसली होती. त्यांच्या दोघांच्यामध्ये आणखी एक माणूस सहज बसला असता एवढं अंतर होतं. खड्डे चुकवताना ती त्याच्यावर आदळावी अशा पध्दतीने तो ब्रेक मारत होता.
ती चांगलीच घट्ट धरून बसली असल्यानं तसं काही होतं नव्हतं. पण तिला जाणवू न देता त्याचे प्रयत्न चालूच होते. काही बेल्टच ते थेऊरला पोचले. गणपतीचं दर्शन घेऊन थोडावेळ मंदिरात बसून ते बाहेर गाडीजवळ आले.
“आता कुठं जायचं अक्षुदाजी?” ती आपला स्कार्फ आपल्या चेहऱ्याभोवती लपेटत बोलली.
“आता वाजलेत साडेचार! जेवणाला वेळ आहे अजून. एवढा वेळ काय करायचं?” तो गाडीवर बसत म्हणाला.
“तेच तर तुला कळलं नाही का आधी. थोडं उशिरा यायचं ना!” ती मागे बसली.
“एक काम करू इथून लोणीला जाऊ, तिथून हडपसर आणि तिथून मग जाऊ सिटीत कुठंतरी. तेवढाच टाईमपास होईल आणि फिरूनही होईल!” तो
“चालतंय!” ती
त्याने गाडी सुरु करून थेऊरफाट्याच्या दिशेने वळविली.
“आर्पे, पोरगा पसंत पडतोय का नाही?” त्याने गप्पांना सुरवात केली.
“अजून बघितलंच नाय तर पसंत कुठून पडणार?” अजून तरी सगळं नॉर्मल चाललं होतं.
“खरंच बघितला नाय का मला फसवतेयस?” तो
“अरे खरंच तर!” ती
“आई बोललेली ना मामाला माझ्याबद्दल!” त्याने विषयाला हात घातला.
“म्हंजे?” ती
“म्हंजे आईनी मागणी घातलेली ना?” तो
“अरे ते चेष्टेचेष्टेत बोलल्याल्या आत्या! जसंकाय तुला माहीतच नाही” ती